Jobs in the IT sector are at stake : भारतातील आयटी क्षेत्र जे देशातील सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक मानले जाते ते सध्या मोठ्या संक्रमणातून जात आहे. जागंतूक आर्थिक अनिश्चितता, वाढत चाललेले ऑटोमेशन आणि एआय यामुळे कामाच्या स्वरूपात मोठे बदल होत असून, त्याचा थेट परिणाम भरती प्रक्रियेवर दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 चाय सुरूवातीलाच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी नवीन भरतीवर मर्यादा आणल्याचे चित्र स्पष्ट झाले. काही कंपन्यांनी तर कर्मचारी कपातीचा देखील मार्ग अवलंबला आहे.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये जिथे एकूण कर्मचारी संख्या 12,718 ने वाढली होती, तिथेच त्यानंतरच्या वर्षात 7,389 कर्मचाऱ्यांची घट नोंदवली गेली आहे. या घडामोडींमुळे आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या स्थेर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वाधिक धक्का बसललेली कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी अर्थतच TCS. कंपणीने सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांची कपात केली, जी अलीकडच्या काळातील भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील मोठ्या ले-ऑफ्सपैकी एक मानली जाते. या निर्णयाचा परिणाम संपूर्ण आयटी उद्योगावर उमटला.
त्याचबरोबर इन्फोसिस मध्ये 8,440 कर्मचाऱ्यांची घट झाली, तर टेक महिंद्रा ने 1,993 कर्मचाऱ्यांना कमी केले. दुसरीकडे एचसीएल टेक ने 802 आणि विप्रो ने 135 कर्मचाऱ्यांची भरती केली, मात्र ही वाढ कपातीच्या तुलनेत अत्यल्प ठरली. दरम्यान, नास्कॉम च्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात केवळ सुमारे 2,000 नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. संपूर्ण टेक उद्योगाचा विचार केला असता ही संख्या 1.35 लाखांवर पोहोचते, जी मागील वर्षाच्या 1.33 लाखांच्या तुलनेत किंचित वाढ दर्शवते. सध्या देशातील आयटी क्षेत्रात एकूण 59.5 लाख कर्मचारी कार्यरत असून, ही संख्या वार्षिक 2.3 टक्क्यांनी वाढली आहे.
मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक सकारात्मक बाजूही समोर येत आहे. चालू आर्थिक वर्षात फ्रेशर्ससाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने 25,000 फ्रेशर्सची भरती करण्याचे संकेत दिले आहेत, तर इन्फोसिस ने 20,000 नव्या उमेदवारांना संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा यांनीही फ्रेशर्सना प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. एकूणच, सध्या आयटी क्षेत्रात कपातीचे सावट असले तरी येत्या काळात नवीन संधी निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणाऱ्या उमेदवारांसाठी हा काळ आव्हानांसोबतच नव्या शक्यताही घेऊन येणारा ठरत आहे.
