Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत सहा टप्प्यांतील मतदान पूर्ण (Lok Sabha Election 2024) झालं आहे. आता सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. त्यांनतर 4 जून रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कुणाचा पराभव होणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत फक्त जय पराजय यालाच महत्त्व नसते तर अन्यही काही गोष्टी असतात ज्यावरून उमेदवाराच्या कामगिरीचे मोजमाप केले जाते.
निवडणुकीत उमेदवाराने कुणाचा पराभव केला किंवा कुणाच्या हातून पराभव स्वीकारावा लागला याचीही चर्चा होत असते. जर एखादा उमेदवार मातब्बर नेत्याला पराभवाची धूळ चारतो त्यावेळी त्या विजयी उमेदवारचे वजन पक्षात आणि जनतेत वाढते. तसं पाहिलं तर एक मताने मिळालेला विजय अस किंवा सहा लाख मतांचा मोठा विजय असो तरी विजयी उमेदवार खासदार होतोच. मात्र जास्त मताधिक्याने जर उमेदवार विजयी झाला तर त्याच्या राजकीय कौशल्याचं महत्त्व अधोरेखित होतं हे मात्र नक्की.
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले तर काही उमेदवारांनी मात्र समोरच्या उमेदवाराचे डीपॉझिट जप्त करून टाकले. मागील लोकसभा निवडणुकीत एकूण 543 जागांपैकी 169 मतदारसंघात फक्त 181 ते एक लाखांपेक्षा कमी मतांच्या अंतराने उमेदवाराच्या नशिबाचा निर्णय झाला. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 29 मतदारसंघ असे होते जिथे जय पराजयातील अंतर एक लाख मतांपेक्षा कमी होते. पश्चिम बंगालमध्ये 18 आणि ओडिशामध्ये 14 मतदारसंघात उमेदवारांच्या जय पराजयातील अंतर एक लाख मतांपेक्षा कमी होते.
लोकसभेच्या रणांगणात मोदींची हॅट्रिक झाल्यास ‘हे’ 54 शेअर्स गुंतवणुकदारांना करणार मालामाल
उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात भाजप उमेदवार स्मृती इराणी यांना एकूण 4,68,514 मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 55 हजार 120 मतांनी पराभव केला होता. युपीतील मछलीशहर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 181 मतांच्या अंतराने जय पराजयाचा निर्णय झाला होता. येथे भाजपच्या भोलानाथ सरोज यांनी बसपाचे त्रिभुवन राम यांना 181 मतांच्या फरकाने पराभूत केले होते.
कर्नाटकातील तुमकुर मतदारसंघात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा भाजप उमेदवार जीएस बसवराज यांनी एक टक्का मतांनी पराभूत केले होते. या निवडणुकीत जीएस बसवराज यांना देवेगौडा यांच्यापेक्षा 13 हजार 339 मते जास्त मिळाली होती. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांना पुरी लोकसभा मतदारसंघातून बिजेडी उमेदवार पिनाकी मिश्रा यांच्याकडून 12 हजार मतांनी पराभूत झाले होते. उत्तर प्रदेशातील कन्नोज मतदारसंघात मुलायम सिंह यादव यांच्या परिवाराचा दबदबा आहे. या मतदारसंघात मागील निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा अवघ्या 12 हजार मतांनी भाजपच्या सुब्रत पाठक यांनी पराभव केला होता.
मागील निवडणुकीतील चार मतदारसंघातील सर्वाधिक मताधक्याने मिळालेला विजय भाजपाच्या खात्यात गेला. गुजरातमधील नवसारी मतदारसंघात सीआर पाटील 6,89,668 मतांनी विजयी झाले होते. हरियाणातील करनाल मतदारसंघातून संजय भाटिया 6,56,142 मतांनी विजयी झाले होते. फरिदाबाद मतदारसंघातून कृष्ण पाल 6,38,239 मतांनी विजयी होत संसदेत पोहोचले होते. राजस्थानातील भीलवाडा मतदारसंघात सुभाष चंद्र बहेरिया यांनी 6 लाख 12 हजार मतांनी विजय नोंदवला होता.
Lok Sabha 2024 : PM मोदी, अखिलेश अन् राहुल.. पाच वर्षांत कुणाची संपत्ती किती वाढली?
पाच लाखांपेक्षा जास्त आणि सहा लाखांपेक्षा कमी अंतराने ज्या मतदारसंघात जय पराजय झाला त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही मतदारसंघ आहे. अमित शाह यांनी गांधीनगर जागेवर 5,57,014 मते घेत काँग्रेस उमेदवार सिजी चावडा यांचा पराभव केला होता. वडोदरा येथून रंजन बेन भट यांनी काँग्रेस उमेदवार प्रशांत पटेल यांचा 5.89 मतांनी पराभव केला होता.
भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्ली मतदारसंघात महाबल मिश्रा यांचा 5 लाख 78 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. राजस्थानातील चित्तौडगड मतदारसंघात सीपी जोशी यांनी काँग्रेसच्या गोपाल सिंह शेखावत यांचा 5,76,247 मतांनी पराभव केला होता. हंसराज हंस यांनी उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून 5,53,897 मतांनी गुगन सिंह यांचा पराभव केला होता.
2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालात 34 मतदारसंघ असे होते जिथे विजयाचं अंतर चार लाखांपेक्षा जास्त होतं पण पाच लाखांच्या आत होतं. राजस्थानात सर्वाधिक चार ते पाच लाख मतांनी जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या 6 होती. वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयातील मतांचं अंतर 2014 मधील निवडणुकीच्या तुलनेत जास्त होतं. पीएम मोदी 4 लाख 75 हजार मताधिक्याने विजयी झाले.
भारतीय जनता पार्टीचे मागील 2019 मधील ट्रॅक रेकॉर्ड पाहिले तर सर्वाधिक मतांनी जिंकण्यात भाजप आघाडीवर राहिला. मागील निवडणुकीत भाजपने 303 मतदारसंघात 55.7 टक्के मते घेत विजय मिळवला होता. भाजपने जितक्या जागा जिंकल्या होत्या त्यातील 224 जागांवर पक्षाला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. आता 2024 मधील निवडणुकीत देशातील जनता कुणाला कौल देणार याचं उत्तर 4 जूनलाच मिळणार आहे.