Download App

कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक; जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक केली आहे. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेकडून 538 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने शुक्रवारी (1 सप्टेंबर) त्यांची बराच वेळ चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 74 वर्षीय गोयल यांना शनिवारी मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (Jet Airways founder Naresh Goyal arrested in Canara Bank fraud case of Rs 538 crore)

कॅनरा बँकेतील कथित 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जेट एअरवेज, गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि कंपनीचे काही माजी अधिकारी यांच्याविरुद्ध सीबीआय एफआयआरमधून ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

बँकेने जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) ला 848.86 कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केले होते. त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित असल्याचा आरोप करत बँकेच्या तक्रारीवरुन सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने 29 जुलै 2021 रोजी हे खाते फसवणूक झाल्याचे घोषित केले होते. यावर्षी 5 मे रोजी सीबीआयने गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थान आणि ऑफिससहित 7 ठिकाणी छापेमारी केली होती.

1993 मध्ये झाली होती जेट एअरवेजची सुरुवात :

जेट एअरवेजने 1993 मध्ये देशात आपले कामकाज सुरू केले होते. 2004 पर्यंत, जेट एअरवेजने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली. 2007 मध्ये एअर सहारा ताब्यात घेतल्यानंतर 2010 पर्यंत जेट एअरवेज देशातील सर्वात मोठी विमान कंपनी होती. त्यानंतर काही वर्षे चांगले चालले पण नंतरच्या काळात त्यांच्या कंपनीसाठी अडचणी वाढू लागल्या आणि मार्च 2019 मध्ये त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले.

2019 मध्ये कंपनीच्या बोर्डाचा राजीनामा :

2000 च्या दशकात त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये त्याच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. जेट एअरवेजची स्थापना दाऊदने केल्याचेही सांगण्यात आले. संशयास्पद व्यवहारांशी संबंधित एका प्रकरणात, ईडीने फेमा अंतर्गत त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. यानंतर 2019 मध्ये त्यांनी पत्नी अनिता गोयल यांच्यासह जेट एअरवेजच्या बोर्डाचा राजीनामा दिला. पण त्यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत. आता त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Tags

follow us