भारताला अमेरिकेतून येणार LPG ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मीडल इस्टमधील अवलंबित्व कमी होणार !

भारताने 2027 साठी अमेरिकेकडून 27.5 लाख टन LPG खरेदीचा करार केला आहे. दर महिन्याला पाच जहाजे भारतात येणार आहेत.

LPG US Deal

LPG US Deal

India US LPG Deal 2027 : भारत आता स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) पुरवठ्यासाठी मध्यपूर्वेतील (Middle East) देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी 2027 या वर्षासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात LPG खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताला गॅस पुरवठ्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील पुरवठा विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी 2027 मध्ये अमेरिकेकडून सुमारे 27.5 लाख मेट्रिक टन LPG खरेदी करण्यासाठी करार केला आहे. या योजनेनुसार भारत दर महिन्याला अमेरिकेतून पाच मोठ्या जहाजांमधून LPG आयात करणार आहे. यापैकी चार जहाजांची डिलिव्हरी ठरलेल्या कराराच्या अटींनुसार होईल, तर एका जहाजातील गॅसची थेट अमेरिकेतून खरेदी केली जाणार आहे.

कोणत्या कंपन्यांकडून होणार LPG खरेदी?
भारताला सौदी अरामको आणि शेवरॉन या कंपन्यांकडून दर महिन्याला प्रत्येकी एक LPG जहाज मिळणार आहे. तर टोटल एनर्जीज ट्रेडिंग SA (TOTSA) या कंपनीकडून दर महिन्याला दोन जहाजांमधून LPG पुरवठा केला जाणार आहे. तसे विटोल कंपनीकडून दर महिन्याला एका जहाजाएवढी LPG खरेदी केली जाणार आहे. अशा प्रकारे दर महिन्याला पाच जहाजे भारतात पोहोचतील. एका मोठ्या LPG जहाजाची गॅस वाहून नेण्याची क्षमता सुमारे 46 हजार टन असते. LPG मध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या दोन वायूंचा समावेश असतो.

मध्यपूर्वेवरील अवलंबित्व कमी करण्याची तयारी
भारत आतापर्यंत LPG आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर मध्यपूर्वेतील देशांवर अवलंबून राहिला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, 2025 मध्ये भारताने सुमारे 2.185 कोटी टन LPG आयात केली होती. यापैकी जवळपास 90 टक्के LPG मध्यपूर्वेतील देशांकडून आली होती. त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा समुद्री वाहतुकीत अडथळे आल्यास भारताच्या LPG पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ही संभाव्य जोखीम कमी करण्यासाठी भारताने अमेरिकेकडून LPG खरेदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


2027 पर्यंत अमेरिकेकडून 25 टक्के LPG आयातीचे लक्ष्य

भारताने 2027 पर्यंत आपल्या एकूण LPG आयातीपैकी 25 टक्के गॅस अमेरिकेकडून खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या निर्णयामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्याचे विविधीकरण होण्यास मदत होणार आहे. तसेच अमेरिकेकडून ऊर्जा उत्पादनांची आयात वाढल्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संतुलन सुधारण्यासही हातभार लागू शकतो. त्यामुळे LPG खरेदीचा हा करार केवळ गॅस पुरवठ्यापुरता मर्यादित नसून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या आणि आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version