इमोश्नल सपोर्ट देण्यात AI चॅटबॉटने माणसांनाही टाकलं मागे; समोर आलेल्या स्टडीने सगळेच चक्रावले

AI Chatbot Emotion कधी मन खूप अस्वस्थ असतं... कोणाशी तरी बोलावंसं वाटतं. अशा वेळी जर समोर माणूस नसून एआय चॅटबॉट असेल, तर...

  • Written By: Published:
AI ChatBot

AI Chatbot Emotion Handling Better Than Human Claims Study : आतापर्यंत एआयने नोकऱ्या, लेखन, कोडिंग आणि माहितीच्या जगात माणसाला कडवी स्पर्धा दिली. पण आता त्याने माणसाच्या भावविश्वातही प्रवेश केल्याचं दिसत आहे. एका नव्या संशोधनानुसार, भावनिक आधार देण्याच्या बाबतीत एआय चॅटबॉट्स माणसांपेक्षा अधिक प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. नेमका हा स्टडी काय आणि त्यातून काय समोर आलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया…

नेमका स्टडी काय?

डरहम विद्यापीठ आणि मँचेस्टर विद्यापीठ यांनी केलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासात 1,200 हून अधिक लोकांचा सहभाग होता. संशोधकांनी ChatGPT-4o, Claude 3.5 Sonnet आणि Gemini 1.5 Pro या एआय मॉडेल्सनी दिलेल्या प्रतिसादांची मानवी प्रतिसादांशी तुलना केली. याचा उद्देश एकच होता आणि तो म्हणजे भावनिक प्रसंगांमध्ये माणसाला अधिक चांगला आधार कोण देतो?

राग आणि भीतीच्या क्षणी AI अधिक प्रभावी

अभ्यासात असे दिसून आले की, एखादी व्यक्ती रागावलेली किंवा घाबरलेली असताना एआय चॅटबॉट्सचे प्रतिसाद अधिक शांत, समंजस आणि दिलासा देणारे होते. त्यांनी केवळ सहानुभूती व्यक्त केली नाही, तर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी श्वसनाचे व्यायाम, सकारात्मक विचार आणि कृतीयोग्य उपायही सुचवले. त्यामुळे अनेकांच्या मनात शांतता आणि आशावाद निर्माण होण्यास मदत झाल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. मात्र, दुःखाच्या प्रसंगी एआय आणि माणसांच्या प्रतिसादांमध्ये विशेष फरक आढळला नाही.

एआय सल्ला देईल… पण सोबत येणार नाही

या संशोधनात फक्त लिखित आणि संक्षिप्त संवादांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातील मानवी नात्यांची तुलना एआयशी पूर्णपणे करता येत नाही, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. “एआय तुम्हाला फिरायला जाण्याचा सल्ला देऊ शकतो; पण तुमचा मित्र तुमच्यासोबत त्या रस्त्यावर चालू शकतो. तो तुमचं मौन समजू शकतो, गरज पडल्यास खांद्यावर हात ठेवू शकतो आणि संवाद संपल्यानंतरही तुमच्या पाठीशी उभा राहू शकतो. हे एआय करू शकत नाही.” असे बोलकं उदाहरण डरहम विद्यापीठाच्या संशोधक डॉ. सारा वॉकर यांनी दिलं आहे.

अति अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं

संशोधकांनी एआयच्या वाढत्या वापराबाबत सावधगिरीचाही इशारा दिला आहे. एआय अनेक कामं सोपी करत असला, तरी त्यावर जास्त अवलंबून राहणं मानवी विचारशक्तीवर परिणाम करू शकतं. यापूर्वीच्या एका संशोधनात असेही समोर आले होते की, एआयवर सतत अवलंबून राहणाऱ्या लोकांची स्वतः विचार करण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय कमी होत आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या ज्ञानावरचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.

तंत्रज्ञान हुशार आहे… पण माणुसकी अजूनही अनमोल

एआय तुमचे प्रश्न ऐकू शकतो, योग्य शब्दांत धीर देऊ शकतो आणि समस्येवर उपायही सुचवू शकतो. पण तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून शांतपणे तुमच्या शेजारी बसणारी व्यक्ती, कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमचा हात धरणारा मित्र किंवा एका मिठीत तुमचं अर्धं दुःख कमी करणारी आई… ही जागा कोणताही चॅटबॉट घेऊ शकत नाही. म्हणूनच, एआय हा भावनिक आधार देणारा एक प्रभावी डिजिटल साथीदार ठरू शकतो. पण भावना समजून घेणं आणि त्या मनापासून जगणं, यामध्ये अजूनही माणूसच माणसाचा खरा आधार आहे.

follow us