Jyotirmayi is now the winner of ‘Indian Idol’ : नऊ महिन्यांचा संघर्ष, शेकडो सुरेल सादरीकरणे, प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि परीक्षकांची दाद यानंतर अखेर इंडियन आयडॉल 16ला नवा विजेता मिळाला आहे. ओडिसाची प्रतिभावान गायिका ज्योतिर्मयी नायक हिने आपल्या दमदार गायनाच्या जोरावर इंडियन आयडॉल 16ची ट्रॉफी जिंकत संगीतविश्वात मोठी झेप घेतली आहे. विजेतेपदासोबतच तिने 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिकही पटकावले. ग्रँड फिनालेमध्ये तिच्या नावाची घोषणा होताच सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले, तर ज्योतिर्मयी भावूक झालेली पाहायला मिळाली.
ग्रँड फिनालेदरम्यान ज्योतिर्मयीने सादर केलेले सैयां ओ सैयां हे गाणे कार्यक्रमातील सर्वात लक्षवेधी क्षणांपैकी एक ठरले. तिच्या भावपूर्ण आणि प्रभावी सादरीकरणाने संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. सुरांवरील अचूक पकड, भावनांची अभिव्यक्ती आणि मंचावरील आत्मविश्वास यामुळे ती इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरली. अंतिम फेरीत तिने अंशिका चोनकर, मनराज वीर सिंह, मस्कम्मे बोसू, सुहेल सुफी आणि तनिष्क शुक्ला यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. जबलपूरचा तनिष्क शुक्ला हा स्पर्धेचा प्रथम उपविजेता ठरला.
ज्योतिर्मयी नायक हे नाव ओडिसाच्या संगीतविश्वात आधीपासूनच परिचित आहे. मात्र इंडियन आयडॉलमुळे तिच्या प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली. विशेष म्हणजे, तिची ओळख केवळ गायिका म्हणूनच नाही. संगीत उपचारांच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कार्यही ती करत आली आहे. त्यामुळे तिच्या आवाजाबरोबरच तिच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वानेही अनेकांची मने जिंकली आहेत.
संपूर्ण पर्वात ज्योतिर्मयीने अनेक अविस्मरणीय सादरीकरणे केली. तिने गायलेले ओ जब तक है जान… हे गाणे विशेष चर्चेत राहिले. या सादरीकरणानंतर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उभे राहून तिचे कौतुक केले होते. तसेच जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं या गाण्याच्या सादरीकरणाने अभिनेत्री लीना चंदावरकर इतक्या प्रभावित झाल्या होत्या की त्यांनी हे गाणे पुन्हा पुन्हा तिच्याच आवाजात ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या या सादरीकरणांमुळे ती संपूर्ण हंगामभर प्रेक्षकांची आवडती स्पर्धक ठरली.
रक्षकच बनले भक्षक! पुण्यात तोतया पत्रकार, महिला पोलिस आणि पोलिस नाईक यांचा एक कोटींच्या दरोड्याचा कट
‘इंडियन आयडॉल 16’चा ग्रँड फिनाले अत्यंत भव्य आणि रंगतदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे परीक्षक श्रेया घोषाल आणि बादशाह यांच्यासोबतच उषा उत्थुप, उदित नारायण, पापन, कुमार सानू, शहनाज गिल आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे अंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढली.
ट्रॉफी जिंकल्यानंतर ज्योतिर्मयीने आपल्या भावना व्यक्त करत हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नपूर्तीचा असल्याचे सांगितले. ऑडिशनपासून विजेतेपदापर्यंतचा हा प्रवास तिच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरल्याचे तिने नमूद केले. आपल्या कुटुंबीयांचे, चाहत्यांचे, परीक्षकांचे, कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमचे आणि मतदान करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानताना ती म्हणाली, ही ट्रॉफी केवळ माझी नाही. प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि मला साथ देणाऱ्या सर्वांची आहे.
यादों की प्लेलिस्ट या संकल्पनेवर आधारित इंडियन आयडॉल 16ने संपूर्ण हंगामभर जुन्या आणि सदाबहार गाण्यांना नव्या आवाजातून प्रेक्षकांसमोर सादर केले. संगीत, भावना आणि आठवणींनी भरलेल्या या प्रवासाचा शेवट ज्योतिर्मयी नायकच्या विजयानं झाला. तिच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, मेहनत, समर्पण, सातत्य आणि प्रतिभेच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते. ओदिशातून आलेल्या या गुणी गायिकेने आता राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत भविष्यातील संगीत कारकिर्दीसाठी भक्कम पाऊल टाकले आहे.
