‘एल निनो’चा प्रभाव असतानाही देशभरात जोरदार पाऊस; काय आहेत कारण? अन् कुठं कुठं झाला पाऊस?

‘एल निनो’चं सावट असतानाही जुलै महिन्यात इतका पाऊस कसा पडला यावर चर्चा सुरू झाली आहे.

News Photo   2026 07 10T154822.678

News Photo 2026 07 10T154822.678

यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशांत (Rain) महासागरातील ‘एल निनो’ स्थितीची मोठी चर्चा झाली. निनोचा प्रभाव मोठा असेल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, जुलै महिन्याच्या आठ दिवसांत झालेल्या पावसाने दोन विक्रमांची नोंद केली आहे. गेल्या दशकभराचा आढावा घेतला तर जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत झालेला पाऊस हा आजवरचा सर्वाधिक ठरला आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि सह्याद्री पर्वतरांगांमधील लोणावळा, महाबळेश्वर, ताम्हिणी घाट, भीरा आणि इतर ठिकाणी 6 ते 8 जुलैदरम्यान 600 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, पूरस्थिती निर्माण झाली. रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. मुंबई आणि पुणे यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या लोणावळ्याचा काही भाग तात्पुरता बंद करण्यात आला होता. ‘एल निनो’चं सावट असतानाही जुलै महिन्यात इतका पाऊस कसा पडला यावर चर्चा सुरू झाली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची पश्चिमेकडे वाटचाल होऊ लागली आणि अरबी समुद्रात मुंबई-पुण्यावर स्थित असलेल्या द्रोणीय रेषेमुळे मोसमी वारे सक्रिय झाले. हे वारे आर्द्रता घेऊन आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. राज्यातील घाट परिसरात पावसाची तीव्रता सर्वाधिक राहिली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं प्रदेशाच्या जलसंपत्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कृष्णा आणि भीमा नदीची खोरं ही पाणलोट क्षेत्र असून या खोऱ्यांमध्ये 24 हून अधिक धरणं आहेत. यातून पश्चिम महाराष्ट्राच्या खालच्या भागाला पाणीपुरवठा होतो.

भारतीय हवामान विभाग (IMD) हा 24 तासांत एखाद्या परिसरात 204 मिमी ते 244.5 मिमीदरम्यान पाऊस पडला, तर त्या पावसाला अतिवृष्टी मानतो. 6 ते 8 जुलैदरम्यान पश्चिम घाटाजवळच्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात जुलैमध्ये सुमारे 189.1 मिलीमीटर पाऊस पडतो. 1 ते 6 जुलै या कालावाधीत झालेल्या पावसानेच जुलैची महिनाभराची सरासरी ओलांडली होती. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिला.

यंदा आठ दिवसांतच पावसाने 400 मिलिमीटरचा टप्पा ओलांडून नवा उच्चांक नोंदवला आहे. कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. लोणावळा, भीरा आणि महाबळेश्वर हे सर्वाधिक पावसाचे प्रदेश होते. लोणावळा- 1290 मिमी, +161% भीरा- 1121 मिमी, +73% ताम्हिणी- 1110 मिमी, +125% शिरगाव- 960 मिमी, +58% महाबळेश्वर- 916 मिमी, +100% तर, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनुकूल हवामान परिस्थितींमुळेच मान्सून सक्रिय होऊन हा मुसळधार पाऊस झाला. भूरचना आणि पर्वतरचना हे त्या त्या प्रदेशाच्या हवामानात, विशेषत: नैऋत्य मान्सूनच्या हंगामातील पावसावर मोठी भूमिका बजावतात.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज धो धो पाऊस,या जिल्ह्यांना अलर्ट जारी

जेव्हा अरबी समुद्र सक्रिय आणि अनुकूल असतो, तेव्हा पुणे, रायगड आणि सातारा इथल्या घाट प्रदेशात आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेल्या भागात मुसळधार पाऊस पडतो. हे भाग प्रामुख्याने पश्चिम घाटाला लागून असलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये, तसंच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम डोंगराळ भागात वसलेले आहेत.भारतीय हवामान विभागाच्या पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार (1941 – 1990) लोणावळ्यात एका दिवसात सर्वाधिक 578 मिमी पाऊस 23 जुलै 1990 रोजी झाला होता. तर महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाचा दिवस हा 20 जुलै 1896 हा होता. याठिकाणी 458 मिमी पावसाची नोंद झाली होती. रायगड जिल्ह्यातील भीरा इथं 24 जुलै 1989 रोजी 713 मिमी पावसाची नोंद झाली होती.

भौगोलिकदृष्च्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला (समुद्राच्या दिशेने आणि जिथे दमट वारे एकमेकांना धडकतात) पर्जन्यमान जास्त असतं. तर दुसऱ्या बाजूला (ज्याला वर्षाछाया पट्टा म्हणतात) पर्जन्यमान कमी असतं. पर्जन्यमानात लक्षणीय वाढ अनुभवणाऱ्या काही मोजक्या भारतीय राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. कोकणातही अतिवृष्टीच्या दिवसांची संख्या वाढत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, यापैकी बहुतेक ठिकाणी असा मुसळधार पाऊस कोसळणं हे काही नवीन नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो.

जोर ओसरला

राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून पुढील काही दिवसांत काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच पुढील काही दिवसात राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान शुक्रवारी मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे घाट विभाग तसंच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसंच काही भागात हलक्या सरींचा अंदाज असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

देशभरातील परिस्थिती

मुसळधार पावसामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांपैकी एक उत्तराखंड आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत, तर अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भूस्खलनामुळे काही रस्ते बंद झाले असून चार धाम यात्रेवरही त्याचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील रस्त्यांवर पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी दिसून आली.

गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. गुजरातच्या सूरतमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पूरसदृश परिस्थितीमुळे सखल भागातून सुमारे 3900 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. देशभरात मुसळधार पाऊस पडत असताना मध्य प्रदेशात पुढील तीन ते चार दिवसांत मान्सूनचा जोर मंदावण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पट्टा उत्तर प्रदेशाकडे सरकल्यामुळे शुक्रवारपासून राज्यात पावसाचं प्रमाण कमी होईल.

Exit mobile version