Lok Sabha Election Results : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का (Lok Sabha Election Results) बसला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरयाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या तर पंजाब आणि तामिळनाडू या दोन राज्यांत तर भाजपला एकही जागा मिळाली नाही. या राज्यातील निवडणूक भाजपसाठी अवघड होती. निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नसली तरी येथे भाजपने आपली स्थिती आधीपेक्षा जास्त मजबूत केली आहे.
या दोन्ही राज्यांत भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत होता. याआधीच्या निवडणुकांकडे नजर टाकली तर तामिळनाडूत अन्ना द्रमुक आणि पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाबरोबर भाजप निवडणुका लढत होता. यावेळच्या निवडणुकीत मात्र भाजप स्वबळावर निवडणुकीत उतरला आणि व्होट शेअरच्या बाबतीत मोठी झेप घेतली. पंजाबमध्ये 18.56 टक्के मते मिळाली. यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे भाजपला जुना सहकारी अकाली दलापेक्षा पाच टक्के जास्त मते मिळाली. कारण या निवडणुकीत अकाली दलाला फक्त 13.42 टक्के मते मिळाली.
Letsupp Special : अमरावतीत नवनीत राणांचा पराभव : पडद्यामागचे पाच ‘हिरो’
या निवडणुकीत अकाली दलाचा एक उमेदवार निवडून आला तर भाजपाच्या हाती भोपळा आला. तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पंजाबमध्ये सर्वाधिक 26.30 टक्के मते काँग्रेसला मिळाली. काँग्रेसचे सात उमेदवार निवडून आले. सत्ताधारी आम् आदमी पार्टीला फक्त तीनच जागा मिळाल्या. आम् आदमी पार्टीला 26.02 टक्के मते मिळाली तरीसुद्धा पक्षाचे फक्त तीन उमेदवार निवडून आले.
तामिळनाडूत यंदा भाजपने आघाडी तयार केली होती. या निवडणुकीत भाजपला 11.24 टक्के मते मिळाली. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे नऊ मतदारसंघात भाजपाचे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या पक्षासाठी ही जमेची बाजू म्हणता येईल. कारण तामिळनाडू सारख्या प्रादेशिक अस्मिता बळकट असणाऱ्या राज्यात अशी गोष्ट याआधी कधी घडली नव्हती. भाजपच्या या कामगिरीमुळे आता येथील स्थानिक पक्ष भाजपकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत.
यानंतर अन्ना द्रमुक बरोबर जर पुन्हा आघाडी झाली तर सगळ्या गोष्टी समसमान होतील. यंदा अन्ना द्रमुकचे प्रदर्शन निराशाजनक राहील असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा होता. मात्र तसं काही घडलं नाही. तामिळनाडूच्या राजकारणात आजही अन्ना द्रमुकचे महत्त्व आहे हेच या निवडणुकीने दाखवून दिले.
कर्नाटकमध्ये एनडीएचा व्होट शेअर मागील निवडणुकी इतकाच होता. तरी देखील सात जागा कमी झाल्या. मागील निवडणुकीत भाजपला 51.38 टक्के मते आणि 25 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि जेडीएस या दोघांनी एकत्र निवडणुका लढल्या होत्या. त्यांचा व्होट शेअर 41.45 टक्के इतका राहिला होता. यात काँग्रेसचा व्होट शेअर 31.88 टक्के आणि जेडीएसचा व्होट शेअर 9.67 टक्के इतका राहिला होता. या दोन्ही पक्षांना दोन जागा मिळाल्या होत्या.
मोदींच्या शपथविधी पूर्वीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी, दिसणार नवीन भूमिकेत
या निवडणुकीत भाजप आणि जेडीएस दोघांनी एकत्रित निवडणुका लढल्या. यामध्ये भाजपला 46.6 टक्के तर जेडीएसला 5.06 टक्के मते मिळाली. यावेळी भाजपच्या जागा मात्र घटल्या. यंदा भाजपला फक्त 17 जागा मिळाल्या. आणि जेडीएसला दोन जागा मिळाल्या.
ओडिशा राज्यात यंदा भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. या राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या. भाजपने दोन्ही निवडणुकीत शानदार कामगिरी केली. लोकसभेच्या तब्बल 19 जागा पटकावल्या तर विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत बिजु जनता दलाला सत्तेतून बाहेर केले. मागील निवडणुकीत भाजपाचा व्होट शेअर 38.40 टक्के होता तो यंदा 45.34 टक्के झाला.
मतांमध्ये वाढ झाल्याने भाजपाला 12 जास्तीच्या जागा मिळाल्या. काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत यंदा घट झाली. काँग्रेसला मागील निवडणुकीत 13.4 टक्के मते मिळाली होती यंदा मात्र 12.52 टक्के मते मिळाली. भाजपला झटका देणाऱ्या राजस्थानात मतांचा पॅटर्न 2009 प्रमाणे राहिला. यावेळी भाजपला राज्यात 49 टक्के मते मिळाल्यानंतरही जागा फक्त 14 मिळाल्या. या राज्यात काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे.