डिझेलला पर्याय मिळाला! भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर; जाणून घ्या, कशी चालते ‘ग्नीन’ ट्रेन

Hydrogen Train डिझेलचा धूर नाही, कार्बन उत्सर्जन नाही... फक्त पाण्याची वाफ सोडत धावणाऱ्या रेल्वेच्या युगात भारताने ऐतिहासिक प्रवेश केला आहे.

Hydrogen Train

Hydrogen Train

How does India’s first Hydrogen Train work? : डिझेलचा धूर नाही, कार्बन उत्सर्जन नाही… फक्त पाण्याची वाफ सोडत धावणाऱ्या रेल्वेच्या युगात भारताने ऐतिहासिक प्रवेश केला आहे. स्वच्छ आणि हरित वाहतुकीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.17) भारतातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे. हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर ही ट्रेन प्रायोगिक स्वरूपात धावणार असून, हायड्रोजन तंत्रज्ञानाचा रेल्वे वाहतुकीत वापर करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. पाण्याच्या वाफेवर धावणारी भारताची ही ग्रीन ट्रेन कशी त्याची खासियत काय त्याबद्दल जाणून घेऊया…

World Emoji Day : 😂 पासून ❤️ पर्यंत… आवडते इमोजीच वाढवत आहेत मानसिक तणाव?

हायड्रोजन ट्रेन सुरू करणारा भारत पाचवा देश

जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतानेही हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला बळ देणारा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारत हायड्रोजन इंधनावर चालणारी रेल्वे सुरू करणारा जगातील पाचवा देश ठरला आहे. यापूर्वी जर्मनीने 2018 मध्ये लोअर सॅक्सनी येथे अल्स्टॉम कोराडिया आय-लिंट (Alstom Coradia iLint) ही जगातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन ट्रेन सुरू केली होती.

जपानमध्ये JR East आणि हिताची (Hitachi) यांनी हायबारी (HYBARI) या हायड्रोजन-हायब्रिड ट्रेनची चाचणी घेतली, तर चीनने 2023 मध्ये स्वतःची हायड्रोजनवर चालणारी प्रवासी ट्रेन विकसित करून प्रायोगिक सेवा सुरू केली.  यूनायटेड स्टेट्स मध्येही हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञानाच्या चाचण्या आणि पायलट प्रकल्पांवर काम सुरू आहे. या देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश झाला असून, जिंद-सोनीपत मार्गावरील स्वदेशी हायड्रोजन ट्रेनमुळे स्वच्छ आणि हरित रेल्वे वाहतुकीकडे भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

हायड्रोजनचे किती प्रकार?

हायड्रोजनचे उत्पादन कसे होते यावर अवलंबून त्याचे अनेक प्रकार आहेत.

1. हरित (ग्रीन) हायड्रोजन : हे पाण्याच्या विद्युत अपघटनाद्वारे तयार केले जाते. यासाठी लागणारी वीज सौर किंवा पवन ऊर्जेपासून मिळवली जाते. याचे कार्बन उत्सर्जन जवळजवळ शून्य असते, म्हणूनच याला सर्वात सुरक्षित मानले जाते. 

2. ब्लू हायड्रोजन : हा नैसर्गिक वायूपासून तयार केला जातो. उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारा CO₂ साठवला जातो.

3. ग्रे हायड्रोजन : नैसर्गिक वायूपासून तयार केला जातो. यामुळे उत्सर्जन कमी होते आणि CO₂ थेट वातावरणात सोडला जातो. हा जगातील सर्वाधिक उत्पादित होणारा हायड्रोजन आहे.

4. ब्लॅक हायड्रोजन : या प्रकारचा हायड्रोजन कोळशापासून तयार केला जातो. हा सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारा प्रकार आहे.

5. ब्राऊन हायड्रोजन : लिग्नाइट (तपकिरी कोळसा) पासून तयार केला जातो. यामुळे कार्बन उत्सर्जन जास्त होते.

6. गुलाबी हायड्रोजन : अणुऊर्जेचा वापर करून विद्युत अपघटनाद्वारे तयार केले जाते. याच्या उत्पादनामुळे CO₂ चे उत्सर्जन अत्यंत कमी होते. 

7. पिवळा हायड्रोजन : ग्रीड विजेपासून इलेक्ट्रोलायसिसद्वारे तयार केला जातो. उत्सर्जन विजेच्या स्रोतावर अवलंबून असते.

8. टरकॉईज हायड्रोजन: या प्रकारचा हायड्रोजन नैसर्गिक वायूच्या मिथेन पायरोलिसिसमधून तयार होतो. यामध्ये CO₂ ऐवजी घन कार्बन तयार होतो. भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनमध्ये हरित म्हणजेच ग्नीन हायड्रोजनचा वापर करण्यात आला आहे.

हायड्रोजन ट्रेन नेमकी कशी चालते?

डिझेल इंजिनप्रमाणे इंधन जाळून ही ट्रेन चालत नाही. या ट्रेनमध्ये Proton Exchange Membrane Fuel Cell (PEMFC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ट्रेनमध्ये उच्च दाबाने साठवलेला हायड्रोजन गॅस फ्युएल सेलमध्ये पाठवला जातो. येथे हायड्रोजन आणि हवेतून घेतलेल्या ऑक्सिजनमध्ये रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रॉन्समधून वीज तयार होते आणि त्याच विजेवर ट्रेनचे मोटर्स चालतात. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत धूर किंवा कार्बन उत्सर्जन होत नाही. उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता निर्माण होते. त्यामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक मानली जाते.

EMI पेक्षा भाडं अधिक परवडतंय; तरूणांच्या ट्रेंडमुळे ‘रेंटल’ मार्केटला बूस्टर : रिपोर्ट

बॅटरीचीही साथ

हायड्रोजन फ्युएल सेलद्वारे तयार होणारी वीज Lithium Iron Phosphate (LFP) बॅटरीमध्येही साठवली जाते. ट्रेन वेग घेताना ही बॅटरी अतिरिक्त ऊर्जा पुरवते, तर ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा साठवली जाते. त्यामुळे हायड्रोजनचा वापर कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते.

डिझेलपेक्षा हायड्रोजन का सरस?

ऊर्जेच्या दृष्टीने हायड्रोजन हे डिझेलपेक्षा अधिक प्रभावी इंधन मानले जाते. हायड्रोजनची ऊर्जा घनता सुमारे 120 मेगाज्यूल प्रति किलो
डिझेलची ऊर्जा घनता सुमारे 43 मेगाज्यूल प्रति किलो आहे. याशिवाय कार्बन उत्सर्जन जवळपास शून्य असल्याने पर्यावरणावर होणारा परिणामही अत्यल्प राहतो. देखभाल खर्च कमी होण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतातील सर्वात मोठे हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन

या ट्रेनसाठी हरियाणातील जिंद येथे भारतातील सर्वात मोठी रेल्वे हायड्रोजन साठवण आणि रिफ्युएलिंग सुविधा उभारण्यात आली आहे. येथे जवळपास 3,000 किलो हायड्रोजन साठवण्याची क्षमता आहे. ही सुविधा PESO कडून मान्यताप्राप्त असून NFPA-2 आणि ISO 19880 या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार विकसित करण्यात आली आहे. जर्मनीच्या TUV SUD संस्थेनेही तिचे स्वतंत्र सुरक्षा परीक्षण केले आहे.

तुम्हालाही RBI च्या ‘Digital Rupee’चा मेसेज आलाय? प्रकार काय?; 2 मिनिटांत समजून घ्या

हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये काय?

भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्येही तितकीच खास आहेत. ही ट्रेन एकूण 10 डब्यांची असून, त्यामध्ये 2 Hydrogen Driving Power Cars आणि 8 ट्रेलर कोच आहेत. या ट्रेनमधून एकावेळी सुमारे 2,600 प्रवासी प्रवास करू शकतात. ट्रेनला सध्या 75 किमी प्रतितास या कमाल वेगाने धावण्यास मंजुरी देण्यात आली असली, तरी तिचा डिझाइननुसार कमाल वेग 110 किमी प्रतितास आहे. ही ट्रेन हरियाणातील जिंद, गोहाना आणि सोनीपत या महत्त्वाच्या स्थानकांना जोडणार असून, मार्गावरील अनेक मधल्या स्थानकांनाही सेवा देणार आहे.

सुरक्षेवर विशेष भर

हायड्रोजन गळती शोधणारे सेन्सर्स, फ्लेम डिटेक्शन सिस्टीम, सतत वायुवीजन व्यवस्था, स्वयंचलित हायड्रोजन शट-ऑफ यंत्रणा आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था या ट्रेनमध्ये बसवण्यात आली आहे. प्रारंभीच्या टप्प्यात प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारीही ट्रेनसोबत असणार आहेत.

किराणा, कपडे अन् मोबाईल, लोकांचा पैसा नेमका कुठे खर्च होतो? केंद्र सरकार करणार मोठा सर्व्हे

भारतीय रेल्वेसाठी नवा अध्याय

रेल्वे मंत्रालयाच्या Research Design and Standards Organisation यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. हा केवळ एका नव्या ट्रेनचा शुभारंभ नसून, भारतीय रेल्वेच्या हरित आणि शाश्वत भविष्यातील दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरल्यास भविष्यात देशातील इतर मार्गांवरही हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात असताना भारतानेही स्वच्छ ऊर्जा, हरित तंत्रज्ञान आणि ‘नेट-झिरो’ उद्दिष्टांच्या दिशेने महत्त्वाची झेप घेतली आहे. आज जिंद-सोनीपत मार्गावर धावणारी ही हायड्रोजन ट्रेन भविष्यात भारतीय रेल्वेच्या नव्या युगाची नांदी ठरू शकते. डिझेलच्या धुराऐवजी पाण्याची वाफ सोडत धावणारी ही ‘ग्रीन ट्रेन’ केवळ पर्यावरणपूरक वाहतुकीचे प्रतीक नाही, तर आत्मनिर्भर भारत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने देशाच्या वाढत्या सामर्थ्याचीही साक्ष आहे.

Exit mobile version