दिल्ली : शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेला असतानाच, ठाकरे गटाला अभूतपूर्व धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी पक्षाची साथ सोडत आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या बंडखोर खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे अधिकृत पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांनी या गटाला मंजुरी दिली असून, हा गट आता अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ऑपरेशन टायगरला यश
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ने अखेर गती घेतली. १० जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून या ऑपरेशनला हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर हे सर्व बंडखोर खासदार दिल्लीत दाखल झाले होते आणि त्यांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले होते. काल रात्री एकनाथ शिंदे हे स्वतः दिल्लीत दाखल झाले आणि या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली.
कोणते खासदार फुटले?
ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार असून, त्यापैकी खालील ६ खासदारांनी बंड पुकारत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. यामध्ये संजय जाधव, संजय, देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.
पक्षफुटीची कायदेशीर प्रक्रिया
पक्षंतरबंदी कायद्यानुसार, कोणत्याही पक्षात फूट पाडून स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश (२/३) सदस्यांची आवश्यकता असते. ठाकरे गटाच्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांनी बंड केल्यामुळे हे संख्याबळ पूर्ण झाले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीतच या खासदारांनी स्वतंत्र गटाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या, ज्याला अध्यक्षांनी कायदेशीर मान्यता दिली आहे.
संजय राऊतांचा गंभीर आरोप
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. “अपना सपना मनी..मनी! खासदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटींचा अडव्हान्स देण्यात आला आहे,” असा घणाघाती आरोप राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला हा धक्का ठाकरे गटासाठी अत्यंत मोठा मानला जात असून, राज्याच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
