ॲपलचा ‘प्रो फर्स्ट’ फॉर्म्युला; आयफोन महागण्यामागे आणि बेस मॉडेल्स थांबवण्यामागची कारणं काय?
आयफोन 17 च्या 256 GB मॉडेलची आधीची किंमत 82 हजार 900 रुपये होती. आता हाच फोन 99 हजार 900 रुपयांना मिळणार आहे.
Apple’s ‘Pro-First’ Formula : नवा आयफोन बाजारात आला की जुन्या आयफोनची किंमत कमी होते, असा आतापर्यंतचा अनुभव होता. त्यामुळे नवीन सिरीज लॉन्च होण्याची वाट अनेक ग्राहक जुन्या सिरीजचा फोन स्वस्तात खरेदी करण्यासाठीही पाहत असतात. मात्र यंदा ॲपलने हे गणित पूर्णपणे बदलून टाकलं आहे. आयफोन 18 प्रो सिरीज आणि कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन डुओ लॉन्च झाल्यानंतर जुन्या आयफोन 17 ची किंमत कमी होण्याऐवजी तब्बल 20 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
आयफोन 17 च्या 256 GB मॉडेलची आधीची किंमत 82 हजार 900 रुपये होती. आता हाच फोन 99 हजार 900 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच किंमत थेट 17 हजार रुपयांनी किंवा जवळपास 20.5 टक्क्यांनी वाढली आहे. तर 512 GB मॉडेलची किंमत आधी 1 लाख 2 हजार 900 रुपये होती, ती आता 1 लाख 24 हजार 900 रुपये झाली आहे. म्हणजे या मॉडेलच्या किमतीत 22 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
दुसरीकडे नव्याने लॉन्च झालेल्या आयफोन 18 प्रो च्या 256 GB मॉडेलची भारतातील किंमत 1 लाख 64 हजार 900 रुपये, तर आयफोन 18 प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत 1 लाख 79 हजार 900 रुपये आहे. ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन असलेल्या आयफोन डुओची किंमत मात्र तब्बल 2 लाख 99 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे यंदाच्या नव्या आयफोन सिरीजसोबतच जुन्या मॉडेल्सच्या वाढलेल्या किमतींचीही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
विद्यानंद बापटांकडून DGP, पुणे पोलीस, मनपा अन् MPCB ला कायदेशीर नोटीस; अल्टिमेटमही दिला
पण ॲपलने जुन्या आयफोनच्या किमती कमी करण्याऐवजी वाढवल्या तरी का? यामागे सर्वात महत्त्वाचं कारण जागतिक बाजारातील मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ असल्याचं समोर येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सेंटर्ससाठी मेमरी चिप्सची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून उत्पादन खर्च वाढला आहे. भारतात आयात होणाऱ्या काही घटकांवरील शुल्क आणि 18 टक्के जीएसटीचाही अंतिम किंमतीवर परिणाम होतो. या वाढलेल्या खर्चाचा भार ॲपलने नव्या फोनसोबतच बाजारात असलेल्या जुन्या मॉडेल्सच्या किमतींवरही टाकल्याचं दिसत आहे.
यंदाच्या लॉन्चमध्ये आणखी एक मोठा बदल म्हणजे ॲपलने नेहमीप्रमाणे बेस आयफोन 18 लॉन्च केलेला नाही. सध्या कंपनीने केवळ प्रीमियम आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स आणि फोल्डेबल आयफोन डुओ बाजारात आणले आहेत. मात्र याचा अर्थ बेस आयफोन 18 रद्द करण्यात आला आहे, असा नाही. मॅक रुमर्सने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार बेस आयफोन 18 सोबत आयफोन 18e आणि पुढील एअर मॉडेल 2027 च्या सुरुवातीला स्वतंत्रपणे लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईला जाणार; आज घेणार सर्वात मोठा निर्णय
ॲपलच्या या बदललेल्या रणनीतीमागे दोन प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे. द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार पहिले म्हणजे सध्या सुरू असलेली मेमरी आणि चिप्सची टंचाई. मर्यादित पुरवठ्याच्या परिस्थितीत ॲपलने अधिक किंमत आणि जास्त नफा मिळवून देणाऱ्या प्रो आणि डुओसारख्या प्रीमियम मॉडेल्सना प्राधान्य दिल्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे ॲपल आता वर्षातील सर्व आयफोन एकाच वेळी लॉन्च करण्याऐवजी लॉन्च सायकल दोन टप्प्यांत विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये प्रीमियम मॉडेल्स आणि त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला तुलनेने परवडणारी बेस मॉडेल्स अशी नवी रणनीती असू शकते.
त्यामुळे यंदाच्या आयफोन लॉन्चमध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. एक म्हणजे नवा आयफोन आल्यानंतर जुना आयफोन स्वस्त होण्याची परंपरा मोडली आणि आयफोन 17 जवळपास 20 टक्क्यांनी महाग झाला. दुसरीकडे ॲपलने बेस आयफोन18 सप्टेंबरच्या लॉन्चमधून बाजूला ठेवत सध्या केवळ प्रो, प्रो मॅक्स आणि महागड्या फोल्डेबल डुओ वर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे ॲपलचं हे बदललेलं किंमत आणि लॉन्चिंगचं गणित भविष्यातही कायम राहणार का, याकडे आता ग्राहकांचं लक्ष असणार आहे.