नवी दिल्ली : महुआ मोईत्रा यांनी समिती आणि समितीच्या अध्यक्षांबाबत असंसदीय शब्द वापरले. उत्तर देण्याऐवजी त्या प्रचंड चिडल्या, असा मोठा खुलासा संसदेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी केला आहे. ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरण चौकशीवेळी सोनकर यांनी अत्यंत घाणरेडे प्रश्न विचारले असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सोनकर यांच्यावर केला होता. या आरोपांवर उत्तर देताना सोनकर बोलत होते. (Vinod Sonkar, Chairman of the Ethics Committee of the Parliament, disclosed the allegations of Trinamool Congress MP Mahua Moitra)
महुआ मोईत्रा यांनी समिती आणि समितीच्या अध्यक्षांबाबत असंसदीय शब्द वापरले. उत्तर देण्याऐवजी त्या प्रचंड चिडल्या. दानिश अली, गिरधारी यादव आणि इतर विरोधी खासदार पण चांगलेच संतप्त झाले. त्यांनी समितीवर असंसदीय असल्याचा आरोप करण्याचा प्रयत्न केला आणि सभात्याग केला. मात्र समिती पुढील कार्यवाही करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी स्पष्ट केले.
मोईत्रा कॅश फॉर क्वेरी आरोपासंदर्भात आचार समितीसमोर हजर झाल्या होत्या. मात्र, या बैठकीत बराच गदारोळ झाला. महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले असे आरोप करत त्यांनी स्वतः आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. तुम्ही किती वाजता भेटलात, कधी कोणाशी बोललात, हॉटेलमध्ये कोणाला भेटलात, असे प्रश्न मोईत्रा यांना विचारण्यात आल्याचं विरोधी सदस्यांनी सांगितले.
सभात्याग केल्यानंतर मोईत्रा यांनी जोरदार टीका केली. ही आचारसंहिता समिती आहे का?… हे तर स्क्रिप्टमधून वाचत आहेत, असा गंभीर मोईत्रा यांनी केला. मोईत्रा यांनी उलट सुलट बोलणाऱ्या पत्रकारांनाही फटकारले. माझ्या डोळ्यात अश्रू नाहीत… उगाच तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत असे म्हणू नका. तुम्ही माझे डोळे पाहिलेत का? त्यात अश्रू आहेत का?’, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 15 ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं. मोईत्रा यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू स्वीकारल्याचा आणि त्याबदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप या पत्रातून केला होता. लोकसभा अध्यक्षांनी हे प्रकरण आचार समितीकडे पाठवले होते. महुआ मोइत्रा यांचा संसदीय लॉगिन आयडी दुबईत असताना उघडण्यात आल्याचा आरोपही निशिकांत यांनी केला आहे. यानंतर आचार समितीने महुआ मोईत्रा यांना चौकशीसाठी बोलावले होते.