Ayatollah Ali Khamenei Funeral : अमेरिका आणि इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारताचे दोन प्रतिनिधी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. इराणकडून गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांना अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहण्यासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी खामेनी यांच्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, भारत अंत्यसंस्कारला तेहरानला एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवणार आहे.
मीडिया अहवालांनुसार, परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा (Pabitra Margherita) आणि बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन (Syed Ata Hasnain) हे भारत सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इराणला जाणार आहे.
4 जुलैपासून अंत्यसंस्काराची प्रक्रिया
खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया 4 जुलैपासून सुरू होणार आहे. 7 जुलै रोजी इराणमधील पवित्र शहर ‘कोम’ (Qom) येथे विशेष शोकसभा आणि धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहे. तर 9 जुलै रोजी खामेनी यांच्या जन्मस्थानी ‘मशहद’ (Mashhad) शहरात अंतिम निरोप देण्यात येणार आहे. 86 वर्षीय अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी रोजी झाला होता. त्यांनी 36 वर्षे ‘इस्लामिक रिपब्लिक’चे सर्वोच्च नेते म्हणून इराणचे नेतृत्व केले होते.
शांतता करारानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया
इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाल्यानंतर खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतंत्रपणे डिजिटल सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तर दुसरीकडे स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही बाजूंमधील शांतताविषयक चर्चा अजूनही सुरू आहे.
2 कोटी लोकांची गर्दी होण्याची शक्यता
तेहरान, मशहद आणि कोम येथे होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमांसाठी अंदाजे 2 कोटी नागरिक जमण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक जागतिक नेतेही यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
मोजतबा खामेनी कोमात आहेत का?
तर दुसरीकडे इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते, 56 वर्षीय मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei), जनतेसमोर येतात की नाही याकडे सर्वोचे लक्ष लागून आहे. 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या ज्या हवाई हल्ल्यात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात मोजतबा जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही व्हिडिओ फुटेजमध्ये पाहिले गेलेले नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा आहे की, मोजताबा खामेनेई सध्या कोमात आहेत मात्र इराणकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
