Prashant Kishor Become Candidate For The Bankipur By-Election : आजवर देशातील अनेक दिग्गज राजकीय पक्षांच्या विजयाचा ‘ब्लूप्रिंट’ तयार करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. किशोर यांनी बांकीपूरमधून स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याने, रणनीती आखणारा ‘मास्टरमाईंड’ जेव्हा स्वतः उमेदवार असतो, तेव्हा तो मैदानात काय जादू दाखवतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
पोटनिवडणूक का लागली?
आता प्रशांत किशोर हे निवडुकीच्या मैदानात का उतरले तर, बांकीपूरचे विद्यमान आमदार नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारीही देण्यात आली. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर या रिक्त जागेवर आता जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि ख्यातनाम राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपली उमेदवारी जाहीर करून राजकीय पेच निर्माण केला आहे.
पडद्यामागचा रणनीतीकार आता थेट मैदानात
बिहारमधील पटणा शहरातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा केवळ आणखी एक पोटनिवडणुकीचा मतदारसंघ नाही. भाजपसाठी हा प्रतिष्ठेचा गड आहे, तर जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्यासाठी ही प्रत्यक्ष राजकारणातील पहिली मोठी परीक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे.
VIDEO | Patna: Jan Suraaj Party’s state president Manoj Bharti announced founder Prashant Kishor as candidate for the Bankipur by-election.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/14rXbYoXd9
— Press Trust of India (@PTI_News) July 5, 2026
प्रशांत किशोर हे गेल्या दशकभरात देशातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले निवडणूक रणनीतीकार आहेत. भाजपपासून ते विविध प्रादेशिक पक्षांपर्यंत अनेक राजकीय पक्षांच्या निवडणूक मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, आतापर्यंत ते पडद्यामागे राहून रणनीती आखत होते. आता प्रथमच ते स्वतः मतदारांचा कौल मागत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय स्वीकारार्हतेची ही पहिली मोठी परीक्षा ठरणार आहे.
30 वर्षांपासून भाजपचा अभेद्य गड
बांकीपूर मतदारसंघावर 1995 पासून भाजपचे वर्चस्व आहे. सुरुवातीला दिवंगत नेते नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तर त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नबीन सलग पाच वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले. पण यंदा नितीन नबीन यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली. त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवरही पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक लागली.
भाजपसाठी ही निवडणूक इतकी महत्त्वाची का?
बांकीपूरमध्ये लागलेली ही पोटनिवडणूक भाजपसाठी केवळ एक जागा टिकवण्याची लढाई नाही, तर राजकीय प्रतिमा आणि नेतृत्वाचीही परीक्षा आहे. विशेषतः मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासाठी ही पहिली मोठी निवडणूक मानली जात आहे. राज्याची धुरा सांभाळल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ही पहिली मोठी निवडणूक असल्याने निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बांकीपूरमध्ये पराभव किंवा अत्यल्प फरकाने विजय मिळाल्यास विरोधकांना सरकारच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, नितीन नबीन यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपला धक्का बसल्यास तो राष्ट्रीय स्तरावरही पक्षासाठी प्रतिमेचा धक्का मानला जाऊ शकतो.
शहरी मतदारांचीही परीक्षा
पटणा शहरातील बांकीपूर मतदारसंघात कायस्थ समाज, व्यापारी वर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार निर्णायक मानले जातात. हा वर्ग अनेक वर्षांपासून भाजपचा पारंपरिक मतदार राहिला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपला हे सिद्ध करावे लागणार आहे की, नेतृत्वात बदल झाला असला तरी शहरी मतदारांचा पक्षावरील विश्वास कायम आहे.
जनसुराजसाठी ‘करो या मरो’ची लढाई
दुसरीकडे, प्रशांत किशोर आणि त्यांच्या जनसुराज पक्षासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरू शकते. बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराजने 243 पैकी 238 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही आणि मतांची टक्केवारीही सुमारे 3.4 टक्क्यांवरच राहिली. त्यामुळे बांकीपूरची पोटनिवडणूक जनसुराजसाठी ‘प्रचार करणारा पक्ष’ ही प्रतिमा बदलून ‘वास्तविक पर्याय’ म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मानली जात आहे.
प्रशांत किशोर यांची वैयक्तिक प्रतिष्ठाही पणाला
देशातील अनेक पक्षांसाठी यशस्वी निवडणूक रणनीती आखणारे प्रशांत किशोर आता प्रथमच स्वतः मतदारांचा कौल मागत आहेत. त्यांनी या पोटनिवडणुकीला “मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वावरील जनतेचा कौल” असे स्वरूप दिले आहे. जर प्रशांत किशोर विजयी झाले किंवा भाजपला जोरदार टक्कर देत मोठ्या प्रमाणात मते मिळवली, तर बिहारच्या राजकारणात जनसुराज पक्षाला नवे स्थान मिळू शकते. उलट, अपेक्षेपेक्षा खराब कामगिरी झाल्यास नव्या राजकीय पर्यायाचा दावा कमकुवत होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण ते शहरी… आता खरी परीक्षा
गेल्या काही वर्षांत प्रशांत किशोर यांनी ‘जन सुराज यात्रा’ आणि पदयात्रांच्या माध्यमातून ग्रामीण बिहारमध्ये मोठे संघटन उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र बांकीपूरसारख्या शहरी, सुशिक्षित आणि पारंपरिक भाजप समर्थक मतदारसंघात मतदारांना नवीन पक्षाच्या बाजूने वळवणे हे त्यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.
विरोधकांची भूमिका ठरणार निर्णायक?
बांकीपूर पोटनिवडणुकीत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) कोणती भूमिका घेणार? कारण दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, जर विरोधकांनी स्वतंत्र उमेदवार न देता किंवा अप्रत्यक्षपणे प्रशांत किशोर यांना पाठिंबा दिला, तर भाजपसाठी ही निवडणूक जड जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
त्यामुळे एकूणच काय तर, जाहीर झालेली बांकीपूरची पोटनिवडणूक ही केवळ रिक्त जागा भरण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर, भाजपसमोर 30 वर्षांचा बालेकिल्ला कायम राखण्याचं आव्हान आहे, तर प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षासाठी बिहारच्या मुख्य राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची ही पहिली मोठी संधी आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल केवळ एका मतदारसंघाचा न राहता, बिहारच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे इतकी वर्षे इतर राजकीय पक्षांची रणनीती आखणारा आता स्वतः रणांगणात उतरल्याने बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर त्यांच्या समोर असलेली सर्वात मोठी ‘पॉलिटिकल टेस्ट’ जिंकणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
