Download App

Karnataka Election : भाजपला धक्का! पिछाडीवर असलेले महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी दवाखान्यात

Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Election Results) मतमोजणी सुरू आहे. यावेळी काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून भाजपला (BJP) जोरदार झटका बसला आहे. अनेक मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते, मंत्री पिछाडीवर पडले आहे. असाच एक मतदारसंघ आहे चिकमंगळूर. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी. टी. रवी (C. T. Ravi) पिछाडीवर पडले आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सीटी रवी यांना प्रकृतीच्या कारणांमुळे काल रात्री दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार चिकमंगळूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार एच. डी. थम्मय्या यांनी एकूण 46 हजार 959 मते मिळवत आघाडी घेतली आहे. तर भाजप उमेदवार सी. टी. रवी यांना आतापर्यंत 41 हजार 952 मते मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांतील मतांचा फरक फारसा नाही. त्यामुळे येथे जोरदार लढत होत आहे. रवी यांच्या मतांची टक्केवारी 45.45 इतकी आहे. अजून निवडणुकीचे पूर्ण निकाल हाती आलेले नाहीत.

Karnataka Election : काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला : खर्गे

काँग्रेसने थम्मय्या यांच्यासारखा मजबूत उमेदवार येथे दिला. विशेष म्हणजे थम्मय्या हे काँग्रेसमध्ये येण्याआधी रवी यांचेच सहकारी होते. ते जर निवडून आले तर येथून निवडून येणारे लिंगायत समाजातील दुसरे आमदार असतील.

रवी यांनी मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावला

चिकमंगळूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1978 ची लोकसभा निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. 2004 पर्यंत हा ट्रेंड कायम होता. त्यानंतर मात्र भाजपने विजय मिळवण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये सी. टी. रवी यांनी काँग्रेसच्या शंकर बीएल यांचा 26 हजार 314 मतांच्या फरकाने पराभव केला. तेव्हापासून रवी आघाडीवर आहेत.

कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करतांना प्रियांका गांधींनी केली भगवान हनुमानाची पूजा

महाराष्ट्रातही ठसा उमटवला

सी. टी. रवी हे महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आहेत. भाजपने सन 2020 मध्ये त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. त्यानंतर रवी यांनी राज्यातील भाजप नेत्यांशी चांगले जुळवून घेतले. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार उलथवून शिंदे-फडणवीस सरकार आणण्यात त्यांचेही योगदान होते. केंद्रीय नेत्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांनी सूत्रे हलवली. देंवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ते कायम असायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर देऊन सरकारची बाजू सांभाळण्यातही ते आघाडीवर होते.

रवी रुग्णालयात दाखल 

दरम्यान, सीटी रवी यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत रवी यांनी जोरदार प्रचार केला. त्यामुळे त्यांना नंतर त्रास जाणवू लागला. प्रकृती खराब होत असल्याचे लक्षात येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. किडनीविकाराशी संबंधित कारणांमुळे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Tags

follow us