Harsh Goenka on China 10 Day Unhappy Leave Policy : नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण, डेडलाइन आणि सततची धावपळ यामुळे अनेक कर्मचारी मानसिकदृष्ट्या थकतात. अशावेळी कंपनीने कर्मचाऱ्यांना नेमकं काय द्यायला हवं? अधिक सुट्ट्या, चांगलं वर्क कल्चर की स्वतःसाठी वेळ? याच मुद्द्यावर सध्या एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी ‘अनहॅप्पी लीव्ह’ नावाची रजा सुरू केली असून, या पॉलिसीची चर्चा भारतातही होत आहे. विशेष म्हणजे, उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या पॉलिसीची माहिती शेअर करत भारतातही अशा प्रकारच्या रजेची गरज आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
‘खुश नसाल तर सुट्टी घ्या’; कारण सांगण्याचीही गरज नाही
चीनमधील रिटेल कंपनी पांग डोंग लाईने कर्मचाऱ्यांसाठी 2024 मध्ये ‘अनहॅप्पी लीव्ह’ पॉलिसी सुरू केली. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना वर्षभरात 10 दिवसांपर्यंत अतिरिक्त पगारी रजा घेता येते. या रजेचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे सुट्टी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतंही कारण सांगण्याची गरज नाही. कर्मचाऱ्याला आनंदी किंवा मानसिकदृष्ट्या ठीक वाटत नसेल आणि त्याला कामापासून काही दिवस दूर राहण्याची गरज भासत असेल, तर तो ही रजा घेऊ शकतो. इतकंच नाही तर या रजेची मागणी मॅनेजरला नाकारता येत नाही.
कंपनीच्या संस्थापकांची वेगळीच भूमिका
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा तो आनंदी नसतो. अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणं आणि कामापासून काही काळ दूर राहणं चुकीचं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी केवळ कंपनीसाठी काम करत राहण्यापेक्षा स्वतःच्या भावनिक स्थितीलाही महत्त्व द्यावं, असा या पॉलिसीमागचा विचार असल्याचे कंपनीचे संस्थापक यू डोंगलाई यांची भूमिका आहे.
हर्ष गोयंकांनी भारताला विचारला सवाल
चीनच्या या अनोख्या पॉलिसीची माहिती शेअर करत उद्योगपती हर्ष गोयनका यांनी भारतातील वर्क कल्चरच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. कर्मचारी आनंदी नसतील तर, त्यांना काही दिवस कामापासून दूर राहण्याची मुभा देणं योग्य ठरेल का? तसेच कर्मचाऱ्यांचा बर्नआउट कमी करण्यासाठी आणि लोकांना कामाच्या ठिकाणी आनंदाने यावंसं वाटावं यासाठी कंपन्यांनी आणखी काय केलं पाहिजे, हा मुद्दाही गोयंका यांनी चर्चेत आणला आहे. त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Chinese retailer Pang Dong Lai gives employees 10 days of paid “unhappy leave.” Founder Yu Donglai’s philosophy is simple “If you’re not happy, don’t come to work.” Managers are reportedly not allowed to refuse the request.
Extreme? Perhaps.
We do need a broader conversation if…— Harsh Goenka (@hvgoenka) August 7, 2026
‘10 दिवसांची रजा म्हणजे बर्नआउटचा इलाज आहे का?’
काहींच्या मते, वैयक्तिक किंवा व्यावसायिक तणावामुळे कर्मचारी त्रस्त असेल तर काही दिवसांचा ब्रेक पुन्हा फ्रेश होण्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची रजा कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. मात्र दुसऱ्या बाजूला काही जणांनी फक्त 10 दिवसांची अतिरिक्त रजा देऊन खराब वर्क कल्चरचा प्रश्न सुटणार नाही, असे मत व्यक्त केलं आहे. कामाचे जास्त तास, सततचा कामाचा दबाव, मॅनेजरचं वर्तन आणि ऑफिसमधील वातावरण यासारख्या मूळ कारणांवरही कंपन्यांनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
चीनच्या कंपनीत फक्त ‘अनहॅप्पी लीव्ह’च नाही तर…
पांग डोंग लाईची कर्मचारी कल्याणाची पॉलिसी केवळ ‘अनहॅप्पी लीव्ह’पुरती मर्यादित नाही. तर, कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबाबतही तुलनेने वेगळी पद्धत आहे. कर्मचाऱ्यांना दररोज सुमारे सात तास काम असतं आणि वीकेंडची सुट्टी मिळते. त्याशिवाय वर्षाला 30 ते 40 दिवसांपर्यंतची रजा आणि लूनर न्यू इयरच्या काळात अतिरिक्त पाच दिवसांची सुट्टी दिली जाते. म्हणजेच कर्मचाऱ्यांनी अधिक काम करावं यापेक्षा काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखावा, यावर कंपनीचा भर असल्याचं दिसतं.
भारतातही अशी पॉलिसी आली तर?
‘अनहॅप्पी लीव्ह’ची कल्पना ऐकायला आकर्षक असली तरी भारतातील प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी ती लागू करता येईलच असं नाही. मात्र या निमित्ताने कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण, बर्नआउट आणि वर्क-लाइफ बॅलन्स यावर चर्चा सुरू झाली आहे. शेवटी प्रश्न केवळ ‘10 दिवसांची रजा मिळावी का?’ एवढाच नाही, तर कर्मचाऱ्यांना अशी रजा घेण्याची गरजच कमी पडेल, असं कामाचं वातावरण कंपन्या तयार करू शकतात का? हाच खरा प्रश्न आहे.
