मुंबई : बहुतेक भारतीय कुटुंबांमध्ये बचत म्हणजे सोने खरेदी करणे, जमीन घेणे, बँकेत पैसे जमा करणे किंवा घरात रोख रक्कम ठेवणे, अशीच पारंपरिक पद्धत आहे. पण आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. भारतीय कुटुंबांचा पैसा जमीन आणि सोन्यासारख्या पारंपरिक मालमत्तेतून बँक, शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांकडे वळत आहे. कोरोनानंतर हा बदल अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. जेएम फायनान्शियलचा एक अहवाल आहे. (Gold real estate stock market where are indians investing the most money JM Financial )
जेएम फायनान्शियलच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीयांच्या बँक खात्यांमधील जमा रक्कम 9.7 टक्क्यांनी वाढून 134.8 लाख कोटी रुपये झाली आहे. विशेष म्हणजे, बँक खात्यांची संख्या केवळ 1.8 टक्क्यांनी वाढलीय. याचा अर्थ भारतीय केवळ नवीन बँक खाती उघडत नाहीत, तर विद्यमान खात्यांमध्येही अधिक पैसे जमा करत आहेत. एका बँक खात्यातील सरासरी जमा रक्कम आता 51,494 रुपये झाली आहे.
कोरोनानंतर गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला
2005 मध्ये भारतीय कुटुंबांच्या एकूण बचतीपैकी 39.5 टक्के पैसा बँक, शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवला जात होता. मात्र, आर्थिक वर्ष 2024 मध्ये हे प्रमाण वाढून 44.7 टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच, आता बचतीचा मोठा हिस्सा बँक ठेवी, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांसारख्या आर्थिक साधनांकडे वळत आहे. रिपोर्टनुसार, कोरोनानंतर या बदलाला आणखी वेग आला. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी ऑनलाइन बँकिंग, गुंतवणूक आणि शेअर बाजाराचा जवळून अनुभव घेतला. कदाचित याच काळापासून भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयी बदलण्यास सुरुवात झाली.
डीमॅट खात्यांमध्ये 17.6 टक्क्यांची वाढ
भारतीयांच्या बदलत्या गुंतवणूक पद्धतीचा सर्वात मोठा पुरावा शेअर बाजारात पाहायला मिळतो. आर्थिक वर्ष 2026 मध्ये डीमॅट खात्यांची संख्या 17.6 टक्क्यांनी वाढलीय. अर्थात, मागील वर्षीच्या 26.7 टक्के वाढीच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. मात्र, तरीही ती लक्षणीय आहे. म्युच्युअल फंडाच्या बाबतीतही चित्र रंजक आहे. म्युच्युअल फंड खात्यांची संख्या 16.8 टक्क्यांनी वाढून 27.4 कोटी झाली आहे. म्हणजेच आता शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडामध्ये केवळ मोठे गुंतवणूकदारच नाही, तर छोटे गुंतवणूकदारही हळूहळू सहभागी होत आहेत.
भारतात अजूनही शेअर बाजाराची पोहोच मर्यादित
मात्र, जगातील काही प्रमुख देशांच्या तुलनेत भारतात शेअर बाजाराची पोहोच अद्याप कमी आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 13.1 टक्के लोकांकडे डीमॅट खाते आहे. चीनमध्ये हे प्रमाण 28.3 टक्के, तर जपानमध्ये 30.2 टक्के आहे. याचा अर्थ भारतातील अजूनही कोट्यवधी लोक शेअर बाजारापासून दूर आहेत. भविष्यात हे लोक गुंतवणुकीकडे वळले, तर शेअर बाजारातील सामान्य नागरिकांचा सहभाग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
म्युच्युअल फंडमध्ये किती लोक गुंतवणूक करत आहेत?
म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या सुमारे 19.6 टक्के आहे. चीनमध्ये हे प्रमाण 28.7 टक्के, जपानमध्ये 43 टक्के, तर अमेरिकेत तब्बल 76.8 टक्के आहे. म्हणजेच भारत अजूनही या देशांच्या तुलनेत बराच मागे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, भारतातील गुंतवणुकीची कहाणी अद्याप संपलेली नाही; उलट, त्यात मोठ्या विस्ताराची संधी अजूनही उपलब्ध आहे.
महिलाही गुंतवणुकीत मागे नाहीत
या बदलामध्ये महिलांचाही सहभाग वाढत आहे. अहवालानुसार, महिलांच्या बँक खात्यांची संख्या आणि त्या खात्यांमधील जमा रक्कम पुरुषांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. याचा अर्थ कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये महिलांची भूमिका अधिक मजबूत होत आहे. ही बाब महत्त्वाची आहे. कारण बँक खाते, बचत आणि गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याची पद्धत बदलली की, कुटुंबातील पैशांचा वापर करण्याची पद्धतही बदलते.
