गुलजारांची लेखणी, अमित त्रिवेदींची धून अन् बी प्राकचा आवाज; ‘दायरा’मधील ‘सच का दायरा’ गाणं रिलीज
गाण्यातील भावनांमध्ये ताकद आहे, पण त्याचवेळी एक प्रकारची शांतताही आहे आणि या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधणं हे रेकॉर्डिंगदरम्यान खास होतं.
‘Sach Ka Dayra’ song from ‘Dayra’ released : मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू असून, आता या चित्रपटातील ‘सच का दायरा’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार या निमित्ताने एकत्र आले आहेत. ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांचे शब्द, लोकप्रिय संगीतकार अमित त्रिवेदी यांचं संगीत आणि गायक बी प्राक यांचा भावपूर्ण आवाज अशी जबरदस्त जुगलबंदी ‘सच का दायरा’ या गाण्यात पाहायला आणि ऐकायला मिळते.
जंगली म्युझिककडून सादर करण्यात आलेलं ‘सच का दायरा’ हे केवळ चित्रपटातील एक गाणं नसून ‘दायरा’च्या कथेतील सत्य, धारणा आणि दृष्टिकोन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना अधोरेखित करतं. गुलजार यांच्या अर्थपूर्ण लेखणीला अमित त्रिवेदी यांच्या संगीताची आणि बी प्राक यांच्या आवाजाची साथ मिळाल्यामुळे हे गाणं चित्रपटाच्या भावनिक विश्वाशी जोडलेलं आहे. त्यामुळे ते केवळ साउंडट्रॅकचा भाग न वाटता चित्रपटाच्या कथेचाच विस्तार असल्याचा अनुभव देतं.
‘दायरा’मध्ये करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत आहेत. या गाण्याबद्दल बोलताना करीना कपूर खान यांनी ‘सच का दायरा’ हे चित्रपटाची भावनिक बाजू प्रभावीपणे समोर आणत असल्याचं म्हटलं आहे. गुलजार यांचे शब्द, अमित त्रिवेदी यांची धून आणि बी प्राक यांचा आवाज ज्या तीव्रतेने एकत्र येतो, त्याचा प्रभाव दीर्घकाळ मनावर राहतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मते हे गाणं प्रेक्षकांना थांबून विचार करण्यास भाग पाडतं आणि कथेच्या आत असलेल्या आणखी एका आवाजाप्रमाणे भासतं.
कोल्हापूरच्या ‘गोकुळ’साठी हाय व्होल्टेज लढत; सतेज पाटलांची सत्ता टिकणार की महायुती मारणार बाजी?
गायक बी प्राक यांनीही या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा अनुभव सांगितला आहे. या गाण्यातील भावनांमध्ये ताकद आहे, पण त्याचवेळी एक प्रकारची शांतताही आहे आणि या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधणं हे रेकॉर्डिंगदरम्यान खास होतं, असं त्यांनी म्हटलं. संगीतकार अमित त्रिवेदी यांच्या मते गाण्याचा आवाज आणि संगीत चित्रपटाच्या कथेशी प्रामाणिक राहणं आवश्यक होतं. गुलजार यांची स्तरित लेखणी आणि बी प्राक यांची भावनिक ऊर्जा एकत्र आल्यामुळे हे गाणं ‘दायरा’च्या विश्वाचा अविभाज्य भाग बनल्याचं त्यांनी सांगितलं.
दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी ‘सच का दायरा’ला चित्रपटाच्या भावनिक केंद्राशी जोडले आहे. त्यांच्या मते या गाण्यात चित्रपटातील अस्वस्थता, असहायता आणि या सगळ्यांच्या पलीकडे न्यायाच्या विजयासाठी असलेली हाक दडलेली आहे. गीताचे शब्द, संगीत आणि आवाज या सर्व भावना पूर्ण तीव्रतेने प्रेक्षकांसमोर आणतात. या गाण्याबाबत गीतकार गुलजार यांनीही अत्यंत अर्थपूर्ण भाष्य केलं आहे. त्यांच्या मते, ‘सच का दायरा’ हा एकतर्फी नाही किंवा एका सरळ रेषेसारखाही नाही. वेळ, परिस्थिती आणि दृष्टिकोनानुसार सत्याचं वर्तुळ बदलत राहतं आणि हाच विचार या गाण्यातून मांडण्यात आला आहे.
मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन ‘दायरा’ची कथा पडद्यावर साकारत आहेत. चित्रपटातील प्रत्येक घटक कथा पुढे नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून ‘सच का दायरा’ या गाण्यातून चित्रपटाच्या भावनिक आणि संगीतविश्वाची झलक प्रेक्षकांना मिळत आहे. हे गाणं आता सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध करण्यात आलं असून त्याचा पूर्ण व्हिडिओ टाइम्स म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवरही प्रदर्शित करण्यात आला आहे.