Hariyana Violence : हरियाणाच्या नूहमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालवून कारवाई सुरु होती. या प्रकरणात पंजाबसह हरियाणा न्यायालयाकडून कारवाई थांबवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कथित आरोपींच्या घरांवर चालणारे बुलडोझर सध्या तरी थांबले आहेत.
Hariyana Violence : हिंसाचाराची एसआयटी चौकशी तर होणारच पण.., डीजीपींनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?
नूहमध्ये जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार उफाळून आल्याची घटना घडली होती. या हिंसाचारादरम्यान, दोन पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाराच्या घटनेनंतर परिस्थितीत नियंत्रण आणण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. सध्या नूहसह इतर भागांत प्रशासनाकडून कर्फ्यू लावण्यात आला आहे.
हिंसाचाराप्रकरणी जवळपास दोनशे लोकांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने कारवाई म्हणून अनधिकृत घरांना पाडण्याचे काम सुरु केले. गेले चार दिवस ही कारवाई सुरु होती. अखेर कोर्टाने यावर बंदी आणली आहे. आतापर्यंत 753 घर-दुकाने, हॉटेल, झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ही सर्व बांधकामे अनधिकृत असल्याचं म्हटलं आहे.
तसेच या अनधिकृत घरांमध्ये राहणारे लोकं नूह हिंसाचारात सहभागी होते असं त्याचं म्हणणं आहे. नूह जिल्ह्यात प्रशासनाने आतापर्यंत 37 ठिकाणी कारवाई करत 57.5 एकर जमीन रिकामी केली आहे. यात 162 स्थायी आणि 591 अस्थायी बांधकामांचा समावेश आहे.
दरम्यान, नूहमधील पुन्हाना, नगीना, फिरोजपूर, झिरका आणि पिंगवला भागातील अतिक्रमणे हटवण्यात आले आहे. 6 जुलै रोजी प्रशासनाने हिंसाचारादरम्यान ज्या हॉटेलवरुन दगडफेक केली होती ते पाडले आहे.