Gen Z Is Driving 40 % of Retail Activity in the Stock Market : एकेकाळी सोशल मीडियावर रील्स पाहण्यात रमणारी Gen-Z आता ‘रिअल रिटर्न’ कमावण्यावर भर देताना दिसत आहे. हातात स्मार्टफोन, काही मिनिटांत पूर्ण होणारे KYC आणि एका क्लिकवर उपलब्ध असलेले ट्रेडिंग अॅप्स… या तिन्ही गोष्टींनी भारतीय शेअर बाजारात मोठी क्रांती घडवून आणली आहे. आज परिस्थिती अशी आहे की, देशातील प्रत्येक 10 पैकी जवळपास 4 गुंतवणूकदार हे Gen-Z वर्गातील आहेत. म्हणजेच भारतीय शेअर बाजाराचा चेहरामोहराच आता तरुणांच्या हातात जात असल्याचे चित्र आहे.
खाजवा डोकं! महिन्याकाठी मिळणाऱ्या पगाराला Salary नाव कसं पडलं?
तात्पुरती लाट नाही
तज्ज्ञांच्या मते, ही केवळ तात्पुरती लाट नाही. आर्थिक वर्ष 2020 मध्ये NSE-नोंदणीकृत गुंतवणूकदारांमध्ये Gen-Z चा वाटा 25 टक्के होता. तो 2025 मध्ये 40 टक्क्यांवर पोहोचला असून, 2026 अखेर हा आकडा 45 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा बदल केवळ शेअर बाजारापुरता मर्यादित नसून, भारतातील आर्थिक विचारसरणी बदलत असल्याचेही संकेत मानले जात आहेत.
कोविडनंतर बदलले गुंतवणुकीचे गणित
कोरोना महामारीनंतर भारतातील गुंतवणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले. पूर्वी शेअर बाजार हा अनुभवी आणि मोठ्या शहरांतील गुंतवणूकदारांचा विषय मानला जात होता. मात्र आता छोट्या शहरांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत लाखो तरुणांनी शेअर बाजारात प्रवेश केला आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन (IBEF) आणि विविध उद्योग अहवालांनुसार, भारतातील गुंतवणूकदारांचे प्रोफाइल झपाट्याने तरुण होत आहे. Gen Z Is Driving 40 % of Retail Activity in the Stock Market
आर्थिक वर्ष 2020 मध्ये NSE-नोंदणीकृत गुंतवणूकदारांमध्ये Gen-Z चा वाटा 25 टक्के होता. तो 2025 पर्यंत 40 टक्क्यांवर पोहोचला असून, 2026 मध्ये तो 45 टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याचे मानले जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2019 मध्ये 30 वर्षांखालील गुंतवणूकदारांचा वाटा 22.6 टक्के होता. तो जुलै 2025 पर्यंत 38.9 टक्क्यांवर गेला. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचे सरासरी वयही 38 वरून 33 वर्षांवर आले आहे.
चार्जर, पॉवर बँक विसरा, आता मित्राच्या फोनमधून तुमचा मोबाईल होणार रिव्हर्स चार्जिंग…
तरुण गुंतवणूकदार एवढ्या वेगाने का वाढत आहेत?
भारतात 25 वर्षांखालील तब्बल 60 कोटी लोकसंख्या आहे. या युवा वर्गानेच शेअर बाजाराच्या वाढीला मोठी चालना दिली आहे. 2022 मध्ये नवीन डिमॅट खात्यांमध्ये 43 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामागे 18 ते 30 वयोगटातील गुंतवणूकदारांचा सर्वाधिक वाटा होता. Groww, Zerodha, Upstox आणि Paytm Money यांसारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मवर नव्याने जोडल्या जाणाऱ्या ग्राहकांपैकी 70 टक्क्यांहून अधिक ग्राहक या वयोगटातील आहेत. यामागे सोशल मीडिया, यूट्यूबवरील आर्थिक माहिती, फिनान्शियल इन्फ्लुएन्सर्स आणि गुंतवणूकविषयक वाढती जागरूकता हेही महत्त्वाचे घटक मानले जात आहेत.
मोबाईलवरूनच सुरू झाली गुंतवणुकीची नवी क्रांती
Gen-Z ही पूर्णपणे डिजिटल पिढी असल्याने त्यांची गुंतवणूकही मोबाईलवरूनच होत आहे. डिजिटल KYC, ई-सिग्नेचर आणि काही मिनिटांत खाते उघडण्याच्या सुविधेमुळे शेअर बाजार सर्वसामान्यांच्या खिशातील स्मार्टफोनपर्यंत पोहोचला आहे. आज रिटेल इक्विटी गुंतवणुकीपैकी जवळपास 80 टक्के व्यवहार अॅप आधारित ब्रोकर्समार्फत होत आहेत. विशेष म्हणजे, नवीन SIP नोंदणींपैकी 55 ते 60 टक्के नोंदणी टॉप 30 शहरांबाहेरील गुंतवणूकदारांकडून होत आहे. त्यामुळे छोट्या शहरांमधूनही गुंतवणुकीची नवी लाट निर्माण होत आहे.
ट्रेडिंगपेक्षा ‘वेल्थ क्रिएशन’वर भर
Gen-Z केवळ अल्पकालीन ट्रेडिंगकडे आकर्षित नाही. ही पिढी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यावर अधिक भर देत आहे. 2025 मध्ये उघडण्यात आलेल्या नवीन SIP खात्यांपैकी 40 टक्के खाती 35 वर्षांखालील गुंतवणूकदारांनी उघडली. Gen-Z मधील 19 टक्के गुंतवणूकदार SIP द्वारे गुंतवणूक करतात आणि त्यापैकी 84 टक्के जण इक्विटी म्युच्युअल फंडांना पसंती देत आहेत. याशिवाय Gen-Z च्या एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास 58 टक्के हिस्सा शेअर्स आणि इक्विटी फंडांमध्ये आहे. सोने किंवा इतर पारंपरिक पर्यायांपेक्षा इक्विटीमध्ये दीर्घकालीन परतावा मिळवण्याकडे त्यांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे.
इमोश्नल सपोर्ट देण्यात AI चॅटबॉटने माणसांनाही टाकलं मागे; समोर आलेल्या स्टडीने सगळेच चक्रावले
फक्त मेट्रो शहरांपुरता राहिला नाही शेअर बाजार
मुंबई, पुणे, दिल्ली किंवा बेंगळुरूपुरता मर्यादित असलेला शेअर बाजार आता टियर-2 आणि टियर-3 शहरांपर्यंत पोहोचला आहे. स्वस्त इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाइन शिक्षण आणि फिनटेक अॅप्समुळे छोट्या शहरांतील तरुणही आता सहज गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा विस्तार अभूतपूर्व वेगाने होत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेलाही मिळणार मोठा आधार
तरुण गुंतवणूकदारांची वाढती संख्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत आहे. देशांतर्गत गुंतवणूक वाढल्यामुळे उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध होईल, विदेशी गुंतवणुकीवरील अवलंबित्व कमी होईल आणि बाजारातील स्थिरता वाढेल. रिटेल गुंतवणुकीत सातत्याने वाढ झाल्यास भारताच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीला मोठा आधार मिळू शकतो. 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या ध्येयालाही यामुळे बळ मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
थोडक्यात काय तर, NSE मधील Gen-Z गुंतवणूकदारांचा वाटा 2020 मधील 25% वरून 2025 मध्ये 40 टक्क्यांवर गेला आहे. 2026 अखेर हा आकडा 45% पर्यंत जाण्याची शक्यता असून, 30 वर्षांखालील गुंतवणूकदारांचा वाटा 22.6% वरून 38.9% पर्यंत नोंदवण्यात आला आहे. तर,रिटेल इक्विटी व्यवहारांपैकी 80% व्यवहार अॅप-आधारित प्लॅटफॉर्मवर आहेत. नवीन SIP खात्यांपैकी 40% खाती 35 वर्षांखालील गुंतवणूकदारांची असून, Gen-Z च्या गुंतवणुकीपैकी 58% हिस्सा इक्विटी आणि शेअर्समध्ये आहे.
याचाच अर्थ काय तर, एकेकाळी रील्समध्ये वेळ घालवणारी पिढी म्हणून हिणवली जाणारी GenZ आता ‘रिअल रिटर्न’ कमावण्यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास करत आहे. डिजिटल तंत्रज्ञान, आर्थिक साक्षरता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा दृष्टिकोन यामुळे भारतात गुंतवणुकीची नवी संस्कृती आकार घेत आहे आणि या बदलाच्या केंद्रस्थानी दुसरं तिसरं कुणी नाही तर, ते आहेत… Gen-Z.
