48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपी आक्रमक
दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगासंदर्भात विविध मागण्या मांडत आगामी आंदोलनाची भूमिकाही स्पष्ट केली.
CJP takes an aggressive stance against Gyanesh Kumar : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉक्रोचे जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्ञानेश कुमार यांनीं पुढील 48 तासांत पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा देशभरात निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपक यांनी दिला आहे. दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगासंदर्भात विविध मागण्या मांडत आगामी आंदोलनाची भूमिकाही स्पष्ट केली.
ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्या विरोधातील आरोपांची चौकशी करून आवश्यकता असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि निवडणूक आयोगातील कथित निर्णय कोणाच्या निर्देशानुसार घेण्यात आले, याचा देखील तपास व्हावा, अशी मागणी दीपक यांनी केली. त्याचबरोबर आगामी निवडणुकांची प्रक्रिया थांबवून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी सीजेपीने केली आहे.
एसआयआर संदर्भातील सर्व फाईल्स सुरक्षित ठेऊन या प्रक्रियेतील निर्णयांची तपासणी व्हावी, तसेच निवडणूक आयुक्तांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणाऱ्या 2023 मधील कायदेशीर तरतुदींमध्ये बदल करून निवडणूक आयोगाच्या रचनेबाबत नवीन व्यवस्था आणावी, अशी मागणी देखील सीजेपीने केली आहे. दरम्यान, ज्ञानेश कुमार यांनी 48 तासांत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येईल, असे अभिजित दिपके यांनी स्पष्ट केले. विविध राज्यांतील शहरांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून दिल्लीमध्ये पुन्हा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
बारामतीत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची तयारी; शरद पवारांची विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची बैठक
यापूर्वी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या धर्तीवर जंतर-मंतर 2.0 आंदोलन करण्यात येईल आणि त्याची पुढील रूपरेषा लवकरच जाहीर केली जाईल, असे दिपके यांनी सांगितले. यावेळी दीपके यांनी मतदार याद्यांमधून नावे वगळण्याच्या प्रक्रियेवर देखील गंभीर आरोप केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्यानंतर देशातील राजकीय परिस्थितीत बदल होत असल्याचे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर याद्यांमधील बदलांमुळे विरोधी पक्षांना नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम बंगाल आणि दिल्लीसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे आरोप देखील त्यांनी केले.
मात्र हे सीजेपी आणि अभिजित दीपके यांनी केलेले आरोप असून त्यातून निवडणूक गैरव्यवहार सिद्ध झाल्याचे मानता येत नाही. आमचे कोणत्याही विरोधी पक्षाशी किंवा विशिष्ट राजकीय पक्षाशी भावनिक नाते नाही. मात्र लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचे प्रमुख चेहरेच निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडत असतील तर लोकशाही कशी टिकणार? असा सवालही दीपके यांनी उपस्थित केला. CJP च्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातील SIR प्रक्रियेबाबतचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
निवडणूक आयोगाने मात्र आयोगामध्ये मतभेद असल्याचा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे सांगत अंतर्गत चर्चा आणि वेगवेगळी मते हा निर्णयप्रक्रियेचा सामान्य भाग असल्याची भूमिका मांडली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार SIR सह संबंधित अंतिम निर्णय तीनही निवडणूक आयुक्तांच्या संमतीने घेण्यात आले आहेत.