Global trade is under threat, but the Strait of Hormuz is open for India : मध्य आशियातील युद्धाचे पडसाद आता समुद्रापर्यंत पोहोचले असून जगाच्या ऊर्जा पुरवठयाची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ होर्मुज या समुद्रधुनीवरून तणाव आणखी तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामिक रिव्हॉलीशनरी गार्ड कॉर्पसने अत्यंत कठोर भूमिका जाहीर केली आहे. मात्र या तणावपूर्ण वातावरणात भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की हा जलमार्ग अमेरिका, इस्त्रायल आमी युरोपमधील देशांसाठी बंद राहील, मात्र भारत आणि चीनच्या जहाजांना या मार्गाने सुरक्षित प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
गुरुवारी इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांद्वारे ही घोषणा करण्यात आली. इराणने पश्चिमेकडील देशांना थेट इशारा देत म्हटले आहे की, अमेरिका, इस्त्रायल, युरोप किंवा त्यांच्या सहयोगी देशांची कोणतीही जहाजे या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांच्यावर थेट लष्करी कारवाई करून ती नष्ट करण्यात येतील. युद्धस्थितीत या समुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इराणला असल्याचा दावा इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.
या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला असतानाच भारतासाठी मात्र ही महत्वाची दिलासादायक बाब मानली जात आहे. सुरूवातीला हा मार्ग केवळ चीनसाठी खुला असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता इराणने भारतालाही या निर्बंधांमधून सूट दिली आहे. त्यामुळे भारतासाठी ऊर्जा पुरवठा अबाधित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल या सामुद्रधुनीतून वाहून नेले जाते. त्यामुळे या मार्गावर निर्बंध लागू झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारताला या मार्गाने तेल पुरवठा सुरू राहणार असल्याने देशांतर्गत इंधन दारांवरील दबाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
संभाजीनगरमध्ये MIM ला मोठा धक्का; 14 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवान हालचाली
इतिहासाच्या दृष्टीने पहिले तर हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. 1980 ते 1988 दरम्यान झालेल्या इराण – इराक युद्धादरम्यान देखील या समुद्रधुनीवरील जहाजवाहतूक पूर्णपणे बंद झाली नव्हती. मात्र अलीकडे अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर इराणने व्यावसायिक जहाजांसाठी हा मार्ग बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सॅटेलाईट डेटानुसार सध्या दुबई आणि कुवैतच्या किनाऱ्याजवळ अनेक तेलवाहू टँकर्स आणि मालवाहू जहाजे अडकून पडली आहेत.
पर्शियन गल्फ परिसरातील देशांसाठी बाहेर पडण्याचा हा प्रमुख समुद्री मार्ग मनाला जातो. जगातील महत्वाचे बंदर असलेले जेबेल अली पोर्ट देखील या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे या नाकाबंदीमुळे आशिया आणि युरोपमधील व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये इराणने भारताला दिलेली सूट ही दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ असल्याचे संकेत मानले जात आहेत. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही परिस्थिती तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
