Harsha Bhogle Says Stop Feeding Pigeons : मुंबईत कबुतरांचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. कबुतरांमुळे होणारे आजार आणि आरोग्यधोके लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, या निर्णयाविरोधात जैन समुदाय आणि काही पक्षीप्रेमी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनं केली. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी महापालिका कर्मचारी आणि पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी जैन समुदायाने दादरमधील योगी सभागृहात प्रार्थना सभा आयोजित केली होती. या धर्मसभेत जैन मुनींनी ‘शांतीदूत जनकल्याण पक्ष’ नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली, जो प्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करणार आहे. दरम्यान, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही या विषयाकडे लक्ष वेधलं. मुंबईप्रमाणेच दिल्लीतही कबुतरांमुळे गंभीर आरोग्य समस्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी सोशल मिडिया पोस्ट करत पुण्यातील एका घटनेचा दाखला दिलाय.
On my way to the ground in Delhi and my heart sank when I saw people feeding a whole army of pigeons. Doctors have been shouting from the rooftops about the dangers of inhaling pigeon droppings and the severe lung disease it could lead to. Please, let us stop feeding pigeons. pic.twitter.com/hUbyUv3bsn
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 12, 2025
कबूतरांच्या विष्ठेमुळे आजार…
पुण्यातील (Pune News) माजी नगरसेवक श्याम मानकर यांच्या कुटुंबावर यंदाच्या जानेवारी महिन्यात मोठं दु:ख कोसळलं. त्यांची कन्या, शीतल विजय शिंदे (वय 38) हिचं फुफ्फुस विकाराने निधन झालं. शीतलला गेल्या काही वर्षांपासून श्वसनासंबंधी त्रास होता आणि नंतर हा आजार ‘कबूतरांच्या विष्ठेमुळे झालेला फुफ्फुस संसर्ग (Pigeon-borne lung fibrosis)’असल्याचं स्पष्ट झालं. आता या वेदनादायी अनुभवातून प्रेरणा घेत श्याम मानकर हे नागरिकांना या घातक संसर्गाविषयी जागरूक करण्यासाठी पुढे सरसावले ( Harsha Bhogle) आहेत.
सात वर्षांपासून त्रास
2017 मध्ये शीतलला सतत खोकल्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला स्थानिक डॉक्टर आणि आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतरही काही फरक पडला नाही. शेवटी पुण्यातील एका तज्ज्ञ डॉक्टरांनी विचारलं, तुमच्या घराजवळ कबूतरं आहेत का? तेव्हा कुटुंबाला समजलं की, शीतल राहत असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर काही लोक कबूतरांना दाणे टाकत होते. तिथेच कबूतरांनी घरटी केली होती. त्यांच्या विष्ठेमुळे हवेतील बॅक्टेरियामुळे शीटलला संसर्ग झाला होता. यानंतर मानकर कुटुंबाने पुणे आणि मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये तपासण्या केल्या. त्यात लिलावती हॉस्पिटलचाही समावेश होता. मात्र सर्वत्र निष्कर्ष एकच — फुफ्फुसांचे नुकसान कबूतरांच्या विष्ठेमुळे झाले आहे.
दिवसेंदिवस वाढत गेलेला त्रास
पुढील काही वर्षांत शीतलची प्रकृती खालावत गेली. चालणं कठीण झालं, श्वास घेणं अवघड झालं. तिला सतत ऑक्सिजनची गरज भासू लागली. अगदी घरात आणि कार्यक्रमांनाही ती छोटं ऑक्सिजन मशीन घेऊन जायची. रात्री झोप लागत नसे. अखेर डॉक्टरांनी तिला फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी उमेदवार म्हणून नोंदवलं. दोन दात्यांचे फुफ्फुस मिळाले पण एकदा ते जुळले नाहीत, तर दुसऱ्यांदा ती फुफ्फुसं खराब निघाली. 19 जानेवारी 2025 रोजी शीतलला पाठदुखीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ती म्हणाली होती, मी लवकरच घरी परतेन. पण त्या रात्रीच तिचं निधन झालं.
‘कबूतरांपासून सावधान’
मुलीच्या मृत्यूनंतर श्याम मानकर यांनी कबूतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत सखोल माहिती गोळा केली. ते सांगतात, कबूतरांची विष्ठा दोन-तीन दिवसांत सुकून पावडरसारखी बनते. ही पावडर हवेत मिसळते आणि घरात येते. अशा दूषित हवेचा श्वास घेतल्यावर फुफ्फुसांवर परिणाम होतो. हे लक्षण लगेच दिसत नाही, पण वर्षानुवर्षांनी गंभीर आजार म्हणून समोर येतं. मानकर म्हणतात, कबूतरं निसर्गाचा भाग आहेत, पण शहरांमध्ये त्यांची वाढलेली संख्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. लोकांनी कबूतरांना दाणे देणं, घरटी करू देणं बंद केलं पाहिजे.
आज श्याम मानकर शहरभर जनजागृती मोहिम राबवण्याचा विचार करत आहेत. शाळा, हाउसिंग सोसायटी आणि महापालिका पातळीवर नागरिकांना या संसर्गाविषयी शिक्षित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.