नवी दिल्ली : करणी सेनेचे (Karni Sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalavi) यांचे काल रात्री निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जयपूरस्थित एसएमएस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जयपूर येथील राजपूत सभा भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागौरमधील कालवी या त्यांच्या मूळ गावी दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 80 वर्षीय लोकेंद्र कालवी यांच्या निधनाने राजपूत समाजात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच अनेकांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांसह इतर अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत राजपूत समाजाची मोठी हानी झाल्याचं सांगिलतं. जनमानसात त्यांची लढाऊ नेता अशी प्रतिमा होती.
‘सब बकवास है, सब गलत है’.. सतीश कौशिक मृत्यू प्रकरणातील आरोपांवर अनुपम खेर भडकले..
लोकेंद्र सिंह कालवी यांचा जन्म मध्य राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील कालवी गावात झाला. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. त्यांचे वडील कल्याणसिंग कालवी हे केंद्रातील चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. ते राज्य आणि केंद्रात अल्पकाळ मंत्री होते. वडिलांच्या निधनानंतर लोकेंद्र यांनीही राजकारणात प्रवेश केला. ते स्वत:ला शेतकरी नेते म्हणवत असत. लोकेंद्र कालवी यांनी 2003 च्या विधानसभा निवडणुकीत सामाजिक न्याय मंच स्थापन करून आपल्या पक्षाच्या बॅनरखाली राज्यातील अनेक जागांवर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
करणी सेनेची स्थापना
लोकेंद्र सिंह कालवी यांनी 2006 साली करणी सेनेची स्थापना करून राजपूत समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. करणी सेनेने अनेकदा राजपूत समाजावर आधारित चित्रपट आणि मालिकांना विरोध केला होता. करणी सेनेच्या विरोधामुळे 2008 साली आशुतोष गोवारिकर यांचा जोधा अकबर हा चित्रपट प्रदर्शित करण्यावरून वाद निर्माण झाला होता. तसेच एकता कपूरच्या जोधा अकबर या मालिकेलाही करणी सेनेने विरोध केला होता. 2018 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या चित्रपटावरूनही बराच वाद झाला होता. त्यानंतर करनी सेनेने चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना धमकी दिली. या चित्रपटाला करणी सेनेने कडाडून विरोध केला होता.