How to Identify Fake Currency Notes : दिवाळीचा सण जवळ आला की बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेत काही भामटे बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करतात. (Fake Currency) सध्या देशातील विविध भागांत पोलिसांकडून छापे टाकून नकली नोटा जप्त केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
बाजारातील गर्दी आणि घाईगडबडीत अनेकदा ग्राहक दुकानदारांना पैसे देताना किंवा सुट्टे पैसे घेताना नोटा तपासत नाहीत. याच निष्काळजीपणाचा फायदा ठगांकडून घेतला जातो. त्यामुळे मेहनतीने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अस्सल आणि बनावट नोटांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. नोटेवरील महात्मा गांधी यांचे छायाचित्र हा त्यासाठीचा एक महत्त्वाचा संकेत आहे. अस्सल नोटेवरील छायाचित्र स्पष्ट आणि बारकाईने छापलेले असते, तर बनावट नोटेवरील छायाचित्र अनेकदा अस्पष्ट आणि सपाट दिसते.
445 मिलियन डॉलर बुडाले, ट्रम्पही हरले; आता मस्क यांच्या मानगुटावर चौकशीचा ससेमिरा
नोटेवरील सुरक्षा धागा आणि वॉटरमार्क तपासूनही तिची सत्यता पडताळता येते. अस्सल नोटेवरील सुरक्षा धागा तिरपा केल्यावर हिरव्या रंगातून निळ्या रंगात बदलताना दिसतो. तसेच नोट प्रकाशासमोर धरल्यास रिकाम्या जागेत महात्मा गांधी यांचे छायाचित्र आणि नोटेचे मूल्य दर्शविणारा वॉटरमार्क दिसतो. बनावट नोटांमध्ये या सुरक्षा खुणा योग्य प्रकारे नसू शकतात. त्यामुळे नोट हातात घेतल्यानंतर या खुणा काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.
अस्सल नोटेची छपाई उच्च दर्जाची असल्याने त्यावरील अशोक स्तंभ, महात्मा गांधी यांचे छायाचित्र आणि मुख्य मूल्य दर्शविणाऱ्या काही भागांना स्पर्श केल्यास विशिष्ट उंचवटा जाणवतो. मात्र, बनावट नोटांवरील छपाई अनेकदा सपाट आणि कमी दर्जाची असते. त्यामुळे नोट हातात घेताना तिचा पोत आणि छपाईकडेही लक्ष द्यावे. दिवाळीच्या खरेदीदरम्यान केवळ नोटेचा रंग किंवा आकार पाहून व्यवहार करू नका, तर तिच्यावरील सुरक्षा वैशिष्ट्यांची पडताळणी करा.
