Download App

इस्त्रोच्या स्पेस डॉकिंगचा भन्नाट व्हिडिओ; भारताने कसा रचला इतिहास एकदा पाहाच..

इस्त्रोने दोन दिवसांपूर्वी SpaDeX म्हणजेच स्पेस डॉकिंग प्रयोग केला होता. या मिशनचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

SpaDex Video : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने (ISRO) दोन दिवसांपूर्वी SpaDeX म्हणजेच स्पेस डॉकिंग प्रयोग केला होता. पहिल्याच प्रयत्नात यशही मिळालं होतं. भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळात दोन सॅटेलाइट एकमेकांना जोडण्यात यश मिळवलं होतं. अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश बनला होता. भारताच्या या कामगिरीचं जगभरात कौतुक झालं. यानंतर आता इस्त्रोने या मिशनचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओत इस्त्रोचे वैज्ञानिक या घटिकेचे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अंतराळात दोन सॅटेलाइट्सची (Space Docking) डॉकिंग कशा पद्धतीने झाली हे या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओत इस्त्रो प्रमुख व्ही. नारायण अभियान यशस्वी झाल्यानंतर सर्व टीमचे अभिनंदन करताना दिसत आहे.

भारतापुढे फक्त तीनच देश

भारताआधी रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच अशी कामगिरी करून दाखवली आहे. भारत आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशाच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान जास्त महत्वाचे आहे. आगामी काळात चंद्रयान 4, गगनयान, अंतरिक्ष स्टेशनची स्थापना आणि चंद्रावर अंतराळवीरांना उतरवणे असे नियोजन इस्त्रोने केले आहे. भारताच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी डॉकिंग टेस्ट महत्वाची ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

ISRO SpaDex Docking : भारताची अवकाशात मोठी झेप, स्पाडेक्स डॉकिंग मोहीम फत्ते

डॉकिंगनंतर पुढं काय?

स्पेस डॉकिंगमध्ये यश मिळाल्यानंतर आता इस्त्रो पुढील काही दिवसांत दोन्ही स्पेसक्राफ्टला वेगळे करणे आणि त्यात पॉवर ट्रान्सफर तपासणी करण्याचं काम करणार आहे. भारताने 2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. भारतीय अंतराळ स्थानक या नावाने हे स्टेशन ओळखले जाईल. इस्त्रोच्या या वाटचालीत स्पेस डॉकिंग पहिले पाऊल मानले जात आहे.

या मोहिमेचा खर्च 400 कोटी

इस्रोच्या यशस्वी स्पाडेक्स डॉकिंगबद्दल बोलताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की आपण आता या विशेष लीगमध्ये असलेल्या जगातील 3 ते 4 देशांमध्ये आहोत. या मोहिमेचा खर्च 400 कोटी रुपयांपेक्षा कमी होता. जो परदेशातील अशा मोहिमांच्या खर्चाच्या तुलनेत काहीच नाही. यानंतर अंतराळवीरांना घेऊन जाण्याच्या मोहिमेवर काम सुरू केलं जाईल. भविष्यातील मोहिमांसाठी आपल्याला अशा चॅनेलची आवश्यकता असेल ज्यामध्ये अंतराळवीर अंतराळ स्थानकात येऊ शकेल आणि बाहेर पडू शकेल आणि पेलोड किंवा नमुने वाहतुकीचे साधन म्हणून देखील काम करू शकेल, या सर्वांमधून जाण्यासाठी चॅनेलची आवश्यकता असेल, असं ते म्हणाले.

follow us