Download App

Priyanka Gandhi : नर्मदा पूजा अन् शंखनाद… काँग्रेसने भाजपस्टाईल फोडला प्रचाराचा नारळ!

जबलपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच महिने आधी काँग्रेसने (Congress) प्रचाराचे अधिकृत रणशिंग फुंकले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज (12 जून) जबलपूरमधून विजय संकल्प अभियानाची सुरूवात केली. शहीद स्मारक मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या प्रचाराची सुरुवात भाजपच्या स्टाईलने झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Madhya Pradesh assembly elections, the Congress has blown its official campaign)

सभेपूर्वी नर्मदा पूजा :

प्रचारसभेपूर्वी प्रियंका गांधी यांनी गौरीघाटावर नर्मदेची पूजा केली. तसेच मध्य प्रदेशात काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी आचार्य ओंकार दुबे यांच्या नेतृत्वात १०१ ब्राह्मणांनी स्वस्तिवाचनासह प्रियंका गांधी यांची नर्मदा पूजा व आरती केली. यानंतर शहीद स्मारक मैदानावर प्रियंका गांधी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळीही शंखनाद करुन सभेची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसच्या बदलेल्या पद्धतीची बरीच चर्चा सुरु आहे.

महाराणी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन :

प्रियांका गांधी यांनी आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नर्मदा पूजनानंतर गोंड राणी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. भंवरताल उद्यानातील दुर्गावतीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी आदिवासी समाजातील लोकांची भेट घेतली.

मध्य प्रदेशातील जनतेला काँग्रेसची ‘ही’ पाच आश्वासने :

काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये नारी सन्मान योजनेचे आश्वासन दिले आहे. या योजनेंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच काँग्रेसने मतदारांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ आणि 200 युनिटपर्यंत अर्धे बिल, अशी आश्वासन काँग्रेसने दिली आहेत. काँग्रेसने शेतकरी कर्जमाफी आणि कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना देखील जाहीर केली आहे.

काँग्रेसची मदार प्रियांका गांधींवर :

दरम्यान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकनंतर काँग्रेसने मध्य प्रदेशमध्येही प्रियांका गांधी यांनाच स्टार कॅम्पेनर म्हणून समोर आणायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभेने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरविले. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रचाराची धुरा प्रियांका गांधी यांनी सांभाळली होती. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त राहिल्याने स्टार प्रचारकाची भूमिका प्रियांका गांधी यांनी वठविली होती.

या राज्यांत काँग्रेसला चांगले यश मिळाले. हे प्रियांका गांधी यांच्या प्रचाराचे फळ असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करीत आहेत. कर्नाटकमध्ये सुद्धा प्रियांका गांधी यांच्या प्रचार सभा आणि रोड शोला बरीच मागणी होती. त्यानंतर आता मध्य प्रदेशात येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांच्या प्रचारामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसला विजयाची आशा आहे.

Tags

follow us