Download App

Gautam Adani कमालीचा कष्टाळू आणि साधा : शरद पवार यांनी केले होते कौतुक

  • Written By: Last Updated:

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पासोबत आणखी एका मुद्द्याची चर्चा होते आहे, ते म्हणजे गौतम अदानी (Gautam Adani). अदानी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Reserch) प्रकाशित केलेल्या रिपोर्टमुळे जगभरात याची चर्चा झाली. राष्ट्रपती अभिभाषणावर झालेल्या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी (Rahul Gandhi) अदानी प्रकरणावरून सरकारवर तर जोरदार टीका केलीच पण मोदी-अदानी यांच्यातील मैत्रीवर देखील प्रश्न उपस्थित केले.

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की गौतम अदानी यशाच्या शिखरावर पोहोचण्यामागे त्यांची पंतप्रधान मोदींशी असलेली जवळीक कारणीभूत आहे. राहुल गांधींनी संसदेत थेट पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे फोटोही दाखवले. त्यावर मोठा हंगामा झाला.

राहुल गांधींच्या आरोपांना पंतप्रधान मोदी उत्तर देणार का ? असा प्रश्न विचारला गेला.पण पंतप्रधानांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुमारे दीड तास भाषण केलं. मात्र त्यांनी अदानीशी संबंधित कोणत्याच गोष्टींची चर्चा केली नाही.

हेही वाचा : Hindenburg Report : हिंडेनबर्ग रिसर्च ते अदानी ग्रुपला धक्का : संपूर्ण प्रकरण समजून घ्या

त्यानंतर माध्यमातुन यावर बोललं गेलंच पण त्यावेळी आणखी एक प्रश्न विचारलं गेला, तो म्हणजे अदानी प्रकरणात राहुल गांधी आक्रमक होत असताना बाकी विरोधी पक्ष शांत का? यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचेही नाव घेतले गेले. राष्ट्रवादीने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

त्यामुळे पवार आणि गौतम अदानी यांच्याही जवळकीची चर्चा झाली. त्यावर शोधता शोधता आम्हाला शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्रामध्येही शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतुक केल्याची माहिती सापडली.

आपल्या पुस्तकात शरद पवार यांनी लिहले आहे की,

“असाच एक आवर्जून उल्लेख करावा लागेल, तो गौतम आदमी या नावाचा. अलीकडे खूप मोठ्या बोलबाला झाला आहे. या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू शून्यातून त्याने आपलं साम्राज्य उभ केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्याच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्वकांक्षा होती. या मधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईकडे गुजरात मधील मुद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुद्रा वाळवंटी भागातील बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तूस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिवधनुष्य पेललं. आज पन्नास हजार एकर जमिनीवरच हे बंदर देशातील सर्वात मोठे आणि अद्ययावत बंदर आहे

गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, “वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा.’ एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो, “उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो, की ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.” त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. ‘व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. गौतम यांनी ऊर्जानिर्मितीचया क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.”

शरद पवार यांच्या पुस्तकातील या उताऱ्यामुळे पवार यांचे पूर्वीपासून चांगले संबंध असल्याच दिसत आहे. असं म्हटलं जात की गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत. अदानी दर वर्षी दिवाळीला बारामतीत येतात. त्यामुळे राहुल गांधी किंवा विरोधी पक्षातील नेते बोलत असताना पवार मात्र शांत आहेत.

रोहित पवार यांचं सारथ्य

याआधी काही दिवसापूर्वी गौतम अदानी बारामतीला आले होते. तेव्हा स्वतः रोहित पवार यांनी अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. त्यावेळी अदानी यांचे स्वागत करण्यासाठी रोहित पवार स्वत: बारामती विमानतळावर उपस्थित होते. गौतम अदानी विमानतळावर उतरल्यानंतर रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलं. त्यानंतर रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी स्वत: चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत नेलं. यानंतर रोहित पवारांचे गाडी चालवतानाचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरले होते.

त्यांनतर आता हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणानंतर रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे गौतम अदानी यांचे समर्थन केले होते. त्यावर टीका झाल्यांनतर त्यांनी सारवासारव केली होती.

Tags

follow us