BRICS : जर्मन-चिनी बोलणार, जलेबी-रबडी खाऊ घालणार, पाहुण्यांसाठी व्यापाऱ्यांची भन्नाट तयारी

Brics Summit Delhi 2026 चांदणी चौकातील लहंगा आणि सूटचे व्यापारी यांना इंग्रजी येत नसली, तरी त्यांचा मुलगा अस्खलित इंग्रजी बोलतो

  • Ninad K
  • Written By: Published:
Brics Summit Delhi 2026

Brics Summit Delhi 2026 : राजधानी दिल्लीत 12 आणि 13 सप्टेंबर रोजी 18 वा BRICS शिखर परिषद होणार आहे. भारत मंडपममध्ये होणाऱ्या या परिषदेसाठी विविध देशांतील नेते आणि प्रतिनिधी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतासाठी सरकारकडून तयारी सुरू असतानाच दिल्लीतील बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, परदेशी पाहुणे खरेदीसाठी बाजारात आले तर त्यांच्याशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी इंग्रजीसह जर्मन आणि चिनी भाषेचाही सराव सुरू केला आहे.

दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांची संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) कडूनही विशेष तयारी करण्यात आली आहे. CTI चे चेअरमन बृजेश गोयल यांनी सांगितले की, BRICS परिषदेमुळे दिल्लीतील बाजारपेठांमध्ये मोठा उत्साह आहे. परदेशी पाहुणे 11 सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये येण्यास सुरुवात करतील आणि 13 सप्टेंबरनंतरही काही काळ येथे राहण्याची शक्यता आहे. परिषदेतून वेळ मिळाल्यास हे पाहुणे चांदणी चौक, कनॉट प्लेस यांसारख्या प्रसिद्ध बाजारपेठांना भेट देऊ शकतात.

डॉलरला पर्याय मिळाला तर….? भारतातील BRICS बैठकीतून समजून घ्या अमेरिकेची चिंता

जलेबी, कचोरीपासून साड्या-ज्वेलरीपर्यंत दिल्लीचा बाजार दाखवणार

चांदणी चौक आणि इतर प्रसिद्ध बाजारपेठांमध्ये जलेबी, कचोरी, छोले भटुरे, भल्ले-पापडी, पराठे, मिठाई यांसारख्या खाद्यपदार्थांपासून साड्या, सूट, लहंगा, ज्वेलरी, गोटा-जरी, ड्रायफ्रूट्स अशा विविध वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे परदेशी पाहुण्यांना दिल्लीची चव, संस्कृती, पारंपरिक पेहराव आणि बाजारपेठेचा अनुभव जवळून घेता येईल. परदेशी पाहुण्यांनी या बाजारांना भेट द्यावी, यासाठी CTI ने केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाही पत्र लिहिले आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी संघटनेकडून आवश्यक व्यवस्था करण्यात येईल, असे या पत्रातून सांगण्यात आले आहे.

कुणी जर्मन तर, कुणी चिनी भाषेचा करतयं सराव

BRICS पाहुण्यांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी काही व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचीही मदत घेण्याचे ठरवले आहे. चांदणी चौकातील लहंगा आणि सूटचे सेठ नावाचे व्यापारी आहेत त्यांना इंग्रजी येत नसली, तरी त्यांचा मुलगा अस्खलित इंग्रजी बोलतो, तर मुलीला इंग्रजीसोबत जर्मन भाषाही येते. त्यामुळे 11 ते 13 सप्टेंबरदरम्यान मुलगा आणि मुलगी दुकानात उपस्थित राहणार आहेत. तर, फूड व्यावसायिक वर्मा यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले असून, ते स्वतःही इंग्रजीचा सराव करत आहेत. तर, व्यापारी अभिषेक गुप्ता यांनी चीनमधून येणाऱ्या पाहुण्यांशी सहज संवाद साधता यावा, यासाठी चिनी भाषेचा सराव केला आहे.

50 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचीही मदत

परदेशी पाहुण्यांना दिल्लीतील बाजारपेठांचा अनुभव अधिक चांगल्या पद्धतीने देता यावा, यासाठी CTI ने सुमारे 50 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचीही मदत घेतली आहे. हे इन्फ्लुएन्सर्स इंग्रजी तसेच काही परदेशी भाषांमध्ये संवाद साधू शकतात. खरेदी करताना पाहुण्यांना मदत करणे, बाजाराची माहिती देणे आणि दिल्लीची संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, अशी त्यांची भूमिका असणार आहे. एवढेच नव्हे तर, CTI ने चार दिवसांसाठी इंग्रजी आणि परदेशी भाषांचे ज्ञान असलेले टुरिस्ट गाइड्स उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शवली आहे.

परदेशी पाहुण्यांसाठी खास ‘जलेबा-रबडी’

चांदणी चौकातील प्रसिद्ध जलेबी व्यावसायिक रमाकांत शर्मा यांनी BRICS पाहुण्यांसाठी खास ‘जलेबा-रबडी’ तयार केली आहे. मोठ्या आकाराची आणि आकर्षक पद्धतीने तयार केलेली ही जलेबी परदेशी पाहुण्यांना दिल्लीच्या पारंपरिक चवीचा अनुभव देण्यासाठी खास बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही आपल्या दुकानात येऊन जलेबी खावी, अशी इच्छा रमाकांत शर्मा यांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत, BRICS परिषद केवळ भारताच्या राजनैतिक ताकदीचे प्रदर्शन ठरणार नसून, दिल्लीच्या बाजारपेठांसाठीही जगासमोर आपली संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि व्यापारी आतिथ्य दाखवण्याची मोठी संधी ठरणार आहे.

follow us