ITR Filing 2025 : करदात्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आता 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) या आर्थिक वर्षासाठी नॉन-ऑडिट प्रकरणांमध्ये आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मे महिन्याच्या अखेरीस हा निर्णय घेतला आहे जेणेकरून करदात्यांना नवीन फॉर्म आणि अपडेट केलेल्या डेटानुसार रिटर्न तयार करण्यासाठी अधिक वेळ आता मिळणार आहे. तर दुसरीकडे जर कोणी 15 सप्टेंबरपर्यंत रिटर्न भरू शकला नाही, तर त्याला 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिटर्न भरण्याची संधी असेल, परंतु या काळात विलंब शुल्क आणि व्याज भरावे लागेल. याशिवाय, काही करदात्यांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत रिटर्न भरण्यास सूट देण्यात आली आहे.
ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याच्या शेवटच्या तारखेत कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत, रिटर्न भरण्याची शेवटची तारीख पूर्वीप्रमाणेच 31 ऑक्टोबर 2025 राहील. म्हणजेच, जर तुमच्या उत्पन्नानुसार किंवा व्यवसायानुसार ऑडिट करणे आवश्यक असेल, तर तुम्ही तुमचा आयटीआर 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत दाखल करावा. त्यानंतर, रिटर्न भरल्यावर दंड किंवा विलंब शुल्क आकारले जाऊ शकते.
मेमध्ये प्रक्रिया सुरु
यावेळी मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयटीआर दाखल करणे थोडे उशिरा सुरू झाले आहे. सहसा ही प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होते, परंतु यावेळी रिटर्न भरणे 30 मे 2025 पासूनच सुरू झाले. या विलंबाचे कारण असे की यावेळी आयटीआर फॉर्म आणि त्याच्याशी संबंधित सुविधांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. 2024 च्या बजेटनंतर, फॉर्ममध्ये नवीन कॉलम जोडले गेले आहेत, जसे की भांडवली नफ्याचे नवीन अहवाल देणे, कर क्रेडिटसाठी स्वतंत्र विभाग आणि करदात्यांची पारदर्शकता वाढवण्यासाठी अतिरिक्त डेटा फील्ड. याशिवाय, फॉर्म 26 एएसमधील टीडीएस आणि कर क्रेडिटचा डेटा देखील या वेळी मे ऐवजी जूनमध्ये अपडेट करण्यात आला होता, ज्यामुळे अनेक करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी वाट पहावी लागली. या सर्वांमुळे, रिटर्न भरण्याचे काम थोडे उशिरा सुरू झाले आहे.
मोठी बातमी, महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार
उशिरा रिटर्न भरल्याबद्दल दंड
जर तुमचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही 15 सप्टेंबर नंतर तुमचे आयकर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर विलंब शुल्क फक्त 1,000 रुपये असेल. 31 डिसेंबर 2025 नंतर, सामान्य पद्धतीने आयटीआर भरणे शक्य होणार नाही. या तारखेनंतर, तुम्ही फक्त विलंबित रिटर्न किंवा अपडेटेड रिटर्न भरू शकाल, ज्यावर व्याज आणि दंड दोन्ही आकारले जातील. म्हणून, वेळेवर रिटर्न भरणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून अतिरिक्त खर्च टाळता येईल.