LPG supply in the country continues uninterrupted : देशभरात ऊर्जा पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून, वाढत्या जगातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देखील इंधन पुरवठ्यावर कोणताही मोठा परिणाम झालेला नसल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात एका दिवसात तब्बल 58 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे. यासोबतच, कमर्शियल एलपीजीची उपलब्धता देखील वाढली असून ती सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका दिवसात सुमारे 67,000 टन कमर्शियल एलपीजीची विक्री झाली, जी जवळपास 3.5 लाख सिलेंडर इतकी आहे. तसेच, 5 किलोच्या छोट्या सिलेंडरची देखील मागणी वाढली असून सुमारे 1.06 लाख सिलेंडरची विक्री झाली आहे. खत उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक वायूचा पुरवठा देखील सुरळीत ठेवण्यात आला असून तो 95 टक्क्यांपर्यंत सुनिश्चित करण्यात आला आहे. याशिवाय, देशातील एलपीजीचे दैनंदिन उत्पादन देखील वाढून 48,000 टनांपर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती लक्षात घेता वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रीन आशा हे एलपीजी वाहक जहाज स्ट्रेट ऑफ होर्मूझ पार करून जवाहरलाल नेहरू पोर्ट येथे सुरक्षितपणे दाखल झाले आहे. गेल्या 24 तासांत भारतीय जहाजे किंवा खलाशांबाबत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. तसेच, परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे 1,800 हुन अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले आहे.
देशातील सर्व बंदरांवरील कामकाज देखील सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स कडून इराण मधील भारतीयांसाठी महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. सध्या इराणमध्ये सुमारे 7,500 भरतोय नागरिक असून त्यांनी सुरक्षित मार्गाने आर्मेनिया किंवा अझरबैजान मार्गे भारतात परतावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
