K Annamalai quits from BJP : विधानसभा निवडणुकांपासून देशात चर्चेत असणाऱ्या तामिळनाडूमधून पुन्हा एकदा एका राजकीय भूकंपाची बातमी समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये भाजप पक्ष वाढणारे आणि लोकसभेत भाजपचे पोस्टर बॉय राहिलेले के अन्नामलाई यांनी अखेर भाजपची साथ सोडली आहे. अन्नामलाई यांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अन्नामलाई यांनी मंगळवारी (दि.2) दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत पक्ष सोडण्याची कारणे सांगितली होती.
भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन ने तमिलनाडु के पूर्व प्रदेश अध्यक्ष के. अन्नामलाई का पार्टी की प्राथमिक सदस्यता से दिया गया इस्तीफ़ा स्वीकार कर लिया है। pic.twitter.com/7BnuyHe1Y3
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2026
अन्नामलाईच्या भविष्यातील योजना काय असू शकतात?
माजी आयपीएस अधिकारी असलेले अन्नामलाई काही महिन्यांपूर्वीच पक्ष सोडण्याची योजना आखली होती. अन्नामलाई यांच्या जवळच्या सूत्रांनुसार, तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आल्याने मोठे स्थित्यंतर घडून आले आहे. त्यामुळे अन्नामलाई एक जनआंदोलन सुरू करण्याचा विचार करत असून, त्यानंतर ते याचे एका राजकीय पक्षात रूपांतर करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अन्नामलाई भाजपमध्ये कसे आले?
अन्नामलाई यांनी मे 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला आणि ऑगस्ट 2020 मध्ये भाजपात प्रवेश करत राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत अन्नामलाईंनी मागे बघून बघितलेले नाही. 9 जुलै 2021 रोजी भाजपने अन्नामलाई यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची कमान दिली. त्यानंतर त्यांनी पक्षाची पाळमुळं तळागाळापर्यंत नेली. भाजप घरोघरी नेण्यासाठी अन्नामलाई यांनी 2023 च्या जुलैमध्ये ‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) यात्रा काढली होती. या यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिरवा झेंडा दाखवला तर, याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) उपस्थितीत झाला होता. अन्नामलाई यांच्या या एका यात्रेने त्यांची पक्षात वेगळी ओळख निर्माण झाली होती.
जनतेचे प्रेम अन् मंचावर उपस्थित मोदीही झाले आनंदी
‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) या यात्रेचा समारोप मोदींच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी उपस्थितांनी अन्नामलाई यांचे जोरदार स्वागत केले. नागरिकांचे अन्नामलाई यांच्यावरील जीवापाड प्रेम पाहून खुद्द मोदीही भारावून गेले होते. त्यावेळी मोदींनी त्यांच्या शेजारी बसलेल्या अन्नामलाई यांची पाठ अनेकदा थोपटली होती. मोदींच्या या कौतुकामुळे अन्नामलाई यांच्या ‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) ही यात्रा किती यशस्वी झाली असेल याचा अंदाज बांधता येईल.
अन्नामलाई तामिळनाडूतील भाजपचा सर्वात मोठा चेहरा अद्यापही आहेत यात शंका नाही. त्यामुळे 2024 च्या लोकसभेत भाजपनं तामिळनाडूत 2 ते 3 जागांच्या माध्यामातून चंचू प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अन्नामलाई यांचा करिष्मा कामी आल्याचे अधोरेखित झाला. हा करिष्मा कायम राहिल्यास भविष्यात तामिळनाडूत भाजप एकहाती सत्तेचे दरवाजे उघडेल असा विश्वास यामुळे निर्माण झाला होता.
मात्र त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून अन्नामलाई आणि भाजप यांच्यामध्ये केंद्रीय धोरणांवरून झालेले मतभेद आहेत. अण्णामलाई यांनी अलीकडेच केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणावर सोशल मीडियावर उघडपणे आक्षेप घेतला होता. त्यानंतर ते भाजप नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा वेगाने पुढे आल्या. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या अण्णामलाई यांनी या सर्व अफवांबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
