नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. इंडिया अलायन्सची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे होणार होती. मात्र ही जाहीर सभा रद्द करण्यात आल्याचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी सांगितलं
इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीच्या यशस्वी आयोजनानंतर इंडियाच्या समन्वय समितीची दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पहिली बैठक झाली. समन्वय समितीच्या या बैठकीत इंडिया आघाडीची सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. समन्वय समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीची पहिली बैठक सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होणार असल्याची घोषणा केली होती. पण आता अचानक ही सभा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्य काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांनी दिली.
….त्यांना सनातन शब्दाचा अर्थ माहीत आहे का?, उदयनिधींच्या वक्तव्यावर RSS चा थेट सवाल
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंडिया आघाडीची खिल्ली उडवली आणि सांगितले की, लोकांमध्ये संताप आहे म्हणूनच विरोधकांनी सभा रद्द केली. ते म्हणाले, जनतेत संताप आहे. सनातन धर्माचा अपमान करण्यात आला. डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना केली गेली. मध्य प्रदेशातील जनता सनातन धर्माचा हा अपमान सहन करणार नाही. इंडिया आघाडीने आमच्या श्रद्धा दुखावल्या आहेत आणि हे सहन केले जाणार नाही. इंडिया आघाडी घाबरली आहे, म्हणून त्यांनी त्यांची सभा रद्द केली. जनतेचा राग हा इंडिया आघाडी आणि काँग्रेसविरोधात आहे. जनता त्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री चौहान म्हणाले.
शिवाय, जागावाटपाबाबत या इंडियामध्ये धुसफुस होणार आहे. कारण, काँग्रेसपासून फारकत घेऊन वेगळे बनलेले प्रादेशिक पक्ष इंडियात अधिक आहेत. त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवायचे आहे. इंडिया आघाडीतील अंतर्गत मतभेदांमुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पहिलीच सभा रद्द झाल्यामुळे, आता इंडिया आघाडीत सर्व काही आलेबेल आहे ना, अशी चर्चा सुरू झााली.