Download App

Karnataka Elections : दोघा सख्ख्या भावांतच जुंपणार; एकाला भाजप तर दुसऱ्याला काँग्रेसचे तिकीट

Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची (Karnataka Elections) घोषणा झाली असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनंतर भाजपनेही उशीरा का होईना पण उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या निवडणुकीत अनेक इच्छुकांना नारळ देण्यात आला. त्यामुळे बंडखोरीचे संकट उभे राहिले आहे. तर दुसरीकडे कुटुंबातील सदस्यच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. कर्नाटकच्या मैदानात सध्या अशाच एका लढतीची चर्चा होत आहे. जिथे दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला काँग्रेसने तिकीट दिले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांची दोन मुले निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत. दोघे भाऊ सोरबा मतदारसंघात आमनेसामने असतील.

भाजपला कर्नाटकात झटका, तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा

शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरबा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री बंगारप्पा यांचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. बंगारप्पा हे 1967 ते 1994 या काळात निवडून येत होते. त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत उतरले. 1996 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांचा मुलगा कुमार बंगारप्पा या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजयी झाला.

त्यानंतर 1999 च्या निवडणुकीतही त्यांना यश मिळाले. नंतर मात्र त्यांचे बंधू मधू बंगारप्पा यांनी त्यांना आव्हान दिले. एस. बंगारप्पांच्या हयातीतच कुटुंबातील वाद लोकांपर्यंत गेला. तरीही 2004 मध्ये कुमार बंगारप्पा तिसऱ्यांदा विजयी झाले. त्यानंतर मात्र 2013 च्या निवडणुकीत मधू बंगारप्पा यांनी कुमार यांना पराभूत केले.

2018 च्या निवडणुकीत पराभवाची परतफेड करत कुमार यांनी विजयाचा झेंडा फडकावला. 1996, 1999, 2004 आणि 2018 या चार निवडणुकीत कुमार बंगारप्पा विजयी झाले. त्यांना राज्याच्या सरकारमध्येही संधी मिळाली आहे.

विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार हे राहुल गांधी, खर्गेंच्या भेटीला

यंदाच्या निवडणुकीत हे दोन्ही भाऊ पुन्हा आमनेसामने आले आहेत. यावेळी कुमार यांना भाजपने तिकीट दिले आहे तर काँग्रेसने मधू बंगारप्पा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2018 च्या निवडणुकीत कुमार यांनी मधू बंगारप्पा यांचा 3 हजार 286 मतांनी पराभव केला होता. कुमार 2018 च्या आधी काँग्रेस सोडून भाजपात आले होते. त्यावेळी मधू बंगारप्पा जेडीएसमध्ये होते. आता ते काँग्रेसमध्ये असून निवडणूक लढत आहेत.

दोघेही कन्नड चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. कुमार एक प्रसिद्ध अभिनेते आहेत तर मधू बंगारप्पा अभिनेता तर आहेतच शिवाय त्यांनी चित्रपट निर्मितीही केली आहे. राजकारणात या दोघांनी बरेच पक्ष बदलले आहेत.

 

Tags

follow us