राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा; खबरदारी म्हणून पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

News Photo   2026 07 08T213326.280

राज्याच्या मुसळधार पावसाने कहर केलाय. (Rain) या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.

जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यानुसार अनेक पर्यटनस्थळे आता बंद राहणार आहेत. डॉ. योगेश खरमाटे यांच्या आदेशानंतर आता धोम धरण, मेणवली घाट, लिंगमळा धबधबा, प्रतापगड यांसह वाई, खंडाळा व महाबळेश्वरमधील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे, धरणे, नदीपात्रे आणि धबधब्यांच्या ठिकाणी 6 जुलै ते 10 जुलै 2026 या कालावधीत पर्यटकांना व नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मान्सूनच्या विलंबाचा मराठवाड्याला फटका; फक्त 24.55 लाख हेक्टर पेरणी, कुठं किती टक्के पाऊस?

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या काही काळापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, कांचन धबधबा (हातवीज), रिव्हर्स वॉटरफॉल (नाणेघाट), किल्ले शिवनेरी, चावंड, जिवधन, हडसर, निमगिरी, आहुपे, डिंभे धरण, पोखरी घाट यासह आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि कोंढवळ धबधबा या ठिकाणी जाताना पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

अर्चना तांबे यांच्या आदेशानुसार आता वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे, धबधब्याखाली जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा चित्रीकरण करणे, मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे, बेदरकार वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, महिलांची छेडछाड करणे, मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक, डीजे किंवा वाहनांवरील स्पीकर वाजवणे अशा कृतींवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच बरोबर धबधबे, धरणे आणि नदी परिसरातील सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

follow us