Who Change Rahul Gandhi’s Pappu Image : राहुल गांधींचं नाव काढलं की, डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा बदललेला अंदाज. एकेकाळी भाजपने त्यांना ‘पप्पू’ ठरवून हिणवलं, पण आज चित्र पूर्ण बदललंय. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाढलेल्या जागा आणि राहुल गांधींकडे आलेलं विरोधी पक्षनेतेपद यावरून त्यांची नवी राजकीय ओळख स्पष्ट दिसते. कधी भारत जोडो यात्रेतून थेट जनतेशी संवाद, तर कधी संसदेत आक्रमक भूमिका… पण हा बदल घडला कसा? एकेकाळी टीकेचे लक्ष्य ठरलेल्या आणि राहुल गांधींची पडद्यामागे राहून इमेज सेट करणारे 7 महत्त्वाचे चेहरे कोणते? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया…
भारतीय कंपनीची मोठी झेप! अंतराळात उभारणार ‘पेट्रोल पंप’; कसा होणार व्यवहार?
राहुल गांधी पहिल्यांदा खासदार झाले ते वर्ष होतं 2004. त्यावेळी त्यांच्यासोबत तरुण नेत्यांची एक टीम होती. यात होते सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, आरपीएन सिंह आणि जितिन प्रसाद. या नेत्यांकडे काँग्रेसचं भविष्य म्हणून पाहिलं जायचं. हे सगळे नेते राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते. पुढे हेच नेते काँग्रेसला नवी दिशा देतील, अशीही चर्चा होती. पण काळ बदलला आणि ही टीम विखुरली. या पाचपैकी चार नेत्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल गांधींसोबत राहिले ते फक्त सचिन पायलट. जुन्या सहकाऱ्यांची साथ सुटली, पण राहुल गांधी थांबले नाहीत. त्यांनी नव्या सहकाऱ्यांना सोबत घेत आपली टीम उभी केली. आज राहुल गांधींच्या राजकारणात जो बदल दिसतो, त्यामागे या नव्या टीममधील नेत्यांचाही वाटा असल्याचं मानलं जातं.
पडद्यामागची पॉवरफुल ‘सेव्हन’ टीम
राहुल गांधींच्या टीममधलं पहिलं महत्त्वाचं नाव म्हणजे के. सी. वेणुगोपाल. वेणुगोपाल यांना राहुल गांधींच्या टीममधला महत्त्वाचा दुवा मानलं जातं. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सत्ताकारणात एकेकाळी अहमद पटेल यांचा मोठा प्रभाव होता. सोनिया गांधी आणि पक्षातील नेत्यांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. मात्र, आज काँग्रेसमध्ये के. सी. वेणुगोपाल यांची भूमिका काहीशी अशीच असल्याचं मानलं जातं. केरळमधील विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले वेणुगोपाल यांनी पक्षसंघटनेपासून ते केंद्र सरकारमधील मंत्रिपदापर्यंत काम केलं आहे. त्यामुळे संघटनेत काय चाललंय आणि सत्तेच्या राजकारणात कोणती गणितं महत्त्वाची आहेत, याचा त्यांना अनुभव आहे.
राहुल गांधींच्या राजकीय कार्यक्रमांचं नियोजन, पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय आणि महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी, अशा कामांमध्ये वेणुगोपाल यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राहुल गांधी कधी कोणता राजकीय मुद्दा उचलतील, सरकारविरोधात कोणती भूमिका घेतील, याची रणनीती ठरवताना त्यांच्या टीममधील समन्वयही महत्त्वाचा असतो. थोडक्यात काय तर, राहुल गांधींच्या राजकीय हालचाली आणि काँग्रेसची संघटनात्मक यंत्रणा यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणून वेणुगोपाल यांच्याकडे पाहिलं जातं.
वेणुगोपाल यांच्यानंतर राहुल गांधींना घडवण्यामागे दुसरं नाव घेतलं जात ते आहे अर्थात मल्लिकार्जुन खरगे यांचं. 2022 मध्ये मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती तब्बल 24 वर्षांनंतर या पदावर आली होती. त्यावेळी काँग्रेसचं नेतृत्व खरगे कितपत सांभाळू शकतील, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, राहुल गांधी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी खरगे अतिशय उत्तम सांभाळत असल्याचे चित्र आहे.
विविध राज्यांतील नेत्यांशी समन्वय साधणं, पक्षाची भूमिका ठरवणं आणि काँग्रेसची राजकीय लढाई संघटनेच्या पातळीवर पुढे नेणं, ही महत्त्वाची कामं खरगे लिलया पार पाडत आहेत. राहुल गांधींनी रस्त्यावर उतरून एखादा मुद्दा लावून धरला की, दुसरीकडे लगेच त्याच मुद्द्याला पक्षाच्या पातळीवर पाठबळ देण्याचं काम खरगे यांच्या नेतृत्वाखाली केलं जात. त्यामुळे राहुल गांधींचा आक्रमक राजकीय चेहरा आणि खरगे यांचं संघटनात्मक नेतृत्व, अशी काँग्रेसची सध्याची मांडणी अधोरेखित होताना दिसते.
वरील दोन नेत्यांचा रोल समजून घेतल्यानंतर तिसरं नाव येतं ते म्हणजे जयराम रमेश आज राहुल गांधी संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, आर्थिक विषमता आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने बोलतात. या मुद्द्यांना राजकीय चर्चेत आणण्यासाठी काँग्रेसच्या मीडिया आणि कम्युनिकेशन यंत्रणेची भूमिका महत्त्वाची आहे. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये जयराम रमेश यांचा समावेश आहे.
भारत जोडो यात्रेच्या काळात राहुल गांधींच्या भाषणांमधील मुद्दे माध्यमांपर्यंत पोहोचवणं, पत्रकार परिषदांचं नियोजन आणि सोशल मीडियावर पक्षाची भूमिका मांडणं, अशा कामांत जयराम रमेश यांची भूमिका महत्त्वाची होती. एवढेच नव्हे तर, भाजपकडून राहुल गांधींवर होणाऱ्या टीकेला उत्तर देतानाच काँग्रेसला स्वतःची वैचारिक भूमिका मांडायची होती. त्यासाठी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्याय यांसारखे मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्यात आले. त्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा केवळ भाजपवर टीका करणारा नेता अशी न राहता, वैचारिक मुद्द्यांवर भूमिका मांडणारा विरोधी पक्षनेता अशी उभी करण्याच्या प्रयत्नात जयराम रमेश यांचं नाव महत्त्वाचं ठरतं.
रमेश यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर काँग्रेसची बाजू मांडणारा आक्रमक चेहरा म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात ते म्हणजे अर्थात रणदीप सुरजेवाला होय. राजकारणात एखादा पक्ष मुद्दा उपस्थित करतो, त्यावेळी त्या मुद्द्यावर सातत्याने भूमिका मांडणं आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. रणदीप सुरजेवाला ही जबाबदारी सांभाळणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.
भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देणं, महत्त्वाच्या राजकीय विषयांवर पत्रकार परिषद घेणं आणि काँग्रेसची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडणं, ही त्यांची ओळख आहे. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे प्रभारी होते. त्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर त्यांची संघटनात्मक भूमिकाही चर्चेत आली होती. एवढचं काय तर, राहुल गांधी जेव्हा एखादा मुद्दा उपस्थित करतात, तेव्हा तो मुद्दा राजकीय चर्चेत टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या प्रवक्त्यांची फळी महत्त्वाची ठरते. सुरजेवाला यांच्या माध्यमातून काँग्रेसची भूमिका सातत्याने मांडली जाते. त्यामुळे राहुल गांधींच्या राजकीय टीममध्ये त्यांचं स्थान महत्त्वाचं मानलं जातं.
वेणुगोपळ, खरगे, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला या चार नेत्यांनंतर राहुल गांधींची इमेज बदलण्यामाग पाचवं नाव येत ते, भाजपच्या आरोपांना थेट उत्तर देणारा नेता असणाऱ्या पवन खेरा यांचं. टीव्ही डिबेट्स असोत, पत्रकार परिषद असोत किंवा सोशल मीडिया, काँग्रेसची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये पवन खेरा यांचं नाव घेतलं जातं.
2014 नंतर काँग्रेसला राजकीय पातळीवर अनेक धक्के बसले. भाजपची प्रचारयंत्रणा आणि मीडिया व्यवस्थापन यांच्याशी सामना करताना काँग्रेसलाही आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याची गरज होती. अशा वेळी खेरा यांच्यासारखे प्रवक्ते पक्षासाठी महत्त्वाचे ठरले. राहुल गांधींवर वैयक्तिक टीका झाली किंवा भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं, तर त्याला थेट उत्तर देण्याची भूमिका खेरा बजावताना दिसतात. त्यामुळे राहुल गांधींच्या राजकीय भूमिकेला सार्वजनिक चर्चेत पुढे नेणाऱ्या चेहऱ्यांमध्ये पवन खेरा यांचाही समावेश होतो.
आतापर्यंत आपण राहुल गांधींच्या टीममधील राजकीय नेत्यांची भूमिका पाहिली. पण त्यांच्या टीममध्ये असे काही सहकारीही आहेत, जे फारसे प्रसिद्धीच्या झोतात दिसत नाहीत. त्यापैकी एक नाव म्हणजे अलंकार सवाई. ICICI बँकेत काम केल्यानंतर अलंकार सवाई राहुल गांधींसोबत काम करू लागले. ते माध्यमांमध्ये फारसे दिसत नाहीत. मात्र, राहुल गांधींसाठी माहिती गोळा करणं, विविध विषयांचा अभ्यास करणं आणि राजकीय घडामोडींचं विश्लेषण करणं, अशा कामांशी त्यांचं नाव जोडलं जातं. राहुल गांधी अलीकडच्या काळात ‘व्होट चोरी’चा मुद्दा उपस्थित करताना आकडेवारी, सादरीकरणं आणि वेगवेगळ्या उदाहरणांचा आधार घेतात. अशा मुद्द्यांवर भूमिका मांडण्यासाठी केवळ भाषण पुरेसं नसतं. त्यामागे माहिती गोळा करणं, आकडे तपासणं आणि विषयाचा अभ्यास करणंही आवश्यक असतं. अलंकार सवाई यांच्यासारखे सहकारी ही पडद्यामागची बाजू सांभाळत असल्याचं सांगितलं जातं.
राहुल गांधींच्या टीममधील सातवं नाव म्हणजे कौशल विद्यार्थी. मूळचे बिहारचे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकलेले ते राहुल गांधी यांचे पर्सनल सेक्रेटरी आहे संसदेचे अधिवेशन असो किंवा राहुल गांधींचा कुठलाही दौरा असो विद्यार्थी हे नेहमी त्यांच्या सोबत दिसून येतात. राहुल गांधींच रोजच वेळापत्रक त्यांच्या भेटीगाठी ठरवणं त्यासाठी प्लॅनिंग करणं ही जबाबदारी कौशल विद्यार्थी यांच्याकडे आहे. एखाद्या मोठ्या नेत्याच्या कामात भाषणं आणि राजकीय निर्णय जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्व त्याच्या दैनंदिन कामकाजाच्या नियोजनालाही असतं.
राहुल गांधींचे दौरे, भेटीगाठी, सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर महत्त्वाच्या कामांचं वेळापत्रक सांभाळण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा काम करते. विविध नेत्यांशी समन्वय ठेवणं आणि कार्यक्रमांसाठी आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देणं, अशा जबाबदाऱ्यांमध्ये कौशल विद्यार्थी यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. कारण राजकारणात योग्य माहिती योग्य वेळी मिळणं गरजेचं असतं. पक्षातील नेत्यांचा अभिप्राय, स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि राजकीय घडामोडी यांची माहिती वेळेत मिळाली, तर भूमिका ठरवणं आणि कार्यक्रमांचं नियोजन करणं सोपं होतं. कौशल विद्यार्थी यांच्यासारखे सहकारी ही यंत्रणा सुरळीत ठेवण्याचं काम करतात.
एकूणच काय तर मागच्या काही वर्षांमध्ये राहुल गांधी यांची देशभरातली इमेज नक्कीच बदलल्याच दिसून येतय. 2023 च्या भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या राजकारणाची स्टाईलच बदलली आहे.याचा फायदा पक्षाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झाला होता. आताही देशभरात सरकार विरुद्ध वातावरण निर्माण करण्यामध्ये काँग्रेसला याचाच फायदा होतोय.
पण, गेल्या काही वर्षांत राहुल गांधींची बदललेली शैली आणि हा आक्रमक अवतार एका रात्रीत आलेला नाही. वेणुगोपाल आणि खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची साथ, जयराम रमेश-सुरजेवाला-खेरा यांची धडाकेबाज बाजू, आणि अलंकार सवाई-कौशल यांच्यासारख्या पडद्यामागच्या सहकाऱ्यांची मेहनत… या सगळ्यांच्या एकत्र एफर्ट्समुळे राहुल गांधींचा हा नवा आणि मजबूत अवतार समोर आला आहे. त्याशिवाय राहुल गांधींचं स्वतःचं नेतृत्व, त्यांनी निवडलेले राजकीय मुद्दे, पक्षसंघटनेचं काम, माध्यमांमधून होणारी मांडणी आणि पडद्यामागून काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा समन्वय, या सगळ्या गोष्टींचा त्यात वाटा आहे.
मात्र, राहुल गांधींची प्रतिमा बदलली म्हणजे काँग्रेससमोरची सगळी आव्हानं संपली, असं नाही. निवडणुकीतील यश टिकवणं, पक्षसंघटना मजबूत करणं आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणं, ही आव्हानं अजूनही आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.
