Bisleri Water : प्रत्येक बाटलीबंद पाण्यात ब्रोमेट असतं?; वाचा, बाटलीबंद पाण्याचा माहिती नसलेला प्रवास

Bisleri Water Row : अनेक ग्राहक बाटलीबंद पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असेल, असा समज करून ते विकत घेतात पण...

How Bottled Water Made In Factory

How Bottled Water Made In Factory

Bisleri Water Quality Row How Bottled Water Made In Factory : बिस्लेरीच्या गोवा येथील प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या एका नमुन्यात ब्रोमेट आणि PAHs आढळल्याच्या नियामक तपासणीनंतर बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, बाटलीबंद पाणी तयार होण्याची प्रक्रिया नेमकी काय असते? पाणी कुठून आणलं जातं, त्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं आणि बाटलीत भरल्यानंतरही दूषित होण्याची शक्यता कुठे असते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक बाटलीबंद पाण्यात ब्रोमेट असते का? जाणून घेऊया A टू Z माहिती….

आज बाटलीबंद पाणी हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल, कार्यालय, सुपरमार्केट किंवा घर प्रत्येक ठिकाणी पाण्याची बाटली सहज उपलब्ध असते. अनेक ग्राहक बाटलीबंद पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असेल, असा समज करून ते विकत घेतात.

मात्र, बिस्लेरीच्या गोवा येथील उत्पादन प्रकल्पातील पाण्याच्या नमुन्यांबाबत समोर आलेल्या तपासणीच्या निष्कर्षांमुळे या विश्वासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका नमुन्यात ब्रोमेटच्या प्रमाणाबाबत आणि दुसऱ्या तपासणीत पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजेच PAHs च्या उपस्थितीबाबत निष्कर्ष नोंदवण्यात आले.

Bisleri Water : ‘पाणी विकणार?’ म्हणून हसले पण, प्रत्येकाच्या जिभेवर बिस्लेरी आली कशी?

पाण्यामध्ये ब्रोमेट कुठून येते?

युके सेंटर फॉर फूड सेफ्टीनुसार, पाण्यात थेट काहीही टाकल्याने ब्रोमेट तयार होत नाही. ब्रोमाइड काही पाण्याच्या स्रोतांमध्ये नैसर्गिकरित्या असू शकते. खडकांमधील खनिजे विरघळल्याने, औद्योगिक सांडपाण्यामुळे आणि काही प्रकरणांमध्ये कीटकनाशकांच्या वापरामुळेही ते पाण्यात प्रवेश करू शकते. जेव्हा पाण्यावर ओझोनद्वारे प्रक्रिया केली जाते, तेव्हा याच ब्रोमाइडचे ब्रोमेटमध्ये रूपांतर होऊ शकते. त्यामुळे, बाटलीबंद पाण्याच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान ब्रोमाइडच्या पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक मानले जाते.

बाटलीबंद पाण्यात ओझोनचा वापर का केला जातो?

अनेक पॅकेज्ड वॉटर कंपन्या पाणी निर्जंतुक करण्यासाठी ओझोनचा वापर करतात. ही पाणी निर्जंतुक करण्याची एक पद्धत आहे आणि यामध्ये क्लोरीनच्या वापराची आवश्यकता नसते. तथापि, जर पाण्यात आधीपासूनच ब्रोमाइड असेल, तर ओझोनच्या संपर्कात आल्यावर त्याचे ब्रोमेटमध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणूनच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान ब्रोमाइडचे प्रमाण नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. Bisleri Water Quality Row How Bottled Water Made In Factory

प्रत्येक बाटलीबंद पाण्यात ब्रोमेट असते का?

प्रत्येक बाटलीबंद पाण्यात ब्रोमेट असतेच असे नाही. बहुतेक बाटलीबंद पाणी सुरक्षा मानकांची पूर्तता करते. पण, काही प्रकरणांमध्ये ब्रोमेटचे अल्प प्रमाण आढळल्याचे नोंदवले गेले आहे. म्हणूनच पाण्याची नियमित तपासणी आणि प्रक्रिया प्रक्रियेवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. जर पाण्यात ब्रोमाइडचे प्रमाण जास्त असेल आणि ओझोन प्रक्रिया योग्यरित्या नियंत्रित केली जात नसेल, तर ब्रोमेट तयार होण्याचा धोका वाढू शकतो.

ब्रोमेट किती धोकादायक आहे?

ब्रोमेटबाबतची सर्वात मोठी चिंता म्हणजे त्याचा दीर्घकाळ संपर्क. ब्रोमेटच्या दीर्घकालीन संपर्कामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तसेच, त्याचा मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो, असेही आढळून आले आहे. म्हणूनच पिण्याच्या पाण्यातील ब्रोमेटच्या पातळीवर मर्यादा निश्चित केल्या जातात. ईपीएने (EPA) पिण्याच्या पाण्यातील ब्रोमेटसाठी आंतरराष्ट्रीय मानक प्रति लिटर 10 मायक्रोग्रॅम असे निश्चित केले आहे. परंतु, पाण्यात केवळ ब्रोमेटच्या उपस्थितीमुळे ते प्यायल्याने लगेचच हानी होईलच असे नाही. मुख्य चिंता दीर्घकालीन संपर्काची आहे. त्यामुळे, पाण्याची पातळी शिफारस केलेल्या मर्यादेत ठेवणे महत्त्वाचे आहे.

पाण्यात कॅन्सरला कारणीभूत घटक सापडले! FSSAI च्या कारवाईवर बिस्लेरीचं स्पष्टीकरण काय?

बाटलीबंद पाण्याचा प्रवास नेमका कुठून सुरू होतो?

आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाटलीबंद पाण्याचा प्रवास नेमका कुठून सुरू होतो? तर, बाटलीबंद पाणी तयार करण्याची प्रक्रिया कारखान्यातील मशीन सुरू होण्याच्या आधीच सुरू होते. सर्वप्रथम कंपनीला पाण्याचा योग्य स्रोत निश्चित करावा लागतो. यासाठी जमिनीखालील जलसाठे, नैसर्गिक झरे किंवा काही परिस्थितींमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा स्रोत वापरला जाऊ शकतो. मात्र, स्रोत कोणताही असला तरी त्यातील पाणी सुरक्षित आहे की नाही, याची तपासणी करणं आवश्यक असतं. पाण्याच्या स्रोताचं सर्वेक्षण केलं जातं. त्यातील खनिजांचं प्रमाण, रासायनिक घटक आणि संभाव्य सूक्ष्मजीव यांची तपासणी केली जाते. आवश्यक परवानग्या आणि नियामक अटी पूर्ण झाल्यानंतरच उत्पादनासाठी पाणी वापरण्याची प्रक्रिया पुढे जाते.

कारखान्यात पाण्याची प्राथमिक तपासणी कशी होते?

स्रोत निश्चित झाल्यानंतर पाणी थेट बाटल्यांमध्ये भरलं जात नाही. सर्वप्रथम ते मोठ्या साठवण टाक्यांमध्ये जमा केलं जातं. त्यानंतर पाण्यातील गाळ, माती आणि इतर मोठे कण वेगळे करण्याची प्रक्रिया केली जाते. या टप्प्यावर पाण्याची गुणवत्ता आणि त्यातील रासायनिक घटक तपासले जातात. पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाक्या, पाइपलाइन आणि इतर उपकरणांची स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारखान्यातील पाइपलाइन आणि टाक्या अस्वच्छ असतील, तर शुद्धीकरणाच्या आधी किंवा नंतरही पाणी दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादन सुरू करण्यापूर्वी यंत्रसामग्रीची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केलं जातं.

पाण्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं?

पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टर आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र, प्रत्येक कारखान्यात ही प्रक्रिया अगदी सारखीच असेल असं नाही. पाण्याचा मूळ स्रोत आणि त्याची गुणवत्ता यानुसार शुद्धीकरणाची पद्धत ठरवली जाते.

1. मेकॅनिकल फिल्ट्रेशन : या प्रक्रियेत पाण्यातील वाळू, गाळ, धूळ आणि इतर मोठे कण काढून टाकले जातात. ही पाण्याच्या स्वच्छतेची प्राथमिक पायरी असते.

2. ॲक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर : या फिल्टरचा वापर पाण्यातील क्लोरीन, काही सेंद्रिय घटक आणि अवांछित वास कमी करण्यासाठी केला जातो.

3. रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) : काही कारखान्यांमध्ये पाणी अतिशय सूक्ष्म झिल्लीमधून (गाळणी) सोडलं जातं. या प्रक्रियेमुळे पाण्यातील विरघळलेले क्षार आणि अनेक प्रकारच्या अशुद्धी कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेनंतर पाण्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं. त्यासाठी अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच UV किरणांचा किंवा ओझोनचा वापर केला जाऊ शकतो. या प्रक्रियेमुळे पाण्यातील अनेक हानिकारक सूक्ष्मजीव निष्क्रिय होण्यास मदत होते.

बाटलीबंद पाण्याच्या कारखान्यातील प्रक्रिया सर्व कंपन्यांमध्ये सारखी नसते. RO, UV, ओझोन किंवा खनिजांची भर घालणं प्रत्येक उत्पादनासाठी अनिवार्य असेल असे नाही. काही कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियांमध्ये पाण्यात खनिजांचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते बदलही केले जातात. मात्र, शुद्धीकरण झालं म्हणजे पाणी कायमस्वरूपी सुरक्षित झालं, असं समजणं चुकीचं ठरेल. त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रण आवश्यक असतं.

शुद्धीकरणानंतरही पाण्यात दूषित घटक कसे येऊ शकतात?

पाण्याचं शुद्धीकरण योग्य झालं, तरी त्यानंतर वापरल्या जाणाऱ्या टाक्या, पाइपलाइन, फिल्टर, यंत्रसामग्री किंवा पॅकेजिंगमध्ये त्रुटी असल्यास पाणी पुन्हा दूषित होऊ शकतं. उदाहरणार्थ, ओझोनचा वापर करताना पाण्यात नैसर्गिकरीत्या ब्रोमाइड आयन असतील, तर, योग्य परिस्थितीत ब्रोमेट तयार होऊ शकतं. त्यामुळे ओझोन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणं आणि अंतिम पाण्यात ब्रोमेटची तपासणी करणं महत्त्वाचं ठरतं.

तर PAHs म्हणजे पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स हा रासायनिक घटकांचा एक समूह आहे. हे घटक पर्यावरणातील प्रदूषण, ज्वलनातून निर्माण होणारे अवशेष किंवा काही औद्योगिक प्रक्रियांशी संबंधित असू शकतात. पाण्याच्या नमुन्यात ते आढळल्यास त्यांचा स्रोत आणि प्रमाण तपासणं आवश्यक असतं. म्हणजेच, केवळ पाणी फिल्टर करणं पुरेसं नाही. संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत रासायनिक आणि सूक्ष्मजीवविषयक तपासणी करणं गरजेचं असतं.

पाण्याची बाटली कशी तयार होते?

पाणी शुद्ध झाल्यानंतर ते ज्या बाटलीत भरलं जाणार आहे, ती बाटलीही सुरक्षित आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्या PET म्हणजेच पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेट या पदार्थापासून तयार केल्या जातात. सुरुवातीला या बाटल्या तयार नसतात, तर त्या लहान टेस्ट ट्यूबसारख्या दिसणाऱ्या प्रीफॉर्मच्या स्वरूपात असतात. या प्रीफॉर्मला नियंत्रित तापमानात गरम करून विशेष मशीनच्या साहाय्याने हवा आणि दाब दिला जातो. त्यामुळे तो फुगून बाटलीचा आकार घेतो. या प्रक्रियेला ‘ब्लो मोल्डिंग’ म्हणतात.

बाटल्या तयार झाल्यानंतर त्यांची स्वच्छता केली जाते. उत्पादन प्रक्रियेनुसार शुद्ध हवेचा दाब, पाण्याने धुणं किंवा इतर योग्य निर्जंतुकीकरण पद्धती वापरल्या जाऊ शकतात. बाटल्यांचे झाकणही स्वच्छ आणि सुरक्षित स्थितीत ठेवणं आवश्यक असतं. या टप्प्यावर धूळ, बाहेरील कण किंवा अन्य दूषित घटक बाटलीत गेले, तर त्याचा परिणाम अंतिम उत्पादनावर होऊ शकतो.

बाटलीमध्ये पाणी कसं भरलं जातं?

बाटल्या तयार झाल्यानंतर त्या कन्व्हेयर बेल्टच्या मदतीने फिलिंग मशीनपर्यंत पोहोचतात. आधुनिक कारखान्यांमध्ये या मशीनद्वारे एकाच वेळी अनेक बाटल्यांमध्ये नियंत्रित प्रमाणात पाणी भरलं जातं. पाणी भरताना उत्पादन क्षेत्रातील स्वच्छता आणि नियंत्रित वातावरण राखणं महत्त्वाचं असतं. कारण या टप्प्यावर बाहेरील सूक्ष्मजीव किंवा इतर दूषित घटक पाण्यात मिसळण्याची शक्यता असते.

पाणी भरल्यानंतर बाटल्या तातडीने कॅपिंग मशीनकडे पाठवल्या जातात. तिथे त्यांना झाकण लावून सीलबंद केलं जातं. झाकण व्यवस्थित बसलं आहे का, सीलमध्ये काही दोष आहे का, बाटलीतून पाणी गळतंय का, याची तपासणी केली जाते. त्यामुळे हा टप्पाही अत्यंत महत्त्वाचा असतो.

लेबलिंग आणि पॅकेजिंगमध्ये कोणती माहिती दिली जाते?

बाटली सीलबंद झाल्यानंतर तिच्यावर लेबल लावलं जातं. या लेबलवर ब्रँडचं नाव, उत्पादनाची माहिती, उत्पादकाचा तपशील, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि ‘बेस्ट बिफोर’ यांसारखी माहिती दिली जाते. यातील बॅच क्रमांक विशेष महत्त्वाचा असतो. कारण एखाद्या विशिष्ट बॅचमध्ये गुणवत्ता किंवा सुरक्षिततेबाबत समस्या आढळल्यास त्या बॅचचा मागोवा घेणं आणि संबंधित उत्पादन बाजारातून परत मागवणं शक्य होतं. त्यानंतर बाटल्यांचे सहा, बारा किंवा इतर संख्येचे पॅक तयार केले जातात. हे पॅक कार्टन किंवा श्रिंक रॅपमध्ये बंद करून गोदामात आणि पुढे बाजारपेठेत पाठवले जातात. उत्पादन कारखान्यातून बाहेर पडल्यानंतरही त्याची सुरक्षितता महत्त्वाची असते. कारण, बाटल्या थेट सूर्यप्रकाशात किंवा अयोग्य तापमानात ठेवल्या गेल्या, तसेच वाहतुकीदरम्यान त्यांचं नुकसान झालं, तर उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

ग्राहकांनी बाटलीबंद पाणी घेताना काय काळजी घ्यावी?

बाटलीबंद पाणी विकत घेताना काही साध्या गोष्टी तपासल्या, तर संभाव्य धोका टाळण्यास मदत होऊ शकते. यासाठी जेव्ह -जेव्हा पाण्याची बाटली विकत घ्याल त्यावेळी खालील बाबी अवश्य तपासा. जसे की,

– सील तपासा : बाटलीचं झाकण आणि त्यावरील सील तुटलेलं किंवा सैल नसावं.

– बाटलीची स्थिती पाहा : बाटलीला तडे गेलेले, गळती होत असलेली किंवा असामान्यरीत्या खराब झालेली नसावी.

– लेबलवरील माहिती वाचा : उत्पादनाची तारीख, ‘बेस्ट बिफोर’, बॅच क्रमांक आणि उत्पादकाचा तपशील तपासा.

– साठवणुकीकडे लक्ष द्या : बाटल्या थेट सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी ठेवलेल्या असतील, तर त्या खरेदी करणं टाळा.

– संशय आल्यास तक्रार करा : पाण्याचा रंग, वास किंवा चव असामान्य वाटल्यास ते पाणी पिणं टाळा आणि संबंधित अन्नसुरक्षा यंत्रणेकडे तक्रार नोंदवा.

बिसलेरी प्रकरणामुळे बाटलीबंद पाण्याच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली असली, तरी हा मुद्दा कोणत्याही एका कंपनीपुरता मर्यादित नाही. पाण्याचा स्रोत कितीही चांगला असला, फिल्टर कितीही आधुनिक असले किंवा कारखान्यात कितीही मशीन असली, तरी प्रत्येक टप्प्यावर काटेकोर गुणवत्ता नियंत्रण आवश्यक आहे. कारण पाणी ही केवळ विक्रीसाठीची वस्तू नाही, तर थेट माणसाच्या आरोग्याशी जोडलेली गरज आहे. त्यामुळे ग्राहकांनीही बाटलीवरच्या ब्रँडपेक्षा तिची गुणवत्ता, सील आणि उत्पादनाची माहिती तपासण्याची सवय लावायला हवी हे मात्र नक्की….

Exit mobile version