Karnataka Cabinet: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (31 मे) मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा केली. सीएम सिद्धरामय्या यांनी वित्त, संसदीय कामकाज, कामगार आणि प्रशासकीय सुधारणा विभाग, माहिती आणि तंत्रज्ञान यासह सर्व विभाग आपल्याकडे ठेवले आहेत. आतापर्यंत हे विभाह कोणालाही देण्यात आले नव्हते.
त्याचबरोबर एम.बी.पाटील यांच्याकडे उद्योग विभागासह पायाभूत सुविधा विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि आमदार प्रियांक खर्गे यांना ग्रामविकास आणि पंचायती राजसोबतच आयटी आणि बीटी खाती देण्यात आली आहेत.
यापूर्वी एम.बी.पाटील यांच्याकडे केवळ मोठ्या व मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. दुसरीकडे प्रियांक खर्गे यांच्याकडे यापूर्वी ग्रामविकास आणि पंचायत राज खाते होते. सिद्धरामय्या यांनी 29 मे रोजी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप केले होते. सुरुवातीला सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह 10 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यानंतर 27 मे ला आणखी 24 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
काँग्रेस सरकार रिमोट कंट्रोलने चालत होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांना सिंचन आणि शहर विकाससोबत बृहन बेंगळुरु महानगरपालिका (BBMP), बेंगळुरु विकास प्राधिकरण, बंगळुरू पाणीपुरवठा आणि सीवरेज बोर्ड, बंगळुरू महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या खात्यांचे विभाग देण्यात आले आहेत.
शिवानंद पाटील यांच्याकडे वस्त्रोद्योग व ऊस विकास आदींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मधु बंगारप्पा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खाते सांभाळतील, तर एमसी सुधाकर उच्च शिक्षण खाते आणि एन.एस. बोसेराजू यांच्याकडे लघु पाटबंधारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते सोपवण्यात आले आहे. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 135 जागा मिळाल्या, तर भाजपला 66 आणि जेडीएसला 19 जागा मिळाल्या होत्या.