Karnataka Elelction : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Election) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसही यंदा जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे.
असे असतानाही यंदाची निवडणूक भाजपसाठी जरा कठीणच असल्याचे बोलले जात आहे. निदान जे सर्व्हे आता येत आहेत त्यातून तरी हेच दिसत आहे. आताही एबीपी-सी व्होटर संस्थेचा ओपिनियन पोल आला आहे. या अहवालात जे निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यातून भाजपचे टेन्शन वाढण्याचीच शक्यता आहे.
या सर्व्हेत केलेल्या दाव्यानुसार कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस भाजप आणि जेडीएसपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. काँग्रेस स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री बोम्मईंनाही धक्का बसणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या कामकाजावर राज्यातील लोक नाराज आहेत. भाजपला या विरोधी वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे या अहवालातील आकडेवारीवरून दिसत आहे.
काँग्रेस नेते म्हणजे ‘एसएमएस’
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी प्रचारासाठी कर्नाटक मध्ये आले होते त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खरगे आणि डीके शिवकुमार हे काँग्रेसचे नेते कर्नाटकच्या विकासासाठी धोकादायक आहेत. त्यांनी या तिन्ही नेत्यांना एसएमएस (SMS) म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खरगे आणि डीके शिवकुमार कर्नाटकच्या विकासासाठी धोकादायक आहे. ज्याप्रमाणे एखादा करप्ट मेसेज मोबाइल खराब करतो त्याप्रमाणेच हा एसएमएस कर्नाटकचे भवितव्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे दुहेरी इंजिन असलेले सरकारच कर्नाटकचे संरक्षण करू शकते, असा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला.
एबीपी-सी वोटरचा दावा
काँग्रेस – 107 ते 119 जागा
भाजप – 76 ते 86 जागा
जेडीएस – 23 ते 35 जागा
अन्य पक्ष – 0 ते 5 जागा
सरकारची कामगिरी
चांगली – 29 टक्के
सरासरी – 19 टक्के
वाईट – 52 टक्के
मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती
बसवराज बोम्मई – 31 टक्के
सिद्धरामय्या – 41 टक्के
डीके शिवकुमार – 3 टक्के
अन्य – 3 टक्के