UPI यूजर्ससाठी मोठी बातमी! पैसे पाठवण्यापूर्वी दिसू शकतो ‘YES/NO’ अलर्ट…
UPI Online Fraud बँकांनी व्यवहारानंतर पैसे जमा होण्यास एक तासाचा विलंब (Lagged Credit) करण्याचाही पर्याय सुचवला होता. मात्र...
YES/NO Confirmation Prompt Before UPI Transaction : देशात UPI द्वारे दररोज अब्जावधी रुपयांचे डिजिटल व्यवहार होत आहेत. मात्र, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बँकांनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यासमोर नवे सुरक्षा मॉडेल सादर केले आहे. हे मॉडेल लागू झाल्यास संशयास्पद UPI व्यवहार करण्यापूर्वी ग्राहकाच्या मोबाईलवर ‘YES/NO’ (होय/नाही) असा कंफर्मेशन प्रॉम्प्ट दिसू शकतो. या प्रस्तावानुसार एखादा व्यवहार संशयास्पद किंवा उच्च-जोखमीचा (High-Risk) वाटल्यास तो तात्काळ पूर्ण न करता वापरकर्त्याची पुन्हा एकदा स्पष्ट संमती घेतली जाईल.
नेमका काय आहे नवा प्रस्ताव?
सध्या UPI व्यवहार सुरू होताच काही सेकंदांत पैसे समोरच्या खात्यात जमा होतात. मात्र, नव्या प्रस्तावानुसार संशयास्पद व्यवहार आढळल्यास पैसे पाठवण्यापूर्वी वापरकर्त्याला एक अतिरिक्त पुष्टीकरण विचारले जाईल. या प्रस्तावानुसार, मोबाईल स्क्रीनवर ‘YES/NO’ असा पॉप-अप दिसेल. ग्राहकाने ‘YES’ निवडल्यास व्यवहार नेहमीप्रमाणे काही सेकंदांत पूर्ण होईल. ‘NO’ निवडल्यास व्यवहार तत्काळ रद्द केला जाईल. तर ग्राहकाने कोणताही पर्याय निवडला नाही, तर व्यवहार पूर्ण होईल; मात्र संबंधित खात्यात पैसे सुमारे एक तासानंतर जमा होतील.
प्रत्येक व्यवहारासाठी YES/NO अलर्ट येणार का?
बँकांनी स्पष्ट केले आहे की हा अलर्ट प्रत्येक UPI व्यवहारासाठी नसेल. तो केवळ संशयास्पद किंवा उच्च-जोखमीच्या व्यवहारांपुरताच मर्यादित असेल. उदाहरणार्थ, रात्री उशिरा मोठ्या रकमेचा व्यवहार, यापूर्वी कधीही पैसे न पाठवलेल्या व्यक्तीला प्रथमच पैसे पाठवणे किंवा नुकतेच उघडलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणे अशा व्यवहारांमध्येच ‘YES/NO’ कंफर्मेशन प्रॉम्प्ट दिसण्याची शक्यता आहे.
RBI ने हा प्रस्ताव का मागवला?
गेल्या काही वर्षांत डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहकांना बनावट फोन, डीपफेक व्हिडिओ, खोटे कस्टमर केअर किंवा फेक रिफंडच्या नावाखाली फसवून स्वतःच पैसे पाठवण्यास भाग पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यालाच Authorized Push Payment Fraud असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या फसवणुकींमध्ये ग्राहकांना व्यवहार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळावी, हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
NPCI ची भूमिका काय?
बँकांनी व्यवहारानंतर पैसे जमा होण्यास एक तासाचा विलंब (Lagged Credit) करण्याचाही पर्याय सुचवला होता. मात्र, NPCI ला याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. प्रत्येक व्यवहारात विलंब झाल्यास UPI च्या वेगवान सेवेला धक्का बसू शकतो आणि ग्राहक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळू शकतात, अशी चिंता NPCL कडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ संशयास्पद व्यवहारांनाच अतिरिक्त सुरक्षा तपासणी लागू करण्याचा पर्याय अधिक व्यवहार्य मानला जात आहे.
डिजिटल फसवणुकीत किती वाढ?
डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार असून, बँकिंग क्षेत्रातील उपलब्ध आकडेवारीनुसार, 2021 मध्ये डिजिटल फसवणुकीची सुमारे 2.6 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. 2025 मध्ये ही संख्या तब्बल 28 लाखांवर पोहोचली, तर फसवणुकीची रक्कम 551 कोटी रुपयांवरून 22,931 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर RBI आणि बँका अधिक कडक सुरक्षा उपायांचा विचार करत आहेत.
सामान्य UPI वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार?
सध्या हा फक्त प्रस्ताव असून RBI कडून अंतिम नियम जाहीर झालेला नाही. मात्र, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास UPI व्यवहारांमध्ये अतिरिक्त सुरक्षा मिळेल आणि ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. पण, दैनंदिन सामान्य UPI व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी RBI, NPCI आणि बँका मिळून नवे सुरक्षा मॉडेल तयार करत आहेत. त्यामुळे भविष्यात UPI द्वारे पैसे पाठवताना काही व्यवहारांमध्ये ‘YES/NO’ चा अतिरिक्त कंफर्मेशन प्रॉम्प्टचा टप्पा दिसू शकतो. हा बदल लागू झाल्यास ऑनलाइन फसवणूक कमी करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरणार आहे.