भारताची पहिली बर्ड फ्लू व्हॅक्सिन तयार, अंडी-चिकन स्वस्त होणार? वाचा डिटेल्स

India Developed First Bird Flu Vaccine 'बर्ड फ्लू' ज्याचे नाव ऐकताच पोल्ट्री शेतकऱ्यांच्या अंगावर काटा येतो पण आता....

India Developed First Bird Flu Vaccine

India Developed First Bird Flu Vaccine

India Developed First Bird Flu Vaccine : ‘बर्ड फ्लू’ ज्याचे नाव ऐकताच पोल्ट्री शेतकऱ्यांच्या अंगावर काटा येतो पण आता, या संकटावर भारताने एक मोठा उपाय शोधला असून, भारताने देशातील पहिली स्वदेशी H5N1 बर्ड फ्लू व्हॅक्सिन तयार केलीय. यामुळे पोल्ट्री क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पण ही व्हॅक्सिन नेमकी कशी काम करणार? ती कोंबड्यांना बर्ड फ्लूपासून वाचवू शकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामुळे चिकन आणि अंड्यांच्या किमतींवर काय परिणाम होणार? जाणून घेऊया….

भारताची पहिली स्वदेशी व्हॅक्सिन नेमकी काय आहे?

भोपाल येथील ICAR अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेतील (NIHSAD) शास्त्रज्ञांनी ही स्वदेशी व्हॅक्सिन विकसित केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान 20 नोव्हेंबर 2026 रोजी भोपाल येथे या व्हॅक्सिनचे राष्ट्रार्पण करणार असल्याची माहिती समोर आलीये. ही व्हॅक्सिन विशेषतः H5N1 या बर्ड फ्लूच्या विषाणूविरोधात तयार करण्यात आली आहे  आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही एक निष्क्रिय म्हणजेच Inactivated Vaccine आहे. यामध्ये निष्क्रिय केलेल्या विषाणूचा वापर करून कोंबड्यांच्या शरीरात त्या विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

आता प्रश्न असा पडतो की, या व्हॅक्सिनची गरज नेमकी का भासली? तर, बर्ड फ्लू हा पोल्ट्री उद्योगासाठी अत्यंत गंभीर आजार आहे. H5N1 या विषाणूमुळे होणाऱ्या बर्ड फ्लूमध्ये संक्रमित कोंबड्यांचा मृत्यूदर काही परिस्थितींमध्ये जवळपास 100 टक्क्यांपर्यंत जातो. म्हणजेच एखाद्या पोल्ट्री फार्ममध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला, तर संपूर्ण व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. 2006 मध्ये भारतात बर्ड फ्लूचा पहिला प्रादुर्भाव नोंदवला गेला. त्यानंतर देशात H5N1 आणि H5N8 चे अनेक प्रादुर्भाव झाले याचा फटका केवळ पोल्ट्री व्यावसायिकांनाच बसत नाही, तर अंडी, चिकन उत्पादन, पुरवठा व्यवस्था आणि निर्यातीवरही होतो.

भारताने विकसित केलेली ही व्हॅक्सिन H5N1 च्या Clade 2.3.2.1a या विशिष्ट प्रकाराला लक्ष्य करते. व्हॅक्सिन दिल्यानंतर कोंबड्यांच्या शरीरात संबंधित विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यात विषाणूचा संपर्क आल्यास गंभीर आजाराचा धोका कमी होऊ शकतो. मात्र, व्हॅक्सिन म्हणजे बर्ड फ्लूवर शंभर टक्के हमी नाही. तिची प्रत्यक्ष परिणामकारकता, किती डोस द्यावे लागतील, संरक्षण किती काळ टिकेल आणि विषाणूचा प्रसार रोखण्याची क्षमता किती आहे, हे प्रत्यक्ष वापर आणि संशोधनातून स्पष्ट होईल. त्यामुळे जैवसुरक्षा, स्वच्छता, नियमित तपासणी आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन तितकेच महत्त्वाचे राहणार आहे. H5N1 हा विषाणू माणसांनाही संक्रमित करू शकतो; मात्र कोंबड्यांसाठीची ही व्हॅक्सिन माणसांना बर्ड फ्लूपासून संरक्षण देईल की नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

सामान्य ग्राहकांनाही फायदा होणार?

स्वाईन फ्लू व्हॅक्सिनचा अप्रत्यक्ष फायदा सामान्य ग्राहकांनाही होऊ शकतो. कारण बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला की अनेकदा कोंबड्यांची विक्री, अंडी आणि चिकनचा पुरवठा प्रभावित होतो. त्यामुळे बाजारपेठेत दरांमध्ये चढ-उतार होते. जर लसीकरणामुळे पोल्ट्री क्षेत्रातील रोगाचा धोका प्रभावीपणे कमी झाला, तर उत्पादन आणि पुरवठा स्थिर ठेवण्यास मदत होईल पण, चिकन आणि अंड्यांचे दर लगेच कमी होतील, असे आता तरी सांगणे कठीण आहे.

भारताची ही पहिली स्वदेशी H5N1 व्हॅक्सिन म्हणजे केवळ एक वैद्यकीय संशोधन नाही, तर देशाच्या पोल्ट्री उद्योगासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र खरी कसोटी या व्हॅक्सिनची प्रत्यक्ष परिणामकारकता, किंमत, उपलब्धता आणि देशभरातील वापरावर अवलंबून आहे.

Exit mobile version