Letsupp Special : अमरावतीत नवनीत राणांचा पराभव : पडद्यामागचे पाच ‘हिरो’

Letsupp Special : अमरावतीत नवनीत राणांचा पराभव : पडद्यामागचे पाच ‘हिरो’

अमरावती : हिंदू शेरणी, आक्रमक चेहरा, तरुण महिला खासदार अशा सर्व बिरुदावली मिरवणाऱ्या भाजप (BJP) नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या बळवंत वानखडे (Balawant Wankhede) यांचा इथून 19 हजार मतांनी विजय झाला. वानखडे यांच्या या विजयाने तब्बल तीन दशकानंतर अमरावती मतदारसंघ काँग्रेसकडे आला आहे. तर राणा यांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. खरंतर त्यांच्या उमेदवारीला अगदी सुरुवातीपासूनच भाजप, शिवसेना आणि प्रहारमधील आजी-माजी आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते प्रवीण पोटे पाटील यांच्यापासून चेतन गावंडे, शिवराय कुळकर्णी ते तुषार भारतीय असे अनेक नेते एकवटले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर हा विरोध टाकला होता. (How exactly was the defeat of Navneet Rana? Who played a decisive role in this matter?)

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार देऊ अशी भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार दिला देखील. माजी खासदार आणि जिल्यातील शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनीही आपल्याला नवनीत राणा यांचे तोंड देखील पाहायची इच्छा नसल्याचे म्हंटले होते. त्यानंतरही भाजप आणि मित्रपक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना फाट्यावर मारत राणा यांनी थेट केंद्रातून तिकीट आणले. अमित शहांनीही राणा यांना ताकद दिली, त्यांच्यासाठी सभा घेतली. अमित शाहंचेच आदेश असल्याने स्थानिक नेते नाकं मुरडतं राणांच्या प्रचारात सहभागी झाले. अडसूळ यांनी राणांचा विरोध शेवटपर्यंत कायम ठेवला. मतदान झाल्यानंतरच अडसूळ यांनी राणा यांचा पराभव नक्की असल्याचे भाकीत वर्तवले होते. पण बहुतांश Exit Poll मध्ये नवनीत राणाच विजय नक्की असल्याचे सांगण्यात आले होते.

असे असतानाही नवनीत राणा यांचा पराभव नेमका कसा झाला? याविषयात कोणी निर्णायक भूमिका बजावली? कोणते नेते, कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरलेत? तेच आपण पाहू…

नवनीत राणा यांच्या पराभवासाठी पहिली निर्णायक भूमिका बजावली ती स्वतः राणा दाम्पत्यांनीच.

अमरावतीमधील काही पत्रकारांच्या मते, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वागण्याला, बोलण्याला, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला भाजपचे आणि मित्रपक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी वैतागले होते. इतरांच्या कामाचे श्रेय घेण्याचे आरोप कायमच दोघांवरही केले जात होते. दोघेही केवळ मोठ्या कार्यक्रमांत, दहिहंडीला किंवा गणेशोत्सवाला एखाद्या सेलिब्रेटिला बोलावून गर्दी जमवणे, नाच-गाणे करणे एवढेच उद्योग करत असतात, असा आरोप अडसूळ आजही करतात. राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा केलेला बिभत्स प्रकार आणि त्यावेळी झालेला राडा महाराष्ट्राने पाहिला होता. अमरावतीतही त्या केवळ हनुमान चालिसा आणि हिंदुत्व एवढचं बोलतात, एवढ्यावरच भाषण करतात असे अनेक पत्रकार सांगतात.

राणा दाम्पत्यांनी मागच्या पाच वर्षांच्या काळात अमरावतीमधील महायुतीतील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांसोबत वाकडे घेतले. प्रविण पोटे पाटील आणि राणा यांचे जिल्ह्यात जमत नाही. मागे एकदा जाहीर सभेत रवी राणा यांनी पाटील यांच्याबाबत अर्वाच्य भाषा वापरली होती. तिथूनच त्यांच्यातील वादाला सुरुवात झाली होती. राणा यांची सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची भावना नाही, असे पाटील यांचे मत होते. प्रहारचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्याशीही वर्षभरापूर्वी झालेला राणा दाम्पत्याचा वाद आणि दोघांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक महाराष्ट्राने पाहिली होती. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहटीला खोके घेऊन गेल्याचा आरोप केला होता. त्यावर बच्चू कडू यांनीही आक्रमक भूमिका घेत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा : ईडीच्या ताब्यातील 180 कोटींच्या मालमत्तेबाबत ‘गुडन्यूज’

त्यानंतर एक तर ते किंवा आम्ही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. त्यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. याच वादातून बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचे काम करण्यास सपशेल नकार दिला होता. भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही राणा यांचे काम किती मन लावून केले हाही चर्चेचा विषय आहे. कारण अडसूळ यांची दर्यापूर मतदारसंघात ताकद असूनही तिथून बळवंत वानखडे यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळेच नवनीत राणा यांच्या पराभवसाठी सगळ्यात मोठी आणि निर्णायक भूमिका कोणी बजावली असेल तरी स्वतः राणा दाम्पत्यानेच.

नवनीत राणांच्या पराभवासाठी दुसरी निर्णायक भूमिका बजावली ती यशोमती ठाकूर यांनी.

नवनीत राणा यांच्याविषयीची भाजपमधील नाराजी ओळखून यशोमती ठाकूर यांनी दीड वर्षापासूनच पावलं टाकायला सुरुवात केली होती. यशोमती ठाकूर यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान होते ते ही जागा शिवसेनेकडून मागून घेणे. अमरावतीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे होते. पण तिथे आता सेनेचा एकही आमदार नाही. तर काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी त्यांनी दीड वर्षापासून फिल्डिंग लावली होती.

जागेसोबतच बळवंत वानखडे यांचे नाव निश्चित करून, त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची मंजूरी घेतली. अमरावतीत बौद्ध समाजाचा उमेदवार चालत नाही असा समज असतांनाही ठाकूर यांनी वानखडे यांच्या उमेदवारीची रिस्क घेतली. पैसा, प्रचार, नियोजन यासोबतच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत समन्वय, वेगवेगळ्या सामाजिक संस्था-संघटनांची मदत घेणे आदी अनेक विषयात त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष घातले. मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा-कुणबी समाजाला बळवंत वानखडे यांच्यासाठी अनुकूल करणे, त्यांच्यात कुठलाही चुकीचा मेसेज जाणार नाही याची काळजी यशोमती ठाकूर यांनी घेतली.

बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्या स्वभावात बऱ्यापैकी साम्य आहे. दोघेही आक्रमक आणि थेट भिडणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. पण आपल्या स्वभावाला मुरड घालून जो कोणी राणांविरोधात मदत करू शकेल, त्या जिल्ह्यातील इतर पक्षाच्या सर्व नेत्यांना प्रयत्नपूर्वक एकत्र आणले. सोशल मीडियाच्या प्रचारातही त्यांनी व्यक्तीश: लक्ष घातले. शेवटच्या काही दिवसात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या मोठ्या सभांचे आयोजन करून त्यांनी जबरदस्त वातावरण निर्मिती केली. बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न करून ताकतीने विजय खेचून आणला.

राणांच्या पराभवाचे तिसरे हिरो ठरले ते बच्चू कडू.

राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील हाडवैर सर्वश्रृत आहे. त्यानंतरही राणा यांना उमेदवारी दिल्याने बच्चू कडू चांगलेच संतप्त झाले होते. महायुतीत असून देखील काहीही झाले तरी राणांना पाडणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारीही जाहीर केली. अमरावतीच्या पत्रकारांच्या मते, दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर करण्यामागे किचट पण मोठी खेळी होती. अमरावती जिल्ह्यातील जातीय पेच जटिल आहेत. मगाशी म्हंटल्याप्रमाणे अमरावतीत बौद्ध उमेदवार चालत नाही, हा पूर्वइतिहास आहे. अपवाद वगळता येथील बहुतांशी सवर्ण, कुणबी-मराठा मतदार हे बौद्ध उमेदवाराला मतदान करत नाहीत. हाच इतिहास लक्षात घेऊन बच्चू कडू यांनी बुब यांना मैदानात उतरवले.

बच्चू कडू यांनी यातून आणखी एक गोष्ट साध्य केली ती म्हणजे, ‘राणा नको’ म्हणणाऱ्या आणि काँग्रेसला मतदान न करणाऱ्या भाजप आणि संघ परिवारातील मतदारांना चांगला पर्याय दिला. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना केवळ 15 दिवसांत निवडणूक जिंकणे शक्य नाही हे बच्चू कडू आणि दिनेश बूब या दोघांनाही माहिती होते. मात्र राणांना धडा शिकवण्यासाठी बच्चू कडू आणि बुब यांनी यांनी मेहनत घेतली. प्रचाराच्या 15 दिवसात त्यांनी पायाला भिंगरी लावत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. बच्चू कडू यांनी एकट्याने 75 पेक्षा अधिक सभा घेतल्या. या सभांमध्ये राणा दाम्पत्याची नौटंकी, राणांची लबाडी याबाबत अतिशय आक्रमकतेने ते बोलत होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायन्स कोअर मैदानाच्या परवानगीवरून जे वादंग झाले त्यात संपूर्ण दिवस बच्चू कडू लाईम लाईटमध्ये होते.

सुरेश कुटे : लोकांच्या गळ्यातील ताईत ते आता शिव्याशिवाय काही नाही

सोशल मिडीयावरुन राणांना टार्गेट करुन बच्चू कडू यांच्या टीमने अक्षरशः बेजार केले. मात्र त्याचवेळी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्याबाबत बोलणे मात्र ते टाळत होते. आपले टार्गेट काय आहे, याचे पुरेपूर भान त्यांना होते. असे म्हणतात की, राणांना पाडण्यासाठी बच्चू कडू यांनी काँग्रेसला एवढी मदत मनापासून मदत केली की, आपल्या मतदारसंघातील एक गठ्ठा मते शेवटच्या टप्प्यात काँग्रेसला जातील असे बघितले. यामुळे बच्चू कडू यांच्या भविष्यातील राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता होती. पण त्यांनी रिस्क घेतली. अखेरीस निकाल लागल्यानंतर दिनेश बुब यांना 85 हजार मते पडली. पण ही मते राणांच्या वाट्याचीच होती, असे बोलले जाते. यातील थोडी जरी मते राणांच्या पारड्यात गेली असती तर त्या निवडून आल्या असत्या.

राणांच्या पराभवाचे पुढचे हिरो ठरले संजय खोडके :

अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके आणि त्यांचे पती संजय खोडके पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे. आजही संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. जणू अजितदादांचे विदर्भातील कान-नाक आणि डोळेच. तर याच खोडकेंचे राणांशी जुने वाद. रवी रामा यांचा राजकीय उदयच मुळी खोडकेंना चितपट करुन झाला होता. 2009 मध्ये रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातून सुलभा खोडके यांना पराभूत केले होते. 2019 पर्यंत राणा आघाडी सोबत असूनही त्यांचे आणि खोडके यांचे जमले नाही. अशात सुलभा खोडके बडनेरा मतदारसंघ सोडून अमरावतीला आल्या, आघाडी धर्मातून काँग्रेसमध्ये गेल्या, सुनील देशमुख त्यावेळी भाजपमध्ये असल्याने काँग्रेसलाही तिथे म्हणावा तसा तगडा उमेदवार नव्हता. सुलभा खोडके निवडून आल्या.

आताही संजय खोडके आणि रवी राणा महायुतीत. पण संजय खोडके जुन्या गोष्टी विसरले नव्हते. राणांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डाव साधला अन् बंडाचे निशाण फडकवले. पोस्टरवर परवानगीशिवाय फोटो वापरल्याबद्दल जाहीर पत्रच लिहिले. पोस्टरवर आपला फोटोही नको, अशी तंबीच राणांना दिली. त्यानंतर हे पत्र माध्यमांमध्ये व्हायरल करत याच्या बातम्या होतील याची काळजी घेतली. अमरावतीचे राजकारण माहिती असणाऱ्यांना संजय खोडके यांचे स्थान आणि त्यांच्या या पत्राचे महत्व लक्षात येऊ शकते. राष्ट्रवादीचा मोठा गट राणांपासून या एका पत्राने दुरावला. अजितदादा बारामतीच्या घोळात अडकल्याने त्यांनी या स्थानिक राजकारणाकडे फारसे लक्ष दिले नाही.

इकडे संजय खोडके यांनी राणांविरोधात जोडण्या लावण्यास सुरुवात केली. बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्याशी समन्वय ठेवला. योग्य तो फीडबॅक दिला. अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व संपर्क वापरून त्यांनी प्रहार आणि वानखडे यांच्यामागे आपली ताकत लावली. याचा रिझल्ट मिळाला. बळवंत वानखडे यांना अमरावती शहरातून तब्बल 41 हजारांचे लीड मिळाले. हेच त्यांचे सर्वाधिक लीड ठरले. नवनीत राणा यांना बडनेरा, मेळघाटनंतर अमरावती शहरातून मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांना बडनेरा आणि मेळघाटवगळता कुठून लीड मिळालेच नाही. इथेच त्यांच्या पराभवाचे गणित होते.

राणांच्या पराभवाचे पाचवे हिरो ठरले ते तुषार भारतीय.

अमरावतीमधील भाजप नेत्यांसाठी राणा दाम्पत्याची जोडी म्हणजे कानामागून आले आणि तिखट झाले अशी होती. पण तरीही वरिष्ठांचा आदेश म्हणून स्थानिक नेत्यांनी राणांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले. अपवाद ठरले ते तुषार भारतीय आणि त्यांचे काही निवडक सहकारी. तुषार भारतीय यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अनेकदा आपली दुःख, खंत सांगण्याचा प्रयत्न केला. पण काहीही सबब सांगू नका, कामाला लागा, असे त्यांना सांगण्यात आले. तुषार भारतीय यांनी इथेच बाणेदारपणा दाखवला आणि अमरावतीसोडून मोर्शी गाठली. इथे त्यांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी काम सुरु केले. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या भारतीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा तरुणांमध्ये मोठा संपर्क आहे. त्यामुळे त्यांची कमतरता अमरावती शहरात राणांना फटका बसवणारी ठरली हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube