IITian Student Rejects Rs 32 LPA Job For Peace : आजच्या स्पर्धात्मक युगात चांगला पगार आणि मोठे पॅकेज हेच यशाचे मापदंड मानले जातात. मात्र, एका IIT पदवीधर तरुणीने तब्बल 32 लाख रुपये वार्षिक (LPA) पगाराची नोकरी नाकारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मनःशांती, सुरक्षितता आणि चांगल्या जीवनमानासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. 32 लाखांच्या पॅकेजला नकार देणाऱ्या IITian तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे करिअर आणि आयुष्यातील प्राधान्यक्रमांबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहे ही तरुणी?
स्नेहा प्रिया असे 32 लाखांचे पॅकेज नाकारणाऱ्या IITian तरुणीचं नाव आहे. स्नेहा प्रिया IIT रुरकीच्या माजी विद्यार्थिनी असून डेटा सायंटिस्ट आहे. प्रियाला गुरुग्राममध्ये 32 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र, ही आकर्षक ऑफर स्वीकारण्याऐवजी बेंगळुरूमध्येच राहण्याचा निर्णय स्नेहा प्रियाने घेतला.
‘मोठ्या पगारापेक्षा मनःशांती महत्त्वाची’
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्नेहाने आपल्या निर्णयामागील भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यात ती म्हणते की, “आज मला गुरुग्राममध्ये नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती आणि बेंगळुरूला निरोप द्यायचा होता. पण मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या सर्व शंका दूर करत बेंगळुरूने मला दुहेरी इंद्रधनुष्याची भेट दिली. कधी कधी सर्वोत्तम करिअरचा निर्णय हा सर्वाधिक पगाराचा नसतो, तर मनःशांती देणारा असतो ही पोस्टमधील ओळ अनेकांना भावली.
सुरक्षिततेचा मुद्दा ठरला निर्णायक
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार स्नेहाच्या मते, या निर्णयामागे सर्वात मोठे कारण म्हणजे वैयक्तिक सुरक्षितता. IIT रुरकीमध्ये शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर दिल्ली-एनसीआर परिसरात अनेकदा गेल्यावर काही अप्रिय अनुभव आले. त्यामुळे गुरुग्राममध्ये स्थलांतर करण्याबाबत साशंकता होत्या. याउलट, बेंगळुरूमध्ये मला नेहमीच सुरक्षित वातावरण, मदत करणारी माणसे आणि घरासारखी भावना मिळाली.
सोशल मीडियावर रंगली चर्चा
स्नेहाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पैसा सर्वकाही नसतो, मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची, जीवनाचा दर्जा पगारापेक्षा मोठा असतो अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या दिल्या आहेत. तर काहींनी मोठे पॅकेज सोडण्याचा निर्णय कठीण असल्याचे सांगत, प्रत्येकाची प्राधान्ये वेगळी असू शकतात, असे मत व्यक्त केले आहे.
यशाची नवी व्याख्या?
स्नेहा प्रियाने भल्या मोठ्या पॅकेजची नोकरी केवळ मनःशांतीसाठी नाकारली आहे. पण, या निर्णयाने करिअरमध्ये यश म्हणजे केवळ मोठा पगार की समाधान, सुरक्षितता आणि चांगले जीवनमान? हा एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. आजच्या तरुण पिढीसाठी करिअर म्हणजे फक्त आर्थिक प्रगती नसून मानसिक आरोग्य, वैयक्तिक सुरक्षितता, समतोल आणि मनःशांती हेही तितकेच महत्त्वाचे घटक बनत आहेत. त्यामुळे स्नेहा यांचा निर्णय हा केवळ एका नोकरीचा नाही, तर बदलत्या करिअर संस्कृतीचे आणि नव्या पिढीच्या विचारांचे प्रतीक म्हणूनही पाहिला जात आहे.
