Download App

काँग्रेसचा आरएसएसशी पंगा! विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांतील ‘तो’ धडा वगळणार?

Karnataka Congress : कर्नाटकात भाजपला (BJP) चारीमुंड्या चीत करत विजय मिळवल्यानंतर आता काँग्रेसने (Karnataka Congress) भाजप सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कर्नाटक सरकार आता राष्ट्रीय स्वयंसेनवक संघालाच (RSS) झटका देण्याच्या तयारीत आहे. भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा धडा काढून टाकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी याबाबत माहिती दिली.

गुंडू राव म्हणाले, मागील भाजप सरकारने पाठ्यपुस्तकात आणलेले काही धडे काढून टाकण्याचा विचार केला जात आहे. ज्यांनी देशाच्या उभारणीत योगदान दिले अशांच्या कथा पु्स्तकात असायला हव्यात. भाजपने मुलांच्या पाठ्यपुस्तकात आपले वैचारिक मुद्दे टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने याकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

भाजपला विरोधच – शिक्षणमंत्री बंगारप्पा

शालेय शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा म्हणाले, भाजपने मुलांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. कारण त्यांच्या डोक्यात तसे काहीच नाही. त्यांच्या डोक्यात जे विचार आहेत त्या विरोधात आमचे सरकार आहे. मुलांच्या हिताच्या आड येईल अशी कोणतीच गोष्ट आम्ही करणार नाही.

दरम्यान, काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते की भाजप सरकारच्या काळात पाठ्यपुस्तकात झालेले बदल पहिल्यासारखे केले जातील. तसेच जर कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तर केंद्र सरकारने तयार केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही राज्यात लागू केले जाणार नाही.  काँग्रेसने जी आश्वासने दिली होती.  त्यानुसार कार्यवाही करताना दिसत आहे. काँग्रेस सरकारच्या या हालचालींवर अजून भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज