Download App

मोठी बातमी : तामिळनाडूमध्ये बनावट दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू, 33 जणांवर उपचार सुरू

In Tamil Nadu, 10 people died due to Spurious liquor, more than 24 hospitalized : तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात कथितरित्या बनावट दारू (Spurious Liquor) प्यायल्याने 3 महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बनावट दारूमुळे बळी पडलेल्या एकूण 33 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी (Police) दोन्ही जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षक आणि 4 उपनिरीक्षकांना निलंबित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विल्लुपुरम जिल्ह्यातील मरक्कनमजवळील इक्कियारकुप्पम येथील रहिवासी असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर चेंगलपट्टू जिल्ह्यातील मदुरंथागममध्ये शुक्रवारी दोन लोकांचा मृत्यू झाला आणि रविवारी एका जोडप्याचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट दारू प्यायल्याने अनेक लोक आजारी पडले असून ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या लोकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

आयजी एन कन्नन यांचे कारवाईचे संकेत
या घटनेनंतर पोलिस महानिरीक्षक (उत्तर) एन कन्नन यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की सर्व 10 पीडितांनी इथेनॉल-मिथेनॉल पदार्थांनी युक्त मद्य प्राशन केले होते.

ते म्हणाले की, तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात बनावट दारूमुळे मृत्यूच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत आणि आतापर्यंत पोलिसांना या दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, परंतु पोलीस तपास करत आहेत.

त्यांनी माहिती दिली की बनावट दारूच्या दोन घटना घडल्या आहेत, एक चेंगलपट्टू जिल्ह्यात आणि दुसरी विल्लुपुरम जिल्ह्यात. डोळ्यात जळजळ आणि चक्कर आल्याच्या तक्रारींनंतर मारक्कनमजवळील विल्लुपुरम जिल्ह्यातील एक्कीयरकुप्पम गावात सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला.

Mocha Cyclone : मोखा चक्रीवादळाने धारण केलं रौद्ररूप, किनारी भागाला सतर्कतेचा इशारा

33 आजारी लोकांवर उपचार सुरू
रविवारी विल्लुपुरममध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना आयजी म्हणाले की 33 लोकांवर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी अमरन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट दारूही जप्त करण्यात आली.

आयजी एन कन्नन यांनी चेंगलपट्टू जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेबाबत सांगितले की, येथे चार जणांचा मृत्यू झाला आहे. चेंगलपट्टू जिल्ह्यातील चिथमूर येथे एक प्रकरण नोंदवले गेले, जिथे एकाच कुटुंबातील दोन लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला कौटुंबिक वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न असावा असे आम्हाला वाटले, परंतु त्याची लक्षणे पाहिल्यानंतर आम्हाला ही बनावट दारूची घटना असल्याचा संशय आला.

दोन्ही घटनांतील काही आरोपी फरार : आयजी

आयजी म्हणाले की, चेंगलपट्टूमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात अलर्ट जारी करण्यात आला होता. नंतर, अशीच लक्षणे असलेल्या आणखी दोन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण चार जणांचा मृत्यू झाला, तर पाचव्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी एका आरोपी अम्मावसईला अटक करण्यात आली आहे.

आयजी यांनी सांगितले की, सर्व मृतांनी इथेनॉल आणि मिथेनॉल मिश्रित विकृत अल्कोहोलचे सेवन केले असावे. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता असू शकते. दरम्यान, दोन्ही घटनांमधील काही आरोपी फरार असून आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. आयजी म्हणाले, “विलुपुरम मारक्कनममध्ये 2 निरीक्षक आणि 2 उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, चेंगलपट्टू घटनेप्रकरणी एक निरीक्षक आणि 2 उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

 

Tags

follow us