मयुरी वाघची 20 वर्षानंतर रंगभूमीवर दमदार एन्ट्री, मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत उलगडणार रहस्य आणि नात्यांचा थरारक खेळ
कुठे उजेड, कुठे सावल्या, आणि कुठे बंद दाराआड दबलेली गुपिते. अशाच एका इमारतीतल्या 23 व्या मजल्यावर रंगणारा सस्पेन्सचा खेळ रंगभूमीवर येतोय.
Mayuri Wagh makes a powerful entry onto the stage after 20 years : एखाद्या उंच इमारतीच्या खिडक्यांमागे काय काय दडलेलं असतं, याचा अंदाज बाहेरून कधीच येत नाही. कुठे उजेड, कुठे सावल्या, आणि कुठे बंद दाराआड दबलेली गुपिते. अशाच एका इमारतीतल्या 23 व्या मजल्यावर रंगणारा सस्पेन्सचा खेळ आता मराठी रंगभूमीवर येतोय – ’23 वा मजला’. येत्या 31 ऑक्टोबर, शनिवारी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार असून, “24 तास नजरेसमोर” या टॅगलाइननं नाटकाविषयीची उत्सुकता आधीच वाढवली आहे.
सवाईगंधर्व, नाट्यपुष्प, अथर्व यांची प्रस्तुती आणि आकाश भडसावळे, स्फूर्ती श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर यांनी “23 वा मजला” या नाटकाची निर्मिती केली आहे. याचं लेखन शिरीष देखणे यांनी केलं आहे, तर दिग्दर्शनाची धुरा ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. गेल्या काही वर्षात केंकरे यांनी सस्पेन्स नाटकं रंगभूमीवर यशस्वी करून दाखवली आहेत. प्रसिद्धी, पैसा आणि मैत्रीच्या चकचकीत पडद्यामागे दडलेल्या लोभ, असुरक्षितता आणि विश्वासघाताची ही गोष्ट मानवी स्वभावाचे काळे-पांढरे पैलू उलगडत जाते. मात्र ही गोष्ट अशी काही गुंफली आहे की, शेवटपर्यंत प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो.
या कथानकात अभिनेत्री मयुरी वाघ ‘शिल्पा देशमुख’ ही भूमिका साकारत आहे. शिल्पा ही साधी, सरळ गृहिणी आहे. तिचा नवरा लेखक आहे आणि त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास आहे, प्रेम आहे. त्याच्या कामात ती त्याला साथ देते. मालिकांमधल्या सलग कामानंतर मयुरी बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर परतत आहे. या पुनरागमनाविषयी आणि विजय केंकरे यांच्यासोबतच्या अनुभवाविषयी बोलताना ती सांगते की, “खूप वर्षांनी रंगभूमीवर येतेय, त्यामुळे धाकधूक आहे, पोटात गोळाही आलाय. पण आपण कम्फर्ट झोनबाहेर जाऊन काम करायला हवं, असं मला नेहमी वाटतं.
क्लिपमागचं सत्य शोधून दाखवा, ऑडिओ बॉम्बवरून मनोज जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज
सस्पेन्स थ्रिलर हा माझा आवडता जॉनर आहे; जो प्रेक्षक म्हणून मी पाहत आले, त्याच प्रकारच्या कलाकृतीत आता काम करतेय, हे आव्हानात्मकही आहे आणि तितकंच समाधानकारकही. विजय केंकरे सरांसोबत काम करणं म्हणजे अभिनयाच्या एका वेगळ्या युनिव्हर्सिटीत शिकण्यासारखं आहे. या नाटकातली सगळीच पात्रं साध्या सामान्य माणसांसारखी आहेत आणि प्रत्येक माणसात एक ग्रे शेड असते, ती या नाटकात ठळकपणे जाणवते. बाकी ट्विस्ट्स नाटक पाहिल्यावरच कळतील!”
मयुरीसोबत शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव आणि सुजित देशपांडे हे कलाकार नाटकात प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. दोन यशस्वी लेखकांची मैत्री, त्यातून उभी राहिलेली भागीदारी आणि पुढे उघड होत जाणारी विचित्र रहस्यं, या संघर्षात प्रत्येक पात्राची एक वेगळी बाजू आहे. उत्कंठा, गूढ हालचाली आणि कथानकातील अनपेक्षित वळणं यांमुळे प्रेक्षक शेवटपर्यंत अंदाज बांधत राहतात. हे सस्पेन्स थ्रिलर नाटक रसिकांना एक असामान्य अनुभूती देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
नाटकाची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम आहे. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य, अजित परब यांचं संगीत, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि मंगल केंकरे यांची वेषभूषा यांमुळे नाटकाचं वातावरण अधिक गडद आणि प्रभावी होतं. नाटकाची स्टील आणि मोशन पोस्टर्स सध्या लक्ष वेधून घेतायत, त्यात जिवंतपणा आणण्याचं काम अक्षर कमल शेडगे यांनी केलंय. एका इमारतीच्या तेवीसाव्या मजल्यावर घडणारी ही गोष्ट प्रेक्षकाला आजूबाजूच्या जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहायला लावेल. 31 ऑक्टोबरच्या शुभारंभाच्या प्रयोगापासून आपल्या जवळच्या नाट्यगृहात ’23 वा मजला’ आवर्जून पाहा, कारण काही गुपितं 23 व्या मजल्यावरच उघड होतात!