Download App

वॉकओव्हर की रणनीती.. भाजपाच्या निशाण्यावरुन हेमंत सोरेन गायब; कारण काय?

हेमंत सोरेन यांच्यावर थेट हल्ला करणे भाजप नेते टाळत आहेत. यामागे काही रणनिती आहे का असा प्रश्न विचारला जातोय.

Jharkhand Assembly Elections 2024 : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत एका बाजूला (Jharkhand Assembly Elections 2024) मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि इंडिया आघाडी आहे (INDIA Alliance) तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी. निवडणूक प्रचारात हेमंत सोरेन भाजपच्या (Hemant Soren) केंद्र आणि राज्यातील नेत्यांवर जोरदार प्रहार करत आहेत. प्रश्न विचारत आहेत. पण भाजप नेते मात्र हेमंत सोरेन यांच्यावर थेट हल्ला करणे टाळत आहेत.
मागील तीन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एकूण पाच रॅली झाल्या आहेत. मात्र यातील एकही रॅलीत दोन्ही नेत्यांनी एकदाही हेमंत सोरेन यांच्यावर थेट टीका केली नाही. त्यामुळे भाजपने काही रणनीती नुसार सोरेन यांच्यावर थेट टीका करणे टाळले आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

गढवा येथील रॅलीत मोदींनी जवळपास 54 मिनिटे भाषण केले. झारखंड निर्माण, भ्रष्टाचार, घराणेशाही अशा अनेक मुद्यांचा उल्लेख केला. सोरेन सरकारवर जोरदार हल्ला चढवला मात्र हेमंत सोरेन यांच्यावर थेट टीका केली नाही. मोदींनी त्यांच्या भाषणात हेमंत सोरेन यांचा साधा उल्लेख देखील केला नाही. मोदींनी त्यांच्या भाषणात काँग्रेस आणि आरजेडीवरच जोरदार प्रहार केले.

अमित शहांचा देखील सॉफ्ट कॉर्नर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या राज्यात तीन रॅली झाल्या. या तिन्ही रॅलीत अमित शहा यांनी सुद्धा हेमंत सोरेन यांच्यावर टीका करणे टाळले. घाटशिला येथील रॅलीत अमित शाह म्हणाले की हेमंत सोरेन यांना बदलण्यासाठी नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी भाजप लढत आहे. आम्ही येथील घुसखोर आणि भ्रष्टाचाऱ्यांना पळवून लावण्यासाठी आलो आहोत. झारखंड भाजपचे सहप्रभारी हिंमता बिस्व सर्मा यांनी तर हेमंत सोरेन यांना थेट भाजपात येण्याची ऑफर दिली आहे.

मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी; फैसला होणार?

हेमंत सोरेन यांच्यावर थेट टीका का नाही

राज्यातील आदिवासी मतदारांवर भाजपची नजर आहे. राज्यात आदिवासी मतदारांची संख्या 26 टक्के आहे. हाच मतदार झारखंड मुक्ती मोर्चाचा मूळ मतदाता मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील (Lok Sabha Elections) राखीव पाचही मतदारसंघांत झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. आदिवासी भागात भाजपच्या पराभवात हेमंत सोरेन यांचा तुरुंगवास हे देखील एक कारण होते. हेमंत सोरेन यांना तुरुंगवास झाल्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) यांनी मुद्दा आदिवासी अस्मितेशी जोडला.

2019 मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हान आणि संथाल भागात झारखंड मुक्ती मोर्चाने चांगली कामगिरी केली होती. या निवडणुकीत आदिवासींसाठी आरक्षित 24 मतदारसंघांत जेएमएम आघाडीने विजय मिळवला होता. भाजपला फक्त 2 मतदारसंघांत विजय मिळाला होता. त्यामुळे भाजपने यंदा या मतदारांवर नजर ठेऊन एकाच वेळी अनेक रणनितींवर काम करण्यास सुरुवात केली आहे. हेमंत सोरेन यांच्यावर थेट टीका करायची नाही हा देखील याच रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

मोठी बातमी! केरळ, पंजाब आणि युपीची पोटनिवडणूक पुढे ढकलली; ‘या’ तारखेला होणार मतदान, कारण…

हेमंत विरुद्ध कोण यात भाजपला अडचणी जास्त

झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहकारी पक्षांनी हेमंत सोरेन यांना पुढे केले आहे. हेमंत आणि कल्पना सोरेन निवडणुकीत आघाडीवर आहेत. दुसरीकडे भाजपने कोणताही चेहरा प्रोजेक्ट न करता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत जर भाजपने जर विरोधी आघाडीतील प्रमुख हेमंत सोरेन यांच्यावर थेट हल्ला करण्यास सुरुवात केली तर हेमंत विरुद्ध कोण असा संघर्ष होऊ शकतो. कारण सध्याच्या परिस्थितीत भाजपात मुख्यमंत्रीपदासाठी पाच नेते दावेदार आहेत. हेमंत विरुद्ध कोण अशी लढाई झाली तर यात भाजप अडकू शकतो आणि कदाचित याचे नुकसानही होऊ शकते. कारण हेमंत सोरेन यांच्या तोडीचा एकही नेता भाजपकडे सध्या तरी नाही.

follow us