“ज्ञानेश कुमार माफिया, यांच्याशी कसे निपटायचे हे आम्हाला माहिती आहे”; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राऊत संतापले!

India Alliance Meeting Gyanesh Kumar: इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

India Alliance Meeting Gyanesh Kumar

India Alliance Meeting Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा केला. तर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ज्ञानेश कुमार यांना ‘माफिया’ संबोधत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष देशभर सुरू राहील, असा इशाराही विरोधकांनी दिला.

काँग्रेस खासदारावर 11 विद्यार्थिनींचे लैंगिक छळाचे आरोप; भाजप महिला आक्रमक, उद्या काँग्रेस कार्यालयाबाहेर मोर्चा!

‘ज्ञानेश कुमार वाचणार नाहीत’, तेजस्वी यादवांचा दावा

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. ज्ञानेश कुमार यांना शिक्षा मिळणार असून ते यातून वाचू शकणार नाहीत, असे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून संवैधानिक संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जंतरमंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारून आंदोलकांना मैदानाबाहेर जाण्यास सांगितले जात असल्याचा मुद्दाही यादव यांनी उपस्थित केला. सरकार आंदोलनाला घाबरत असल्याचा आरोप करत, विरोधकांचा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊतांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “ज्ञानेश कुमार माफिया आहेत. त्यांनी व्यवस्थेचे अपराधीकरण केले आहे. यांच्याशी कसे निपटायचे, हे आम्हाला माहिती आहे,” असे राऊत म्हणाले.

मुंबईत प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार; बुलेट ट्रेनसोबत पॉड टॅक्सी आणि ड्रायव्हरलेस बसचं जाळं उभारणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने दिल्लीतील रस्त्यांवर सुरक्षा दल तैनात केले असले, तरी आंदोलन थांबणार नाही. दिल्लीसह देशातील विविध राज्यांत हा संघर्ष सुरू राहील, असा दावाही त्यांनी केला.

‘संविधान धोक्यात’; सुप्रिया सुळेंचा आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही इंडिया आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी विरोधक एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

“दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे आंदोलन सुरू राहील,” अशी भूमिका सुळे यांनी मांडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंडिया आघाडीसोबत ठामपणे उभे राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीच्या बैठकीला कोण उपस्थित?

दिल्लीतील या बैठकीला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, डी. के. शिवकुमार, सुखविंदर सिंह सुखू, सुप्रिया सुळे, डी. राजा, महुआ मोइत्रा, योगेंद्र यादव, सचिन पायलट आणि नेहा बोरा यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

WhatsApp चं मोठं अपडेट! मेसेज, फोटो अन् व्हिडिओ शेड्यूल करून पाठवता येणार

महाराष्ट्रातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, वर्षा गायकवाड, छत्रपती शाहू, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, कल्याण काळे, प्रणिती शिंदे, प्रशांत पडोळे, श्यामकुमार बर्वे, निलेश लंके आणि विजय वडेट्टीवार बैठकीला उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलन आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा या बैठकीत केंद्रस्थानी राहिला. विरोधकांनी आंदोलन देशभर नेण्याची भूमिका मांडल्याने आगामी काळात या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि इंडिया आघाडी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

follow us