Download App

गुजरातमध्ये काँग्रेसची किती ताकद? भाजपला पराभूत करण्याच्या राहुल गांधींच्या दाव्यात किती दम..

गुजरातमधील काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस भाजपला पराभूत करू शकेल असे दिसत नाही.

Gujarat News : लोकसभेच्या विशेष अधिवेशनात (Parliament Session) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला (Rahul Gandhi) चॅलेंज दिलं. पुढील निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपला (INDIA Alliance) गुजरातमध्ये पराभूत करणार असं हे चॅलेंज होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या (Draupadi Murmu) अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी तब्बल 90 मिनिटे भाषण केले. या भाषणात त्यांनी केंद्र सरकार, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर (PM Narendra Modi) घणाघाती टीका केली.

याचवेळी त्यांनी इंडिया आघाडी भाजपला गुजरातमध्येच पराभूत करणार आहे हे तुम्ही लिहून घ्या असा दावा केला. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चा सुरू झाली आहे की खरंच असे होऊ शकेल का, गुजरात हा तर अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. आजच्या परिस्थितीत राज्यात काँग्रेसचा फक्त एक खासदार आणि बारा आमदार आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या या दाव्यात किती दम आहे याचा आढावा घेऊ या..

भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून गुजरातकडे पाहिले जाते. तब्बल 29 वर्षांपूर्वी काँग्रेसला राज्याच्या सत्तेतून हद्दपार व्हावे लागले होते. त्यानंतर काँग्रेस (Congress Party) अजूनही वापसी करू शकलेला नाही. दुसरीकडे भाजपने आपल्या परंपरागत राजकारणाला मुरड घालत अनेक वेळा नवनवीन प्रयोग राज्याच्या राजकारणात केले आणि ते यशस्वी करून दाखवले. 1995 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये (Gujarat News) आपली पाळेमुळे अशा घट्टपणे रोवली आहेत की काँग्रेस येथे हतबल दिसत आहे. भाजपच्या राजकारणाचा तोड काँग्रेसला सापडला तर नाहीच पण आता अशी वेळ आली आहे की काँग्रेस राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर वेगाने पुढे चालला आहे.

Manipur Violence : ‘मणिपूरचा इतिहास समजून घ्या’; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं…

2014 आणि 2019 या सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गुजरातेत साधे खाते सुद्धा उघडता आले नाही. 2024 निवडणुकीत मोठ्या मुश्किलीने एक जागा जिंकता आली. गुजरातच्या सत्तेतून बेदखल होऊन आता तीस वर्षे होत आली आहेत. इतका मोठा काळ सत्तेतून बाहेर राहिल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. तसेच अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता अशी परिस्थिती आहे की अख्ख्या गुजरातमध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार आणि बारा आमदार आहेत.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदर्शन

सन 2022 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 188 पैकी 156 जागा जिंकण्यात यश मिळवले होते. या निवडणुकीत भाजपला 52.50 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला 27.28 टक्के मते मिळाली होती आणि काँग्रेसने फक्त 17 जागा जिंकल्या होत्या. 2014 मधील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये 14 टक्के घसरण झाली होती. याआधी संपूर्ण राज्यात काँग्रेसचा व्होट शेअर 40 टक्क्यांच्या आसपास राहत होता. आजमितीस काँग्रेस गुजरातमध्ये सर्वाधिक खराब स्थितीत पोहोचला आहे. 2022 नंतर पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

दिग्गज नेत्यांनी हाताची साथ सोडली

काँग्रेस पक्षाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. मागील पाच महिन्यांच्या काळात पक्षातील 65 नेत्यांनी पक्षाला कायमचा राम राम केला आहे. यातील बहुतांश नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाने विश्वासाचे संकट निर्माण झाले आहे. काँग्रेसमध्ये राहिलेले भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) आज केंद्रात मंत्री आहेत. राज्यात काँग्रेसचा जनाधार हरवत चालला आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीकडून (AAP) काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात आम आदमी पार्टीचे चार आमदार आहेत.

आमचं सरकार येण्याची भविष्यवाणी करणाऱ्या कॉंग्रेसच्या तोंडात साखर पडो, मोदींचा राज्यसभेत टोला

गुजरातमध्ये काँग्रेस जिंकू शकेल का

राज्यात हरवत चाललेला जनाधार आणि साथ सोडून जाणाऱ्या काँग्रेसला 2027 मध्ये भाजपाचा पराभव करता येईल का? राहुल गांधी यांनी दावा केला आहे की पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव करु. तसं पाहिलं तर राजकारणात काहीच अशक्य नाही. पण काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस भाजपला पराभूत करू शकेल असे आजिबात वाटत नाही. काँग्रेसची राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर बारा आमदार आणि एक खासदार. राज्यातील सर्व मोठ्या शहरांतील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. इतकेच नाही तर सहकाराच्या क्षेत्रातही काँग्रेस कुठेच दिसत नाही. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात भाजपचाच दबदबा आहे.

लोकसभा निवडणुकीत यंदा (Lok Sabha Election) भाजपला क्लीन स्वीप करता आले नाही. काँग्रेसने जोरदार वापसी करत बनासकांठा सीट भाजपकडून हिसकावून घेतली आहे. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी गुजरातमध्ये सक्रिय झाले आहेत. 2017 मधील निवडणुकीत राहुल गांधीनी बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळेच 29 वर्षात पहिल्यांदाच भाजपला निवडणुकीत शंभरचा आकडा पार करता आला नव्हता. भाजपला 99 जागा मिळाल्या आणि काँग्रसने चांगले प्रदर्शन करत 77 जागा जिंकल्या होत्या.

बालबुद्धी म्हणून सोडू नये, कठोर कारवाई व्हावी; मोदींकडून राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या वक्तव्याचा समाचार

1995 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसने 2017 मधील निवडणुकीत चांगले प्रदर्शन केले होते. पण या यशनांतरही काँग्रेस राज्यात सातत्याने कमकुवत होत गेली. आता 2024 मधील निवडणुकीत भाजपला बहुमत मिळण्यापासून रोखल्यामुळे काँग्रेस प्रचंड उत्साहात दिसत आहे. निवडणूक जिंकली नसली तरी जिंकल्याचा आविर्भाव नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आता राहुल गांधींना असे वाटत आहे की भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात मात देऊ शकतो.

निवडणुकीसाठी आणखी अडीच वर्षांचा काळ बाकी आहे. या कालावधीत बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. निवडणुका येईपर्यंत नरेंद्र मोदींचा करिश्मा चालणार नाही असे काँग्रेसला वाटत आहे. पण गुजरातमध्ये भाजपला मात देणे इतके सोपे सुद्धा नाही. कारण गुजरात भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची प्रयोगशाळा आहे. या राज्यात भाजप नेते सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात.

काँग्रेसची निराशाजनक स्थिती

गुजरातेत काँग्रेस भाजपला पराभूत करण्याचा दावा करत असला तरी जमिनीवर परिस्थिती वेगळी आहे. राज्यात काँग्रेस संघटन कमजोर झाले आहे आणि जनाधार असणाऱ्या नेत्यांनी पक्ष केव्हाच सोडला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 61.86 टक्के मते मिळाली तर काँग्रेसला 31.24 मते मिळाली. 2022 मधील निवडणुकीच्या काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जरूर वाढली आहे. पण भाजपच्या तुलनेत अजूनही 30 टक्के मते कमी आहेत. दोन्ही पक्षांच्या व्होट शेअर मध्ये मोठा गॅप आहे आणि हा गॅप भरल्याशिवाय काँग्रेसला गुजरात सर करणे केवळ अशक्य आहे.

follow us

वेब स्टोरीज