हवाई इंधन चोरीचा श्रीगोंद्यात पर्दाफाश ; टँकरचे मालकच कसे चालवायचे रॅकेट ?
Ahilyanagar crime-पोलिसांनी टँकर चालक, मालक आणि स्थानिक साथीदारांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तब्बल 88 लाख 58 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
अहिल्यानगर- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर विमानाचे इंधन (ATF) चोरणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी शिवारात असलेल्या हॉटेल महाराजाच्या पाठीमागे असलेल्या पत्राशेडमध्ये मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून ही मोठी कारवाई केलीय. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक, मालक आणि स्थानिक साथीदारांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तब्बल 88 लाख 58 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश शिवाजी धोत्रे यांच्या फिर्यादीवरून मुकेश रामइकबाल सिंग (वय 26, रा. उत्तर प्रदेश टँकर चालक), रामभवन रामतिरथ राजपूत (वय 32, रा. उत्तर प्रदेश, चंदू शिवराम जांभूळकर (वय 41, रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, हरीश भीम सिंग (रा. पिंपरी, पुणे), झियावूल फैजूल खान (रा. कामशेत, जि. पुणे), मुन्ना खान आणि गौरव भाई या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अहिल्यानगर- पुणे महामार्गावरून विमानांचे इंधन वाहून नेणाऱ्या टँकरमधून इंधन चोरून ते बाजारात विकले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे दोनच्या सुमारास गव्हाणेवाडी येथील हॉटेल महाराजाच्या मागील बाजूस असलेल्या पत्राशेडवर छापा टाकला.
हवाई इंधन इलेक्ट्रिक मोटारने टँकरमधून काढायचे
आरोपी टँकरमधून अत्यंत धोकादायक पद्धतीने इलेक्ट्रिक मोटारच्या साह्याने हवाई इंधन (एव्हीएशन टर्बाइन फ्युएल) काढून ते ड्रममध्ये साठवत होते. हे इंधन इंडियन ऑईल कंपनीचे असल्याचे निदर्शनास आले, त्याची चोरी करून शासनाची आणि कंपनीची फसवणूक केली जात होती. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 88 लाख 58 हजार 770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये विमानाचे इंधन, मोठा टँकर, इंधन उपसण्याचे पंप, रिकामे आणि भरलेले ड्रम यांसह इतर साहित्याचा समावेश आहे.
बेलवंडी पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि स्फोटके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्वालाग्राही पदार्थांची निष्काळजीपणाने हाताळणी करून लोकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणकुमार लोखंडे, बेलवंडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नंदकुमार सोनवलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नंदकुमार सोनवलकर हे करत आहेत.